Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अहमदनगर दक्षिणेतून डॉ. अशोक सोनवणे लढणार लोकसभा

ओबीसी राजकीय आघाडीचे लोकसभेसाठी 16 उमेदवार जाहीर

अहमदनगर ः मराठा समाजाला बेकायदेशीररित्या दिलेले आरक्षण आणि खोट्या कुणबीच्या दाखल्यातून ओबीसी आरक्षणावर येणारी गदा यावर ओबीसी बांधवांनी हुंकार भरत

5 महिन्यांपासून फरार आरोपी जेरबंद, पोलिसांचा व्हाईट कॉलर सापळा यशस्वी
‘इंडिक टेल्स’ वेबसाईटवर बंदी घालण्याची मागणी
राजर्षी शाहू ग्रामीण पतसंस्थेच्या कोथळी शाखेचा शुभारंभ

अहमदनगर ः मराठा समाजाला बेकायदेशीररित्या दिलेले आरक्षण आणि खोट्या कुणबीच्या दाखल्यातून ओबीसी आरक्षणावर येणारी गदा यावर ओबीसी बांधवांनी हुंकार भरत ओबीसी राजकीय आघाडीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील 16 लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवार जाहीर केले असून, अहमदनगर दक्षिणतेतून दैनिक लोकमंथनचे मुख्य संपादक, ओबीसी नेते डॉ. अशोक सोनवणे, तर शिर्डी राखीव लोकसभा मतदारसंघातून डॉ. संजय अप्रांती यांची उमेदवारी रविवारी ओबीसी राजकीय आघाडीचे अध्यक्ष, ओबीसी नेते, विचारवंत प्रा. श्रावण देवरे यांनी पत्रकार परिषदेतून जाहीर केली. यावेळी पत्रकार परिषदेला डॉ. संजय अप्रांती, गजाननराव गवळी, इंजी.मुबारक नदाफ उपस्थित होते.

अहमदनगर शहरामध्ये आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही उमेदवारी जाहीर केली. यावेळी बोलतांना श्रावण देवरे म्हणाले की, ओबीसींच्या न्याय-हक्कांवर गदा येत असून, राज्य सरकारने बेकायदेशीररित्या शिंदे समिती नेमत, या समितीच्या माध्यमातून खोटे कुणबी दाखले मराठा समाजाला घरपोहोच देण्यात येत आहे. शिवाय वरून 10 टक्के बेकायदेशीर आरक्षण जाहीर केले आहे. त्यामुळे भविष्यातील नोकर्‍या कुणबी दाखल्याच्या आधारे मराठा समाज लाटणार आहे, केवळ नोकर्‍याच नव्हे तर, राजकीय आरक्षण देखील खोट्या कुणबी दाखल्याच्या आधारे लाटणार आहे, त्याविरोधात ओबीसी समाज आता शांत राहणार नसून, तो निवडणुकीच्या मैदानात उतरला आहे. राजकीय मैदानात सत्ता मिळवून आम्ही खोटे कुणबी दाखले रद्द करणार असल्याची ग्वाही देखील प्रा. देवरे यांनी दिली. यावेळी त्यांनी ओबीसी राजकीय आघाडीचा जाहीरनामाच वाचून दाखवला. त्यामध्ये म्हटले आहे की, आम्ही सत्तेत आल्यास 2004 सालापासून दिलेली सर्व खोटी कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्याचा कायदा करणार, जातनिहाय जनगणनेचा कायदा व रोहिणी आयोगाची अंमलबजावणीचा कायदा करण्यासाठी ओबीसी राजकीय आघाडी 2024 च्या लोकसभा व विधानसभा निवडणूका लढणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी शिंदे समिती स्थापन करून प्रत्येक मराठा कुटुंबाला कुणबी प्रमाणपत्र दिले आहे. त्यासाठी निजामाच्या काळातील कागदपत्रात खाडाखोड करून खोट्या कुणबी नोंदीच्या आधारे खोटे कुणबी प्रमाणपत्र दिलेली आहेत.

भारताच्या इतिहासात आजवर कोणत्याही सरकारने एका जातीच्या नोंदी शोधण्यासाठी समिती स्थापन केलेली नाही. परंतू स्वजातीच्या हितासाठी सरकारी यंत्रणा राबवून त्यांना गैरमार्गाने ओबीसी आरक्षणाचा लाभ मिळवून देणारे मुख्यमंत्री ओबीसी आरक्षण नष्ट करायला निघालेले आहेत महाराष्ट्रात आता यापुढे कोणत्याही नोकरभरतीत खोटे ओबीसी अर्ज करतील व खर्‍या ओबीसीला शिपायाची नोकरीसुद्धा मिळू देणार नाहीत. ओबीसी आरक्षण वाचवायचे असेल तर आता निवडणूका लढवून सत्ता हस्तगत केल्याशिवाय दुसरा पर्याय उरलेला नाही. ओबीसी राजकीय आघाडीतर्फे राखीव मतदारसंघात दलित व आदिवासी उमेदवार उभे करण्यात येणार आहेत. ओबीसी, दलित, आदिवासी व मॉयनॉरिटिज यांच्या एकजूटीचा कार्यक्रम प्रत्यक्ष निवडणूकीत यशस्वी करण्यात येणार आहे. ओबीसी राजकीय आघाडीतर्फे निवडून आलेले लोकप्रतिनिधी लोकसभेत व विधानसभेत पूढीलप्रमाणे कायदे करण्यासाठी विधेयक मांडतील. 2004 सालापासून कुणबी-मराठा व मराठा-कुणबी अशा प्रकारची खोटी कुणबी प्रमाणपत्र देण्याचे सुरू झालेले आहे. माननीय मुख्यमंत्री शिंदे यांनी निजामाच्या कागदपत्रातून खोट्या नोंदी तयार करून खोटी कुणबी प्रमाणपत्रे दिलेली आहेत.

ही सर्व खोटी कुणबी प्रमाणपत्रे रद्द करण्यासाठी कायदा केला जाईल. दर दहा वर्षांनी जातनिहाय जनगणना करणारा कायदा केला जाईल. तसेच मायक्रो ओबीसींना न्याय देणारा राहिणी आयोगाच्या अमलबजावणीचा कायदा करण्यात येईल. आरक्षणासारख्या सर्व उपक्रमांमध्ये दलित, ओबीसी, आदिवासी व मॉयनॉरिटीज महिलांना 50 टक्के हिस्सा देणारा कायदा केला जाईल. शेतकर्‍यांसाठी स्वामीनाथन अहवालाच्या अमलबजावणी करणारा कायदा केला जाईल. ईव्हीएम मुक्त निवडणूका करण्यासाठी बॅलेटपेपरवर निवडणूका करण्याचा कायदा केला जाईल, ईलेक्ट्रोल बॉण्ड रद्द करण्याचा कायदा करून भ्रष्टाचारमुक्त निवडणूका करण्याचा कायदा केला जाईल. आजवर झालेले सर्व कामगारविरोधी कायदे रद्द करणारा कायदा करण्यात येईल. अशाप्रकारचे कायदे करण्याचे ठोस आश्‍वासन देणारी ओबीसी राजकीय आघाडी ही एकमेव राजकीय आघाडी असल्याचे प्रा. देवरे यांनी म्हटले आहे. यावेळी पत्रकार परिषदेला निवड समितीचे सदस्य ज्ञानदेव चव्हाण, महादेव झंजे, केशव निंबाळकर, अशोकराव शिंदे, अ‍ॅड. श्रीहरी भुजबळ, निकेश राठोड, मुबारक नदाफ उपस्थित होते.

लोकसभा लढणारे 16 उमेदवार जाहीर- आगामी लोकसभा निवडणुकीसाठी ओबीसी राजकीय आघाडीच्या माध्यमातून लोकसभा निवडणुकीसाठी 16 उमेदवारांची रविवारी घोषणा करण्यात आली असून, यामध्ये अशोक सोनवणे, अहल्यानगर (दक्षिण) (अहमदनगर), डॉ. संजय अप्रांती, शिर्डी (उत्तर) राखीव. (अहमदनगर), दिलीप मेहेत्रे, धाराशिव, (उस्मानाबाद), प्रा. डॉ. नारायण काळेल, म्हाडा (सोलापूर) किंवा- सचिन जोरे, (माजी न्यायाधीश) म्हाडा (सोलापूर), रवींद्र सोलंकर, सांगली किंवा, विनायक यादव, सांगली, ए. डी. पाटील, मावळ (पुणे) किंवा राजाराम पाटील, मावळ (पुणे), उदय भगत, रायगड (रत्नागिरी), विनोद राऊत, चंद्रपूर, अ‍ॅड. कैलास सोनोने, संभाजीनगर (औरंगाबाद), धोंडू मानकर, धुळे किंवा चंद्रकांत सोनवणे, धुळे, मुन्ना नदाफ, हातकणंगले (कोल्हापूर), गजानन गवळी, शिरूर, (पुणे), चंद्रकांत पिराजी गव्हाणे, नांदेड, अरविंद तुकाराम मोरे, मुंबई (उत्तर), अनिलकुमार थावरे, अमरावती राखीव, शिवशंकर अवधूतराव सोनुने, परभणी या 16 उमेदवारांचा समावेश आहे.

प्रस्थापित राजकारणांला हादरे देण्यासाठी लढणार ः डॉ. सोनवणे – ओबीसी राजकीय आघाडीच्या माध्यमातून अहमदनगर दक्षिणेतून लोकसभा निवडणूक लढण्यासाठी मी मैदानात उतरलो आहे. खोक्यांचे राजकारण करणार्‍यांना सर्वसामान्यांच्या हक्कांचा विसर पडलेला आहे. घराणेशाहीच्या विरोधात मी निवडणूक लढवत आहे. आजोबा, त्यानंतर बाप, त्यानंतर मुलगा या मतदारसंघातून प्रस्थापित आणि घराणेशाहीला खतपाणी घालत आहे, त्याविरोधात मी निवडणूक लढण्यासाठी मैदानात उतरलो आहे. कारखानदारी, शिक्षणसंस्था, मेडीकल संस्थेच्या माध्यमातून हजारो कोट्यावधींची माया जमवून प्रस्थापित राजकारण करणार्‍यांना मातीत घालण्यासाठी आपण मैदानात उतरल्याचे यावेळी डॉ. अशोक सोनवणे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

ओबीसींच्या न्याय हक्कांसाठी आमची लढत ः प्रा. देवरे – ओबीसींचे न्याय हक्क त्यांना परत मिळवून देण्यासाठी ओबीसी राजकीय आघाडी लोकसभेच्या 48 जागा लढवून आपली ताकद दाखवून देणार आहे. अहमदनगरमधून ओबीसी राजकीय आघाडीने लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले असून, याठिकाणी 16 उमेदवार जाहिर केले आहे. उर्वरित उमेदवार लवकरच मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेऊन जाहीर करणार असल्याची घोषणा ओबीसी राजकीय आघाडीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. श्रावण देवरे यांनी केली आहे.

‘वोट हमारा, राज तुम्हारा नही चलेगा’ ः डॉ. अप्रांती – देशभरातील संख्याबळाचा विचार करता ओबीसी समूहाची लोकसंख्या सर्वाधिक आहे. मात्र वोट हमारा, राज तुम्हारा नही चलेगा. आमच्याच सर्वाधिक मतदानाच्या बळावर तुम्ही विजयी होतात, आणि सत्ता भोगता. सत्ता भोगत असतांना, आमच्या न्याय हक्कांना कात्री लावतात, त्यामुळे आता याविरोधात ओबीसी राजकीय आघाडीच्या माध्यमातून आम्ही ओबीसींचा हुंकार भरला असून, शिर्डीतून लोकसभा लढणार असल्याची घोषणा माजी आयपीएस अधिकारी डॉ. संजय अप्रांती यांनी केली आहे.

COMMENTS