Homeताज्या बातम्यासंपादकीय

‘ईव्हीएम’चा संशयकल्लोळ !

राज्यात विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महायुतीला मिळालेले यश आणि महाविकास आघाडीचा दारूण पराभव झाल्यानंतर ईव्हीएमवर शंका उपस्थित करण्यात येत आहे

आरक्षणाच्या मर्यादेची भिंत !
भांडवलशाही च्या अनागोंदीला मिटवण्याचे आवाहन करित ब्रिटनमध्ये मजूर पक्ष सत्तेवर 
डेटाशिवाय आरक्षणाचा मार्ग अंधातरीच…

राज्यात विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महायुतीला मिळालेले यश आणि महाविकास आघाडीचा दारूण पराभव झाल्यानंतर ईव्हीएमवर शंका उपस्थित करण्यात येत आहे. खरंतर या निवडणुकीचा अनेक पैलूंनी विचार केल्यास आणि चिकित्सक अभ्यास केल्यास अनेक प्रश्‍नांची उत्तरे अनुत्तरित राहतात, अशावेळी या प्रश्‍नांची उत्तरे निवडणूक आयोगाने देणे अपेक्षित आहे. मात्र निवडणूक आयोगाने या प्रश्‍नांची उत्तरे न दिल्यामुळे हा संशयकल्लोळ वाढतांना दिसून येत आहे.
वास्तविक पाहता महाराष्ट्र पुरोगामी राज्य आहे. यापूर्वी देखील विरोधक ईव्हीएमला दोष देत असतांना खा. शरद पवार यांनी कधीही ईव्हीएमला दोष दिलेला नाही. मात्र यावेळेस त्यांनी देखील प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले आहे. त्याला कारणीभूत आहे निकालाची परिस्थिती. लोकसभेला सर्वाधिक 31 खासदार निवडून आणलेल्या महाविकास आघाडीला जमतेम 100 आमदार निवडून आणता आले नाही, ही परिस्थिती चिंताजनक दिसून येते. अवघ्या काही महिन्यात राज्यातील राजकीय चित्र बदलायला तसे काही वातावरण नव्हते. खरंतर लाडकी बहीण योजनेमुळे महायुती सत्तेत येवू शकते, याची कल्पना विरोधकांना आणि संपूर्ण महाराष्ट्राला देखील होती, मात्र त्यांच्याकडे बहुमत 145-160 च्या वर जाणार नाही असा अंदाज इतक्या मोठ्या प्रमाणावर महायुतीला मिळणार्‍या यशावर प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले जात आहे. अनेक ठिकाणी पोस्टल मते सर्वाधिक मिळणार्‍या उमेदवाराला ईव्हीएमद्वारे होणारे मतदान कमी कसे काय पडू शकते. यासोबतच राज्यातील बहुतांश उमेदवार काही मतांनी विजयी झाले आहेत. काही ठिकाणी 204, काही ठिकाणी 57 अशा मतांनी उमेदवार विजयी झाले आहे. अशा मतांनी विजयी होण्याची संख्या मागील निवडणुकीत ही असायची मात्र ती अपवादात्मक असे. मात्र यंदांच्या निवडणुकीत हजार-बाराशे मतांनी निवडून येणार्‍या उमेदवारांची संख्या सर्वात जास्त असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे ईव्हीएमवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले जात आहे. त्यातच सोलापूर जिल्ह्यातील मारकडवाडी सारख्या छोट्याशा गावाने ठिणगी टाकली. 1600 मतदान असणार्‍या या गावातील ग्रामस्थांचे म्हणणे आहे की, आम्ही बहुतांश जणांनी मतदार उत्तमराव जानकर यांना केल्याचा दावा ग्रामस्थांनी केला. तर याउलट सर्वाधिक मतदान राम सातपुते नावाच्या उमेदवाला मिळाल्याचा दावा इथल्या ग्र्रामस्थांनी केला. हे ग्रामस्थ इथंपर्यंतच थांबले नाहीत तर त्यांनी, पुढे पाऊल टाकत स्वतःच बॅलेट पेपरवर निवडणूक आयोजित केली. त्यानंतर मात्र व्यवस्था ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले. या गावाला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते. त्यामुळे हा संशयकल्लोल आणखीनच वाढतांना दिसून येत आहे. त्यातच विरोधक आमदारांनी शनिवारी शपथविधीवर बहिष्कार टाकला होता. मात्र हा बहिष्कार औटघटकेचा ठरला असून त्यांनी रविवारी शपथ घेतली आहेच. मात्र ईव्हीएमला होणारा विरोध तीव्र होतांना दिसून येत आहे. त्यावर सत्ताधारी पक्षातील उमेदवार दावा करतात जर ईव्हीएम हॅक करता आले असते किंवा त्यात बदल करता आला असता तर, लोकसभा निवडणुकीत भाजपने सर्वाधिक जागा मिळवल्या असत्या. त्यांचा हा दावा देखील योग्यच आहे. मात्र विधानसभा निवडणुकीत उमेदवाराला आपल्या घरातील देखील मतदान पडू नये, याला काय म्हणावे. कारण एका उमेदवाराला केवळ दोन मते मिळाल्याचे समोर आले आहे. हाच उमेदवार म्हणतो आमच्या घरात 6 मतदार असतांना मला माझ्या घरातील मतदान देखील पडू नये का? याला काय म्हणावे आता. या प्रश्‍नांचे उत्तर शोधण्याची वेळ आली आहे. आणि ती उत्तरे निवडणूक आयोगाने देण्याची गरज आहे. अन्यथा हा संशयकल्लोल वाढत जाईल आणि त्याला जनआंदोलनाचे स्वरूप भविष्यात प्राप्त होवू शकते. कारण हा लोकशाहीवरचा आघात असून, तो सहन कुणीही करू शकणार नाही. कारण जनमताचा कौल जर मशीन हॅक करून बदलता येत असेल तर तो लोकशाही पायदळी तुडवण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे आयोगाने पुढे येत या संपूर्ण प्रश्‍नांचे उत्तर देवून शंकानिरसन करण्याची गरज आहे. या निवडणुकीत सर्वाधिक उमेदवारांनी फेरमतमोजणीसाठी अर्ज केले आहे, त्यामुळे निवडणुकीवर संशय घेतला जात आहे, याकडे निवडणूक आयोगाने लक्ष देण्याची खरी गरज आहे.

COMMENTS