कापड बाजारात हातगाड्यांच्या अतिक्रमणावरून वाद व तणाव

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कापड बाजारात हातगाड्यांच्या अतिक्रमणावरून वाद व तणाव

काहीकाळ दुकाने बंद, सेनेचा इशारा व राष्ट्रवादीची मध्यस्थी

अहमदनगर/प्रतिनिधी : कापड बाजारातील घासगल्ली परिसरात दुकानासमोर हातगाडी लावण्यास दुकानमालकाने मनाई केल्याने संबंधित व्यापारी व हातगाडी चालकात शनिवारी

रत्नदीपच्या उपोषणकर्त्या मुला-मुलींचा मोठा भाऊ म्हणून उभा
माजी नगरसेवक शिवद्रोही छिंदमकडून एकास जातीवाचक शिवीगाळ
डॉ. उपाध्ये यांचे ’ह मानवा, निर्मिक तू’मधील मानव्य प्रेरणादायी ः शांताताई शेळके

अहमदनगर/प्रतिनिधी : कापड बाजारातील घासगल्ली परिसरात दुकानासमोर हातगाडी लावण्यास दुकानमालकाने मनाई केल्याने संबंधित व्यापारी व हातगाडी चालकात शनिवारी दुपारी वाद झाले. त्यानंतर दोन्ही बाजू समोरासमोर ठाकल्याने काहीकाळ वाद होऊन तणावही वाढला. शिवसेनेने ठिय्या मांडून बाजारपेठेतील अतिक्रमणे काढण्यासाठी मनपाला सोमवारपर्यंत मुदत दिली तर राष्ट्रवादीचे आ. संग्राम जगताप यांनी दोन्ही बाजूंना समजावून सांगून मध्यस्थीचा प्रयत्न केला व व्यापार्‍यांशी चर्चा करून या प्रश्‍नावर मार्ग काढण्याचे आश्‍वासन दिले. पण या घटनेमुळे दिवसभर सोशल मिडियात अफवांचे पीक जोरात होते.
शहरातील कापड बाजारातील घासगल्ली परिसरातील एका दुकानासमोर एकाने हातगाडी लावली. त्यावरून दुकानदार आणि हातगाडी चालकामध्ये वाद झाला. हे वाद विकोपाला गेले. या वादातून दुकानदारांसमोर एक गट उभा राहिला. त्यातून दहशतीचे वातावरण निर्माण झाले. मग दुकानदार देखील एकटवले. त्यातून वाद वाढत गेले. व्यापार्‍यांनी बाजारपेठेतील वाढत्या अतिक्रमणामुळे कापड बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानंतर शिवसेना व बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी व व्यापार्‍यांनी ठिय्या आंदोलन सुरू केले. यावेळी मनपा उपायुक्त यशवंत डांगे यांनी भेट घेऊन आंदोलनकर्त्यांना बाजारपेठेतील सर्व अतिक्रमण काढण्याचे आश्‍वासन दिले. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. त्यानंतर आमदार जगताप यांनीही बाजारपेठेत येऊन दोन्ही बाजूंना समजावून सांगत शांततेचे आवाहन केले.
कापड बाजारात दोन गटात मारामारी सुरू असल्याची चर्चा शहरात पसरली होती. हे वाद सोडविण्यासाठी काहींनी आमदार जगताप, तर काहींनी शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांना निरोप दिले. शिवसेनेचे शहरप्रमुख संभाजी कदम, माजी महापौर अभिषेक कळमकर, दिलीप सातपुते व सचिन जाधव, स्मिता अष्टेकर, विक्रम राठोड, मैड, अभिमन्यू जाधव व अन्य पदाधिकारी बाजारपेठेत आले होते. शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांनी व्यापार्‍यांबरोबर रस्त्यावरच ठिय्या आंदोलन केले. कापड बाजारातील अतिक्रमणधारकांकडून होणार्‍या दादागिरीचा त्यांनी निषेध केला. सोमवारपर्यंत कापड बाजारातील अतिक्रमण हटवा, नाहीतर परिणामांना सामोरे जा, असा इशारा शिवसेनेने महापालिका प्रशासनाला दिला आहे. कोतवाली व तोफखाना पोलिसांनी बाजारपेठेतील परिस्थिती पाहून बंदोबस्त वाढवला होता.

कारवाईची मागणी
कापड बाजारात जातीय सलोख्याला तडा जाईल असे वर्तन करुन दुकानदार व ग्राहकांना वेठीस धरु नये, अशी मागणी करणारे निवेदन मोची गल्ली व्यापारी असोसिएशनच्यावतीने पोलीस अधीक्षकांना देण्यात आले. तसेच दोन समाजात तेढ पसरेल असे चिथावणीखोर वक्तव्य करणार्‍यांवर कारवाई करावी, अशी मागणीही करण्यात आली. व्यापारी मंडळी गेल्या अनेक वर्षापासून गुण्यागोविंदाने मोची गल्ली, कापड बाजार, सारडा गल्ली या बाजारपेठ भागात व्यवसाय करीत आहे. प्रशासनासोबत जातीय सलोखा अन्य कार्यक्रम घेऊन या भागात सामाजिक ऐक्य प्रस्थापित करण्याचे काम केले जाते. या भागात बहुतांश दुकानात महिलावर्गाशी संबंधित वस्तू विकल्या जातात. त्यामुळे बाजारपेठेत महिला ग्राहकांची वर्दळ असते. अशा परिस्थितीत शनिवारी (दि.12 मार्च) रोजी बाजारपेठेत काही लोकांनी येऊन घोषणाबाजी केली. जातीय सलोख्याला तडा जाईल असे वक्तव्य केले. काहींनी आरडाओरडा केला. राजकीय पक्षाच्या नावाने घोषणाही देण्यात आल्या. त्यामुळे बाजारात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. खरेदीसाठी आलेल्या महिला आणि अन्य ग्राहकही यामुळे गोंधळून गेले. अशा परिस्थितीत बाजारात गोंधळ निर्माण करणार्‍यांवर कारवाई करावी. कोणाचे वैयक्तिक वाद असेल तर त्यांनी ते कायदेशीर आणि न्यायालयीन मार्गाने मिटवावे. त्यासाठी बाजारात येऊन सर्व दुकानदारांना व ग्राहकांना वेठीस धरले जाऊ नये. संबंधितांनी पोलिस प्रशासनाला संबोधून बदनामीकारक वक्तव्य केले आहे. त्यामुळे पोलिसांच्या जनमानसातील प्रतिमेला तडा गेला आहे. या प्रकारांना वेळीच आळा घालून बाजारपेठेतील शांतता कायम टिकवून ठेवण्याचे आवाहन निवेदनात केले आहे. कोरोनाच्या संकटानंतर बाजारपेठ कुठेतरी सावरण्यास सुरुवात झाली आहे. अशा घटना घडल्यास बाजारपेठेवर अनिष्ट परिणाम होऊ शकतो. शिवाय यामुळे शहरातील शांतता भंग होऊन वातावरण बिघडू शकते. त्यामुळे या प्रकरणाची योग्य ती दखल घेऊन संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी मोची गल्ली व्यापारी असोसिएशनच्यावतीने करण्यात आली आहे.

COMMENTS