Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नांदेडमध्ये नवजात अर्भकांचे टाकाऊ आयुष्य?

कुमारी माता, अनैतिक संबंध आणि व्यवस्थेची असंवेदनशीलता नांदेड । प्रतिनिधी नांदेड शहरात गेल्या काही महिन्यांपासून नवजात अर्भकांना जन्मताच रस्त्यावर, मोक

नांदेड जिल्हा बँकेच्या भरतीला पुन्हा ‘ब्रेक’
प्रभाग चारमध्ये काँग्रेस-वंचित आघाडीच्या प्रचाराला जोरदार प्रतिसाद; विजयाची चिन्हे स्पष्ट
नांदेड भाजपला धक्का : तरोडा-सांगवी मंडळ अध्यक्ष सुनील राणे यांचा राजीनामा, अंतर्गत अस्वस्थतेचा स्फोट

कुमारी माता, अनैतिक संबंध आणि व्यवस्थेची असंवेदनशीलता
नांदेड । प्रतिनिधी
नांदेड शहरात गेल्या काही महिन्यांपासून नवजात अर्भकांना जन्मताच रस्त्यावर, मोकळ्या जागी किंवा हॉस्पिटलच्या आसपास फेकून दिल्याच्या घटनांमध्ये चिंताजनक वाढ होत आहे. शुक्रवारी सकाळी अण्णाभाऊ साठे चौकाजवळील एका हॉस्पिटलच्या परिसरात एका बॉक्समध्ये ठेवलेले नवजात अर्भक आढळून आले. जन्म देणारी माता तेथे अर्भक ठेवून पसार झाल्याची प्राथमिक माहिती आहे. ही घटना एक ही नसून यापूर्वीही नांदेड शहरात अशाच प्रकारच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. जन्मलेले बाळ मुलगा आहे की मुलगी आहे याबाबत कोणतीही खात्रीशीर माहिती नसल्यामुळे अर्भकांला सोडून जाण्याचा हा प्रकार नकोशी चा प्रकार आहे की नाही ? याबाबत खात्रीशीर माहिती नाही.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कुमारी माता किंवा अनैतिक संबंधातून गर्भवती झालेल्या काही महिला समाजाच्या भीतीपोटी, बदनामीच्या दडपणाखाली किंवा कुटुंबीयांच्या विरोधामुळे गुपचूप प्रसूती करतात. त्यानंतर नवजात बाळाची जबाबदारी स्वीकारण्याऐवजी त्या बाळाला रस्त्यावर टाकून देतात. हे प्रकार बहुतेक वेळा रात्री उशिरा किंवा पहाटेच्या सुमारास घडत असल्याने कोणाच्याही लक्षात येत नाहीत. सकाळी एखाद्या नागरिकाला अर्भक दिसल्यानंतरच हा प्रकार उघडकीस येतो आणि पोलीस घटनास्थळी दाखल होतात. या घटनांचा आणखी गंभीर पैलू म्हणजे, ज्या ठिकाणी अर्भके सापडतात त्या ठिकाणांपासून हॉस्पिटल अतिशय जवळ असतात. मग असा प्रश्न उपस्थित होतो की, संबंधित हॉस्पिटलमध्ये या महिला प्रसूतीसाठी आल्या होत्या का? आल्याच असतील तर त्यांची नोंद का ठेवली जात नाही? हॉस्पिटल प्रशासन अशा संवेदनशील प्रकरणांकडे डोळेझाक का करत आहे? की काही ठिकाणी मुद्दाम दुर्लक्ष केले जात आहे? नवजात अर्भक म्हणजे देवाघरचे फूल. त्याला जगण्याचा पूर्ण अधिकार आहे. समाजातील नैतिक अधःपतन, कौटुंबिक आधाराचा अभाव, लैंगिक शिक्षणाची कमतरता आणि व्यवस्थेची असंवेदनशीलता यांचा हा भयावह परिणाम आहे. केवळ पोलिस कारवाई पुरेशी ठरणार नाही, तर सामाजिक जनजागृती, समुपदेशन केंद्रांची उभारणी, कुमारी मातांसाठी आधार योजना आणि हॉस्पिटलवर कडक देखरेख आवश्यक आहे. जर वेळेत उपाययोजना केल्या नाहीत, तर नांदेड शहरात नवजात अर्भकांचे रस्त्यावर टाकून देण्याचे प्रकार अधिक वाढण्याची भीती आहे. समाज, प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा यांनी एकत्रितपणे पुढे येऊन या अमानवी प्रवृत्तीला आळा घालणे ही काळाची गरज आहे.नवजात अर्भकांना जन्मताच रस्त्यावर फेकून देण्याच्या घटना केवळ एखाद्या आईच्या चुकीपुरत्या मर्यादित नसून त्या संपूर्ण समाज आणि व्यवस्थेच्या अपयशाचे विदारक चित्र उभे करतात. कुमारी माता किंवा अनैतिक संबंधातून गर्भवती झालेल्या महिलांना समाजाकडून आधार मिळण्याऐवजी अपमान, भीती आणि बहिष्काराची वागणूक मिळते. या मानसिक दबावातून त्या चुकीचा मार्ग निवडतात आणि निरपराध जीवाचा बळी जातो. अशा परिस्थितीत प्रशासनाने केवळ गुन्हा नोंदवून थांबणे पुरेसे नाही, तर या समस्येच्या मुळावर घाव घालणे आवश्यक आहे. प्रत्येक हॉस्पिटलमध्ये प्रसूती झालेल्या महिलांची काटेकोर नोंद ठेवणे, संशयास्पद प्रकरणांची तात्काळ माहिती पोलिस व आरोग्य विभागाला देणे, तसेच कुमारी मातांसाठी समुपदेशन व संरक्षणाची व्यवस्था उभी करणे अत्यंत गरजेचे आहे. प्रशासनाने संवेदनशीलतेने या विषयाकडे पाहून कडक नियमांची अंमलबजावणी केली तरच अशा अमानवी घटनांना आळा बसू शकतो. समाजानेही दृष्टिकोन बदलून दोष देण्याऐवजी आधार देण्याची भूमिका घेतली, तर अनेक नवजात अर्भकांचे प्राण वाचू शकतात.

COMMENTS