नगर अर्बन निवडणुकीत निरुत्साह.. अवघे 32 टक्के मतदान

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नगर अर्बन निवडणुकीत निरुत्साह.. अवघे 32 टक्के मतदान

अहमदनगर/प्रतिनिधी : नगर अर्बन मल्टीस्टेट शेड्युल्ड बँकेच्या रविवारी झालेल्या निवडणुकीत निरुत्साह होता. अवघे सुमारे 32 टक्के मतदान या निवडणुकीत झाले.

शेतकर्‍यावर गावठी कट्टयाने झाडल्या सहा गोळ्या
विश्‍वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठान ह सेवेचे, प्रबोधनाचे ज्ञानतीर्थ ः शिवाजीराव कपाळे
उन्हाची तीव्रता वाढली ; उष्णतेमुळे कामकाजावर परिणाम

अहमदनगर/प्रतिनिधी : नगर अर्बन मल्टीस्टेट शेड्युल्ड बँकेच्या रविवारी झालेल्या निवडणुकीत निरुत्साह होता. अवघे सुमारे 32 टक्के मतदान या निवडणुकीत झाले. 55 हजार 991 मतदारांपैकी 17 हजार 721 मतदारांनी (31.65 टक्के) मतदान केले. बँक बचाव कृती समितीने निवडणुकीतून माघार घेतल्याने निवडणुकीतील चुरस तशी संपलीच होती. आता मतदारांकडून यंदाच्या मतदानातून मागील सत्ताधारी सहकार मंडळाच्या समर्थकांनाच यावेळी पुन्हा कौल मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान, बँकेच्या नव्या संचालकांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले असून, मंगळवारी (30 नोव्हेंबर) सकाळी 9 वाजता नगरमध्ये मतमोजणी होणार आहे.
मागील दोन महिन्यांपासून नगर शहरासह जिल्ह्यात गाजत असलेल्या नगर अर्बन बँकेच्या निवडणुकीतील चुरस 15 दिवसांपूर्वीच संपली. मागील सत्ताधार्‍यांचे समर्थक असलेल्यांचे सहकार मंडळ व मागील 10 वर्षांपासून बँकेतील गैरव्यवहारांचा भांडाफोड करणार्‍या नगर अर्बन बचाव कृती समिती या दोन पॅनेलमध्ये जोरदार लढत अपेक्षित होती. पण 15 दिवसांपूर्वी बँक बचाव कृती समितीने अनपेक्षितपणे निवडणुकीतून माघार घेतली व या निवडणुकीतील चुरसच संपली. त्याची प्रचिती रविवारच्या मतदानाच्यावेळी वारंवार येत होती. नगर शहरातील भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूल, अंबिका विद्यालय केडगाव, आनंद विद्यालय गुलमोहोर रोड, आंबेडकर शाळा भिंगार आदी मतदान केंद्रांवर मतदारांपेक्षा सहकार मंडळाच्या समर्थकांचीच जास्त गर्दी होती. याशिवाय महाराष्ट्र व गुजरात या दोन राज्यांतील मिळून 9 जिल्ह्यांमध्ये म्हणजे नगरसह पुणे, सोलापूर, औरंगाबाद, जालना, बीड, नाशिक, सूरत व अहमदाबाद येथील एकूण 132 मतदान केंद्रांवरही कमी-जास्त प्रमाणात हीच स्थिती होती. दुपारी 2 वाजेपर्यंत 16.23% मतदान झाले होते व सायंकाळी 5 वाजता अंतिम मतदानाची आकडेवारी 17 हजार 721 म्हणजे 31.65% टक्के होती. बँकेच्या एकूण 55 हजार 991 पैकी फक्त 17 हजार 721 मतदारांनी मतदान केले.
संगीता गांधी, मनेष साठे, मनीषा कोठारी व दिनेश कटारिया असे सहकार पॅनलचे चार जण बिनविरोध झाल्याने नगर शहर व भिंगार मतदार संघातील 10 व उर्वरित महाराष्ट्र मतदार संघातील 4 अशा 14 जागांसाठी 21जण रिंगणात आहेत. नगर शहर व भिंगार मतदार संघासाठी पांढरी तर उर्वरित महाराष्ट्र मतदार संघासाठी गुलाबी मतपत्रिका होती. या दोन्ही मतदारसंघांमध्ये अनुक्रमे 14 व 7 उमेदवार होते. त्यामुळे मतदानाच्यावेळी मतदारांचा फारसा गोंधळ उडाला नाही. पण काहीअंशी क्रॉस व्होटींग झाल्याचे बोलले जात होते. त्यामुळे निवडणुकीतील सहकार मंडळाच्या 14 उमेदवारांव्यतिरिक्त रिंगणात असलेल्या 7जणांना किती मते पडतात, याची उत्सुकता व्यक्त होत आहे. ईश्‍वर बोरा, अनिल कोठारी, संपतलाल बोरा, राहुल जामगांवकर, राजेंद्रकुमार अग्रवाल, स्मिता महावीर पोखरणा, अनिल गट्टाणी, शैलेश मुनोत, गिरीश लाहोटी, दीप्ती सुवेंद्र गांधी, महेंद्र गंधे, अजय बोरा, संजय डापसे, दीपक गुंदेचा असे उमेदवार असून, महाराष्ट्र कार्यक्षेत्रात कमलेश भंडारी, अशोक कटारिया, रमणलाल भंडारी, अतुल कासट, गणेश राठी, सचिन देसर्डा, रज्जाक इनामदार अशा 21 उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे. या निवडणुकीची मतमोजणी दि.30 रोजी सकाळी 9 वा अमरज्योत मंगल कार्यालय, नेप्ती चौक, कल्याण रोड, अहमदनगर या ठिकाणी होणार आहे.

COMMENTS