मेंदूचा वापसा झाला का ?

Homeताज्या बातम्यादेश

मेंदूचा वापसा झाला का ?

भारतात निरर्थक गोष्टीवरून समाजामध्ये सतत काहूर उठत असते. त्यातून धार्मिक तणाव निर्माण करण्याच्या मुळाशी असते राजकारण. राजकारणात लोक नासमाज आहेत असे अ

संविधानाचे यश आणि अपयश
वाचाळवीरांना लगाम हवा
एकीकडे दिलासा दुसरीकडे टांगती तलवार

भारतात निरर्थक गोष्टीवरून समाजामध्ये सतत काहूर उठत असते. त्यातून धार्मिक तणाव निर्माण करण्याच्या मुळाशी असते राजकारण. राजकारणात लोक नासमाज आहेत असे अजिबात नाही. भारतातील राजकारणाचा पाया हा जात- धर्म आहे. त्यामुळे ज्याला इथे राजसत्तेत बसायचे आहे त्याला आपल्या जात- धर्माचा समाज जेवढा कट्टर करता येईल तेवढे त्याच्या फायद्याचे असते. मग त्याचे माध्यम राम मंदिर असेल किंवा भोंगा आणि हनुमान चालीसा असेल. या ज्या कुरापती केल्या जातात त्या फक्त राजकारणासाठीच. बरं, यातून लोकांच्या मनात जी धार्मिक कट्टरता तयार होते, तीच कट्टरता पुढे दहशतवादाला जन्म देत असते. यासाठी विशिष्ट लोकांचे संघ, दल, संघटना, पक्ष हे काम करत असतात. हे सर्व लोक समाजातील कच्चा मेंदू असलेल्या तरण्या पोरांना आपल्या जाळ्यात ओढून त्यांचे विचार परिवर्तित करत असतात. याला वयाने वडील असलेले लोक सुद्धा अपवाद नाहीत. हिंदू म्हणतात, ‘हिंदू खतरेमें है’. कुणापासून? तर मुस्लिमांपासून. असा प्रचार करून लोकांच्या मनात भेद निर्माण केला गेला आहे. ‘हिंदू खतरेमे है’ असे असतांना, मध्य प्रदेशातील मंदसौर या जिल्ह्याच्या ठिकाणी येथील एका व्यक्तीने मुस्लिम धर्म सोडून हिंदू धर्म स्वीकारला आहे. धर्म सोडणे आणि स्वीकारणे हा त्याचा संवैधानिक अधिकार. पण नंतर त्याने पत्रकारांच्या प्रश्नाला दिलेल्या उत्तरावर भाष्य करणे आवश्यक आहे.
धर्मांतरानंतर शेख जफर शेख गुलाम मोईनुद्दीन आता चेतन सिंग राजपूत या नावाने ओळखले जातील. पत्नी आधीपासूनच हिंदू धर्माची आहे. भगवान पशुपतीनाथ मंदिराच्या प्रांगणात धर्म परिवर्तन केले. 46 वर्षीय शेख यांना महामंडलेश्वर स्वामी चिदंबरानंद सरस्वती यांच्या हस्ते विधीवत पूजा करून हिंदू धर्माची दीक्षा देण्यात आली. यावेळी त्यांना शेण आणि गोमुत्राने स्नानही घालण्यात आले. शेख जफर यांच्या या धर्मांतराला विरोध करण्याचे काहीच कारण नाही.  पण धर्मांतरानंतर ते हिंदू धर्मातील कोणत्या जातीचा स्वीकार करणार आहेत. किंबहुना त्यांना दीक्षा देणारांनी त्यांना कोणत्या जातीमध्ये स्थान दिले आहे? जातीमध्ये ब्राम्हण जात सर्वात वरची आहे. मग त्या जातीचा दर्जा शेख जफर यांना दिला जाणार का? याचे उत्तर मिळाले पाहिजे. शेख जफर म्हणाले आहेत की, जे मुस्लिम आहेत, त्यांचे पूर्वज राजपूत होते. पण याला काय आधार आहे? संपूर्ण विश्वातील सर्व लोक सनातनी आहेत असा दावा शेख जफर यांनी केला आहे. आता हे सनातनी आर्य हेच मुळात भारतीय नाहीत. आर्य बाहेरून आले होते असे लोकमान्य टिळक म्हणतात. तसे अनेक भौतिक पुरावे, शास्त्रीय कसोट्या लावून सबळ तर्क काढून अनेकांनी संशोधने केली आहेत. अनेक इतिहास अभ्यासक, पुरातत्त्वविद, शास्त्रज्ञ, संशोधक वगैरे आदींनी सुद्धा भरपूर वाचन, चिंतन करून आर्यांचे मूळ शोधले आहे. आर्य हे मूळ भारतीय नाहीत याचे अनेक पुरावे आहेत. इसवी सन पूर्व 2 हजारच्या सुमारास आर्यांचे भारतात स्तलांतर झाले. सध्या कझाकिस्तान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या युरेशियाच्या गवताळ प्रदेशातून आर्यांचं भारतात आगमन झालं आहे. संस्कृत भाषाही आर्यांसोबतच भारतात आली. शेख जफर म्हणतात, मी घरवापसी केली आहे, परिवर्तनाचा प्रश्नच नाही. संपूर्ण विश्वातील सर्व लोक सनातनी आहेत. आता सर्वच लोक सनातनी आहेत तर मग भारतात वर्णव्यवस्था होती हे शेख जफर याला माहित नव्हे काय? मग सर्वच सनातनी आहेत तर मग पुरोहितगिरीचा धंदा फक्त विशिष्ट लोकांकडेच का आहे? याचे उत्तर दिले पाहिजे. शेख जफर यांचे मत मान्य नसले तरी त्यांनी ते व्यक्त करायला पाठिंबा आहे. पण एवढ्या विद्वान शेख जफर यांनी धर्मांतर करतांना चक्क गोमुत्राने शुद्ध होऊन धर्मांतर केले आहे यातून त्यांची विद्वत्ता लक्षात येते. भारतात अशा लोकांची कमी नाही. हे कच्चा मेंदू घेऊन फिरणारे लोक असतात. त्यांच्या मेंदूचा वापसा झाला का? याचे उत्तर सर्वानी शोधावे अशी आशा. 

COMMENTS