धर्माचा विवेक शाबूत ठेवा !

Homeताज्या बातम्यासंपादकीय

धर्माचा विवेक शाबूत ठेवा !

धर्म हा एकेकाळी पुरोगामी होता. निसर्गाच्या घडामोडींचे जेव्हा आकलन झाले नव्हते तेव्हा धर्म काही प्रश्नांची त्याच्या पध्दतीने उत्तरं देत होता. परंतु, ज

बारसू’चे जिद्दी आंदोलन !
विधानसभा निवडणुकीत काँग्रेसकडे कल !
“४९८ अ”वर पुनर्विचार करण्याची शिफारस!

धर्म हा एकेकाळी पुरोगामी होता. निसर्गाच्या घडामोडींचे जेव्हा आकलन झाले नव्हते तेव्हा धर्म काही प्रश्नांची त्याच्या पध्दतीने उत्तरं देत होता. परंतु, जसजसं विज्ञानाचे शोध लागत जग आधुनिक होत असताना धर्माला चिकटून राहत राज्यसत्तांनी वैज्ञानिक शोध लावणाऱ्या शास्त्रज्ञांना फासावर लटकवण्याच्या घटनाही जगात घडल्या! परंतु, तेथून पुढे राज्यसत्ता कोसळत गेल्या आणि वैज्ञानिक दृष्टिकोन स्विकारावा लागला. आज, युरोप-अमेरिकेसह प्रगत देशात धर्म आणि राजकारण यांच्यात पूर्णतः फारकत झाली आहे. भारतासारख्या साक्षरता वाढणाऱ्या परंतु ज्ञानशीलतेचा बराच अभाव असणाऱ्या देशात धर्माचा उपयोग राज्यसत्ता काबिज करण्यासाठी सध्याच्या काळात मोठ्या प्रमाणात केला जातो आहे. अर्थात, अशा प्रकारचं राजकारण जगातील कोणत्याही देशात दीर्घकाळ टिकत नाही, असा इतिहास आहे. हा इतिहास विसरण्याचं काम पंजाब काॅंग्रेसचे अध्यक्ष नवज्योतसिंग सिध्दू या शायरीबाज नेत्यांकडूनही होत असल्याचे स्पष्ट झाले. त्यांनी नुकतेच वक्तव्य केले की, धर्मग्रंथांचा अपमान करणाऱ्या सरेआम फासावर लटकवायला हवे. मुळात: खेळाडू असणारे सिद्धू हजरजबाबी आणि शायरीबाज ठसक्यामुळे भारतात लोकप्रिय आहेत. पंजाब चे काही काळ मंत्री आणि खासदार राहीलेल्या सिध्दू यांनी अशाप्रकारचे वक्तव्य करण्यामागची पार्श्वभूमी सांगितली जाते की, गुरूग्रंथ साहिब या पवित्र धर्मग्रंथाचा अपमान केल्या प्रकरणी दोन व्यक्तिंना जमावाने बेदम मारहाण करित जिवानिशी ठार केले. कायद्याच्या भाषेत तो खून आहे. परंतु, कालच काॅंग्रेस नेते राहुल गांधी यांनी ‘२०१४ पूर्वी भारतात लिंचिंग हा शब्द परिचित नव्हता!’ राहुल गांधींचे हे वक्तव्य संघ-भाजपला मोठ्या प्रमाणात झोंबले होते. त्यांनी तात्काळ राहुल गांधींच्या वक्तव्याला निशाना करित टीकाही केली. मात्र, योगायोग एवढा मोठा की पंजाबमध्ये काल दोन व्यक्तींची माॅब लिंचिंग करित हत्याही केली. काही घटना प्रचंड योगायोगाच्या असू शकतात. असो. तर नवज्योतसिंग सिध्दू यांनी काल केलेले वक्तव्य धर्मग्रंथांच्या संदर्भात होते. भारतात कोणत्याही धर्माचे पालन म्हणजे उपासना स्वातंत्र्याचा हक्क हा मुलभूत हक्क आहे. व्यक्तिगत जीवनात धर्म पालन करण्यास कोणताही मज्जाव नाही. त्याचप्रमाणे प्रत्येक धर्माचे आपले पवित्र धर्मग्रंथ आहेत, त्याचा इतर कुणीही अपमान करण्याचे कारण नाही. एखाद्या माथेफिरूने तसे केल्यास त्याला कायद्याने योग्य शिक्षा व्हायलाच हवी. मात्र, सिध्दू यांनी जी जनतेसमोर कोणत्याही न्यायनिवाड्याशिवाय अशा संशयित आरोपींना थेट फासावर लटकावण्याचे जे वक्तव्य केले ते लोकशाही व्यवस्थेशी सुसंगत नाहीच. सिध्दू यांच्या वक्तव्यातून हे स्पष्ट होते की, त्यांचे राजकारण देखील धर्माधिष्ठित आहे. पंजाब च्या अकाली दल या उच्चजातीय शिखांच्या पक्षावर शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक कमिटीचा प्रभाव आता काही लपून राहिलेला नाही. त्यामुळे, भाजप आणि काॅंग्रेस सारखा उच्चजातवर्गीय पक्ष देखील यांस अपवाद नाही. सिध्दू चे वक्तव्य हे धर्मप्रभावाचा राजकारणात फायदा मिळवण्याच्या दृष्टीने केले आहे, असे मानण्यास बराच वाव आहे. परंतु, खरा प्रश्न आहे की, अलिकडच्या काळात वैदिक हिंदूंनी मनुस्मृती सारखा विषमतावादी ग्रंथालाही धर्मग्रंथाचा दर्जा देण्याचे षडयंत्र चालवले आहे. महात्मा फुले यांनी शूद्रातिशूद्रांचे शोषण हे ब्राह्मणी धर्मग्रंथांच्या आधारे केले जात असल्याचे स्पष्टपणे म्हटले. शूद्र म्हणजे आजचे ओबीसी. या शूद्रांना वेद ऐकण्यास मज्जाव होता. ते ऐकल्यास त्यांच्या कानात गरम शिसे ओतण्याची शिक्षा अंमलात आणली जायची. मग आजच्या काळात अशा ग्रंथांना धर्म ग्रंथ म्हणून पवित्र मानायचे काय? सिध्दू सारख्या आधुनिक लोकशाहीत नेता झालेल्या व्यक्तिने ज्या संविधानाच्या आधारे सत्तापदे भोगली आणि भोगत आहेत, त्या संविधानाच्या प्रति जाहीरपणे जाळणाऱ्यांच्या विरोधात काही वक्तव्य केल्याचे ऐकिवात नाही. याचाच अर्थ सिध्दू हे पुराणमतवादी व्यक्तिमत्व असून अशा व्यक्तिमत्वांना आता राजकारणाच्या क्षेत्रातून हद्दपार करायला हवे. सिध्दू यांचा धर्म, जात, ब्राह्मणी धर्मापासून वेगळा असला तरी विचारांनी ते संघ परिवाराची रि ओढतानाच दिसतात. धर्म हा मानवी जीवनात कितीही अनिर्वाय असला तरी त्याचे विवेकी स्वरूप वर्धिष्णू करायला हवे. संघ परिवार अशा बाबींच्या विरोधात असल्याने त्यांनी स्वतःचा विवेक हरवला आहे. मात्र, त्यांची नक्कल करणाऱ्यांनी आपला विवेक शाबूत ठेवायलाच हवा!

COMMENTS