मानव प्राणी असा आहे की, ज्याला एकदा कोणत्याही गोष्टीची चटक लागली की ती सहजा-सहजी सुटत नाही. ही चटक मग कोणत्याही स्वरूपाची असेल. ती चटक सकारात्मक
मानव प्राणी असा आहे की, ज्याला एकदा कोणत्याही गोष्टीची चटक लागली की ती सहजा-सहजी सुटत नाही. ही चटक मग कोणत्याही स्वरूपाची असेल. ती चटक सकारात्मक असेल किंवा नकारात्मक असेल, मात्र ही चटक दिवसेंदिवस वाढतच जाते. झारखंडमध्ये एका मंत्र्याचा स्वीय सहायक असलेल्या अधिकार्याच्या नोकराकडे तब्बल 35 कोटींची रोकड अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीच्या छाप्यात आढळून आली आहे. खरंतर ही रक्कम इतकी मोठी होती की, रोख रक्कम पाहिल्यानंतर ईडीच्या अधिकार्यांचे डोळे पांढरे झाले होते. त्यानंतर ही रोकड मोजण्यासाठी आणखी कुमक आणि पैशे मोजण्याची मशिन्स मागवावे लागले. अनेक तासांच्या अथक प्रयत्नानंतर ही रक्कम 35 कोटींच्या घरात पोहचली आहे. खरंतर मानवाला जगण्यासाठी किती पैसा हवा, याचे भान राहिलेले नाही. त्यामुळे संपत्तीचा हव्यास अशा माणसांना नडतांना दिसून येत आहे. आज जो तो, मग तो राजकीय नेता असेल, आमदार, खासदार, सरकारी अधिकारी, कर्मचारी असेल, तो एकदा का आपल्या पदावर विराजमान झाला की, तो खोर्याने पैसा जमा करण्याच्या नादी लागतो.
आपण त्यासाठीच या पदावर आलो आहे, असेच त्याला वाटायला लागतो. शिवाय वरिष्ठांचा वरदहस्त असल्याशिवाय या बाबी होत नाही. त्यामुळे सगळीकडून मिलीभगत होवून या पैशांचा अपहार करण्यात येतो. जो पैसा जनतेच्या श्रमाचा असतो, जनतेच्या करातून जमा झालेला असतो, त्या पैशांवर असा डल्ला मारला जातो. खरंतर हा पैसा त्या अधिकार्याच्या नोकराच्या घरी सापडला आहे. इतरत्र या अधिकार्याची संपत्ती किती असेल याची मोजदाद नाही. केवळ एका अधिकार्याची घरी 35 कोटींची रोकड सापडत असेल तर, त्या अधिकार्यांची इतर संपत्ती 100 कोटींच्या वर असण्याची शक्यता आहे. झारखंड राज्यातील सार्वजनिक बांधकाम विभागातील मुख्य अभियंता असलेल्या संजीव लाल यांच्या नोकराच्या घरी जर 35 कोटींची रोकड सापडत असेल तर, देशातील किती अधिकार्यांनी आपली बेनामी संपत्ती जमा केली असेल याची मोजदाद नाही. खरंतर देशातील राजकारणी आमदार, खासदार किंवा मंत्री 5 वर्ष सत्तेत असतात, मात्र अधिकारी आपली संपूर्ण ह्यात सेवानिवृत्त होईपर्यंत म्हणजे वयाची 58-60 वर्ष नोकरीत असतात. या काळामध्ये अधिकार्यांकडून जमा केलेली संपत्ती किती असेल याची मोजदाद नाही. ईडीने झारखंडचे मंत्री आलमगीर आलम यांचे स्वीय सहायक संजीव लाल आणि त्यांचा नोकर जहांगीर यांना अटक केली आहे.
केंद्रीय तपास यंत्रणेने सोमवारी अनेक ठिकाणांच्या झडतीदरम्यान 35 कोटी रुपयांहून अधिक किमतीची बेहिशेबी रोकड आणि काही कागदपत्रे जप्त केली होती. रांची येथील ग्रामीण बांधकाम विभागात मुख्य अभियंता म्हणून तैनात असलेल्या वीरेंद्र कुमार राम यांनी कंत्राटदारांना निविदा वाटपाच्या बदल्यात लाचेच्या नावावर अवैध उत्पन्न मिळवले होते. ईडीने आरोप केला होता की, गुन्हेगारीतून मिळालेली कमाई वीरेंद्र कुमार राम आणि त्यांच्या कुटुंबियांनी आलिशान जीवनशैली जगण्यासाठी वापरली आहे. वास्तविक पाहता ईडीच्या छाप्याविरोधात अनेकांकडून गळेकाढूपणा केला जातो, ही कारवाई सत्ताधार्यांकडून विरोधकांची गळचेपी करण्यात येत असल्याची ओरड सुरू असली तरी, ईडीकडून टाकण्यात आलेल्या छाप्यात अनेक ठिकांणाहून कोट्यावधींची रोकड जप्त करण्यात आलेली आहे. त्यामुळे जनतेच्या पैशांचा अपहार कशापद्धतीने होत आहे, याचे एक उदाहरण यानिमित्ताने समोर आले आहे. एक अधिकारी जर इतक्या मोठ्या प्रमाणांवर भ्रष्टाचार करून माया जमवत असेल तर देशभरात भ्रष्ट अधिकार्यांची संख्या किती असेल, याची गणतीच नाही.
COMMENTS