दिल्लीमध्ये अजूनही थंडी असली तरी दिल्लीतील राजकारण तापतांना दिसून येत आहे. त्यामागचे प्रमुख कारण म्हणजे दिल्ली विधानसभेची मुदत फेबु्रवारी अखेर सं

दिल्लीमध्ये अजूनही थंडी असली तरी दिल्लीतील राजकारण तापतांना दिसून येत आहे. त्यामागचे प्रमुख कारण म्हणजे दिल्ली विधानसभेची मुदत फेबु्रवारी अखेर संपत आहे. त्यामुळे जानेवारी महिन्याच्या अखेरीस दिल्ली विधानसभा निवडणुुकीचा बिगुल वाजण्याची शक्यता आहे. मात्र त्यापूर्वीच दिल्लीतील राजकारण तापण्यास सुरूवात झाली आहे. आम आदमी पक्षाने विविध लोकप्रिय घोषणा करत या निवडणूक प्रचारात आघाडी घेण्याचा प्रयत्न केला असला तरी, शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीत तब्बल 46 हजार कोटींच्या विकासकामांचे उद्घाटन करत निवडणुकीचे शंख फुंकले आहेत. आप नसून आपदा असल्याची जहरी टीका पंतप्रधान मोदी यांनी केली आणि या निवडणूक प्रचारातील एक झलक समोर आली.
दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजप आणि आप यांच्यात प्रमुख लढत असल्याचे दिसून येत आहे. यात आपने स्वबळावर लढण्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे काँगे्रस देखील स्वबळावर निवडणूक लढणार आहे, यात काँगे्रसचा फटका आपला बसतो की भाजपला, त्यावर येथील निकाल दिसून येणार आहे. खरंतर तपास यंत्रणांनी अर्थात ईडीने दिल्लीचे तत्कालीन उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया, त्यानंतर अरविंद केजरीवाल यांना कथित मद्य घोटाळाप्रकरणी अटक केले होते. दोन्ही नेते जामीनावर बाहेर असले तरी, यामुळे आपला सहानुभूती मिळेल का? हा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे. यासोबतच आपमध्ये सर्वकाही आलबेल नसल्याचे समोर आले आहे. कारण काही दिवसांपूर्वीच केजरीवाल यांनी महिला सन्मान योजना आणि वृद्धांवर मोफत उपचार करण्यासाठी संजीवनी योजना सुरू करणार असल्याचे आश्वासन दिले होते. खरंतर सत्तेवर असणार्या पक्षाच्या प्रमुखांकडून ही घोषणा करण्यात आली होती, त्यानंतर अवघ्या काही तासांतच महिला व बालविकास मंत्रालय आणि आरोग्य मंत्रालयाने वर्तमानपत्रात नोटीस प्रकाशित करत सरकारने जनतेची दिशाभूल करू नये, असे म्हटले होते. खरंतर महिला व बालविकास मंत्रालय आणि आरोग्य मंत्रालयाचे मंत्री मुख्यमंत्र्यांना जुमानत नाही किंवा प्रशासन जुमानत नाही, असेच दिसून येत आहे. यातून आपची मोठी कोंडी झाल्याचे दिसून येत आहे. अर्थात या प्रकरणावरून आप बॅकफूटवर गेल्याचे पाहायला मिळाले, तसेच सरकार आणि प्रशासनातील विसंवाद यानिमित्ताने पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला. त्याचा फायदा आपसुकच भाजपला होण्याची शक्यता आहे. शिवाय अजून निवडणुकीचा बिगुल वाजला नसला तरी, भाजप आपल्या जाहीरनाम्यात अनेक लोकप्रिय घोषणा करून दिल्ली ताब्यात घेवू शकतो. मध्यप्रदेशात लाडकी बहीण योजनेने कमाल दाखवली, त्याचा प्रत्यय हरियाणा आणि महाराष्ट्रात आल्यानंतर दिल्लीमध्ये देखील येण्याची शक्यता आहे. लाडक्या बहीणींसाठी भाजप पुन्हा एकदा लोकप्रिय घोषण करू शकतो. त्यामुळे दिल्ली विधानसभा निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केजरीवाल यांच्यावर तोफ डागतांना म्हटले आहे की, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे बोट धरून भ्रष्टाचार विरोधी आंदोलनात आलेले पीक आज स्वतःहा भ्रष्टाचाराच्या विळख्यात गुंतले आहे. खरंतर मोदी यांची ही जहरी टीका असून, त्यामुळे आप बॅकफूटवर जातांना दिसून येत आहे. केजरीवाल यांना तपास यंत्रणांनी अटक केल्यामुळे त्यांना दिल्लीकरांची सहानुभूती मिळेल असा दावा करण्यात येत असला तरी, ती लाट दिसण्याची शक्यता कमीच आहे. यासोबतच इंडिया आघाडीतील बहुतांश नेते आपच्या व्यासपीठावर दिसू शकतात, त्यामुुळे काँगे्रस या निवडणुकीत एकटी पडू शकते. त्यामुळे काँगे्रस देखील त्वेषाने लढण्याची शक्यता आहे. शिवाय लोकसभा निवडणुकीत काँगे्रसला चांगले यश मिळाले आहे, त्यामुळे विधानसभा निवडणुकीत काँगे्रस बर्यापैकी जागा मिळवू शकतो. तसेच गेल्या दहा वर्षांपासून आपने एकहाती सत्ता दिल्लीत मिळवली असली तशी एकहाती सत्ता मिळवणे यावेळेस आपला अवघड जाणार असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यातच पंतप्रधान मोदी यांनी पहिल्याच कार्यक्रमात मोठी छाप सोडली आहे, त्यामुळे यावेळेस दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजप सुक्ष्म नियोजन करून मैदानात उतरणार हे नक्की.
COMMENTS