नवी दिल्ली : देशातील मौल्यवान धातूंच्या बाजारात मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे. 19 मार्च रोजी सोन्या-चांदीच्या दरात लक्षणीय घसरण झाली असून, अल्पा

नवी दिल्ली : देशातील मौल्यवान धातूंच्या बाजारात मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे. 19 मार्च रोजी सोन्या-चांदीच्या दरात लक्षणीय घसरण झाली असून, अल्पावधीतच किमतींनी मोठा उतार घेतल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे, केवळ पाच व्यापार दिवसांत चांदीत तब्बल 31 हजार रुपयांची घसरण झाली असून सोन्याच्या दरातही मोठी नरमाई दिसून आली आहे.
इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या माहितीनुसार, एक किलो चांदीचा दर 13 हजार रुपयांनी घसरून 2 लाख 37 हजार रुपयांवर आला आहे. यापूर्वी हा दर 2 लाख 50 हजार रुपयांच्या आसपास होता. दुसरीकडे, 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 4 हजार रुपयांनी कमी होऊन सुमारे 1 लाख 52 हजार रुपयांवर पोहोचला आहे. देशातील प्रमुख शहरांमध्ये सोन्याचे दर जवळपास समान पातळीवर असले तरी काही ठिकाणी किरकोळ फरक दिसून येतो. दिल्ली, मुंबई, कोलकाता, जयपूर, लखनऊ यांसारख्या शहरांत 24 कॅरेट सोन्याचा दर सुमारे 1.54 लाख रुपयांच्या आसपास आहे, तर चेन्नईमध्ये तो किंचित जास्त म्हणजे 1.56 लाख रुपयांपर्यंत पोहोचलेला आहे. या वर्षाच्या सुरुवातीला सोन्याने जोरदार उसळी घेतली होती. डिसेंबर अखेरीस सुमारे 1.33 लाखांवर असलेला दर जानेवारी अखेरीस 1.76 लाखांपर्यंत पोहोचला. मात्र त्यानंतर नफावसुली आणि जागतिक घडामोडींमुळे किंमतींमध्ये सातत्याने घसरण होत आहे. सध्याच्या स्थितीत सोनं आपल्या सर्वोच्च पातळीपासून सुमारे 25 हजार रुपयांनी स्वस्त झाले आहे. चांदीत तर आणखी तीव्र चढ-उतार दिसून आले. 3.86 लाख रुपयांच्या ऐतिहासिक उच्चांकावरून घसरत ती अवघ्या 49 दिवसांत 2.37 लाख रुपयांपर्यंत खाली आली आहे. म्हणजेच जवळपास दीड लाख रुपयांची मोठी पडझड झाली आहे. सामान्यतः आंतरराष्ट्रीय तणावाच्या काळात सोने-चांदीला सुरक्षित गुंतवणूक मानले जाते आणि किमती वाढतात. मात्र यावेळी परिस्थिती वेगळी आहे. मध्य पूर्वेतील तणावामुळे गुंतवणूकदार अधिक सुरक्षिततेकडे वळले आहेत. त्यांनी धातूंमधील गुंतवणूक कमी करून रोख रक्कम साठवण्यावर भर दिला आहे. तज्ज्ञांच्या मते, सध्याची घसरण तात्पुरती नसून काही काळ सुरू राहण्याची शक्यता आहे. सोन्याचा दर सुमारे 1.50 लाखांपर्यंत आणि चांदीचा दर 2.50 लाखांच्या आसपास स्थिरावू शकतो, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
कॅरेटनुसार सोन्याचे दर
24 कॅरेट – 1,51,637 रुपये
22 कॅरेट – 1,38,899 रुपये
18 कॅरेट – 1,13,728 रुपये
14 कॅरेट – 88,708 रुपये

COMMENTS