अमरावती/प्रतिनिधी ः अमरावतीच्या खासदार नवनीत राणा पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्यामुळे राजकारणात चांगलीच
अमरावती/प्रतिनिधी ः अमरावतीच्या खासदार नवनीत राणा पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्यामुळे राजकारणात चांगलीच खळबळ उडाली आहे. राणा यांच्या मोबाईलवर संपर्क साधून चाकूने वार करुन ठार करू, अशा आशयाची ही धमकी देण्यात आली आहे. या प्रकरणी खासदार नवनीत राणा यांनी पोलिसात तक्रार दाखल केली असून, अधिक तपास सुरू आहे.
खासदार नवनीत राणा या कायमच चर्चेत असतात. आता त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याने त्यांचे नाव पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. विशेष म्हणजे या आधी देखील त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. त्यावेळी हनुमान चालिसा पठण करण्यावरुन त्यांच्यात आणि उद्धव ठाकरे यांच्यात वाद सुरू होते. आता नव्याने धकमी देण्यामागचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. या संदर्भात खासदार नवनीत राणा यांचे खासगी सचिव विनोद गुहे यांनी येथील राजापेठ पोलिस ठाण्यात या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे. गेल्या 16 ऑगस्टपासून विठ्ठलराव नावाची व्यक्ती नवनीत राणा यांच्या मोबाईलवर संपर्क साधून गर्दीच्या ठिकाणी मी कधीही धारदार चाकूने वारेल, ते माहितीही पडणार नाही, अशा शब्दांमध्ये धमकी देत असून त्याने अश्लील शिवीगाळदेखील केल्याचे या तक्रारीमध्ये नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी राजापेठ पोलिसांनी संबंधित आरोपीच्या विरोधात भादंवि 504,506 (ब) कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. गेल्या वर्षीदेखील हनुमान चालिसा पठण केल्यास तुम्हाला ठार मारू, अशी धमकी नवनीत राणा यांना देण्यात आली होती. या प्रकरणी राणांनी नवी दिल्ली येथील नॉर्थ अव्हेन्यू पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.
COMMENTS