मेढा : आढावा बैठकीत बोलताना आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, शेजारी तहसीलदार राजेंद्र पोळ, ज्ञानदेव रांजणे व मान्यवर. कुडाळ / वार्ताहर : जावळी तालुक्यात
कुडाळ / वार्ताहर : जावळी तालुक्यात गतवर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे प्रामुख्याने केळघर भागातील नदीकाठच्या शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. पाण्याच्या प्रवाहबरोवर शेतजमीन वाहून गेली. या शेतजमिनीची दुरुस्ती करण्याचे काम आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, जिल्हा बँक संचालक ज्ञानदेव रांजणे, महसुल, बांधकाम, कृषी विभाग तसेच नाम फाउंडेशनचे यांच्या पुढाकाराने होत आहे. येत्या सोमवारपासून याची सुरुवात होणार असल्याची माहिती आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मेढा याठिकणी आयोजित बैठकीत दिली.
जावलीतील अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतजमीन दुरुस्तीसाठी मेढा येथे पंचायत समिती सभागृहात याबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती.
याप्रसंगी तहसीलदार राजेंद्र पोळ, गटविकास अधिकारी रमेश काळे, उपविभागीय कृषी अधिकारी चंद्रकांत गोरड, तालुका कृषी अधिकारी रमेश देशमुख, नाम फाउंडेशनचे बाळासाहेब शिंदे, जिल्हा बँक संचालक ज्ञानदेव रांजणे, मेढ्याचे नगराध्यक्ष पांडुरंग जवळ, पंचायत समिती सदस्य विजय सुतार आदी मान्यवर उपस्थित होते.
आ. शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, जुलै महिन्यातील अतिवृष्टीमुळे ज्या शेतजमिनीचे, विहिरींचे मोठे नुकसान झाले आहे. ही शेतजमीन पूर्ववत करण्यासाठी येत्या सोमवारपासून केळघर भागात प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे. याकरिता मशीनच्या डिझेलचा लागणारा खर्च हा डीपीडिसीच्या माध्यमातून होणार आहे. अनेक गावांच्या पाण्याचा विहिरी वाहून गेल्या आहेत. तसेच अनेक विहिरी गाळाने भरल्या आहेत. त्या विहिरीतला गाळ काढून विहिरी देखील पुन्हा व्यवस्थित करण्याचे काम या माध्यमातून होणार आहे. शेतकर्यांनी स्वतः लक्ष देऊन वादविवाद न करता काम होऊ द्यावे, असे आवाहन त्यांनी उपस्थित शेतकर्यांना केले.
तहसीलदार राजेंद्र पोळ म्हणाले, जमीन दुरुस्तीची कामे होत असताना शेतकर्यांनी सहकार्य करावे. मशीन ऑपरेटर यांच्या जेवणाची, तसेच मशीनच्या ठिकाणी डिझेल पोहोचविण्याचे सहकार्य व्हावे. तसेच हे काम होत असताना कामाच्या देखभालीसाठी विविध खात्यांचे अधिकारी, कर्मचार्यांची नेमणूक करण्यात येणार आहे. काम सुरु झाल्यावर जास्तीत-जास्त काम होईल. कमीत-कमी वेळ मशीन उभे राहिल. याची दक्षता शेतकर्यांनी घ्यावी, असेही पोळ यांनी सांगितले. यावेळी उपस्थित शेतकर्यांनी आपले प्रश्न उपस्थित करत कामविषयी सूचना केल्या.
COMMENTS