सहा बायकांचा दादला व 25 पोरांचा बाप जेरबंद

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सहा बायकांचा दादला व 25 पोरांचा बाप जेरबंद

44 गंभीर व तीन मोक्क्याच्या गुन्ह्यातील आरोपी

अहमदनगर/प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्यातील गुन्हेगारी विश्‍वात कुविख्यात असलेला, वय लहान पण (अप)कीर्ती महान अशी ओळख असलेल्या संदीप ईश्‍वर्‍या भोसले या

राज्यात आदिवासी बजेट कायदा अभियान राबविणार
जुन्या पेन्शनसाठी संपकरी कर्मचार्‍यांनी केली निदर्शने
समाधान ही जीवनातील खरी आनंदनिर्मित कमाई असते – गुलाबराव पादिर

अहमदनगर/प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्यातील गुन्हेगारी विश्‍वात कुविख्यात असलेला, वय लहान पण (अप)कीर्ती महान अशी ओळख असलेल्या संदीप ईश्‍वर्‍या भोसले या आरोपीला रत्नागिरी येथे नगरच्या पोलिसांनी जेरबंद केले आहे. 44 गंभीर व तीन मोक्क्याच्या गुन्ह्यातील हा आरोपी असून, 26 गंभीर गुन्ह्यात फरारी होता. नगरच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने त्याला पकडण्याची कारवाई केली. दरम्यान, 23 वर्षाच्या संदीप ईश्‍वर्‍या भोसले याला सहा बायका असून सुमारे पंचवीस मुलं-मुली असा त्याचा संसार आहे.
संदीप भोसले (राहणार बेळगाव, तालुका कर्जत) हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध अहमदनगर, पुणे, सातारा, बीड व औरंगाबाद येथे दरोडा, जबरी चोरी, घरफोडी चोरी, बेकायदेशीररित्या हत्यार अशा प्रकारचे एकूण 44 गुन्हे दाखल आहेत तसेच अहमदनगरला एक, बीडला एक व पुणे एक असे तीन जिल्ह्यात तीन मोक्का गुन्हे यासह इतर ठिकाणच्या दरोडा, दरोड्याची तयारी, जबरी चोरी, घरफोड्या, पोलिसांच्या रखवालीतून पळून जाणे अशा तेवीस गुन्ह्यांसह एकूण 26 गुन्ह्यात तो फरारी होेता. त्याला शिताफीने जेरबंद केल्याने पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाचे कौतुक केले.
या बाबतची माहिती अशी की बाबाजी तुकाराम मोरे (वय 65, राहणार कामतवाडी, तालुका पारनेर) हे घरी जात असताना अनोळखी पाच जणांनी लाकडी काठी हातामध्ये घेऊन व मोरे यांच्या घरात घुसून शस्त्राचा धाक दाखवून 34 हजार 500 रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी पारनेर पोलिस ठाण्यात दरोड्याच्या गुन्ह्याची नोंद झाली आहे. हा गुन्हा दाखल झाल्यानंतर या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने गुन्हा तात्काळ उघडकीस आणून आरोपींना अटक करण्याबाबत सूचना दिल्या. त्यावरून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी मीलन उर्फ मिलिंद ईश्‍वर भोसले (वय 23, राहणार बेळगाव, तालुका कर्जत. हल्ली राहणार वनकुटे शिवार, ता. पारनेर) यास ताब्यात घेऊन तपास केला असता त्याच्याकडून 1 लाख 1हजार 850 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. तसेच त्याने हा गुन्हा संदीप ईश्‍वर भोसले, मटक ईश्‍वर भोसले, पल्या ईश्‍वर भोसले, अटल्या उर्फ अतुल ईश्‍वर भोसले यांनी मिळून केला असल्याची माहिती दिल्याने पोलिसांनी या गुन्ह्यात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन 1999 चे मोका हे वाढीव कलम लावले.

माहिती मिळाली व सापळा लावला
घटना घडल्यापासून संदीप भोसले हा फरार होता. या आरोपीचा शोध घेत असताना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना माहिती मिळाली की संदीप उर्फ संदीप भोसले हा पावस (जिल्हा रत्नागिरी) परिसरामध्ये त्याचे नाव बदलून राहात आहे. त्यावरुन स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकातील पोलिसांना कारवाई करण्याबाबत सूचना देण्यात आल्या. पोलिस पथक रत्नागिरी जिल्ह्यातील पावस परिसरात जाऊन आरोपीचा शोध घेत असताना पथकास आरोपी विजय नारायण भोसले (राहणार वाहिरा, तालुका आष्टी, जिल्हा बीड) असा नावामध्ये बदल करून चांदुर (जिल्हा रत्नागिरी) येथील लाल रंगाच्या दगडाच्या खाणीमध्ये काम करीत आहे, अशी खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी वेषांतर करून या खाणीवर ट्रक ड्रायव्हर व शेत मजूर म्हणून तीन दिवस मुक्कामी राहून काम केले तसेच आरोपीच्या राहण्याच्या ठिकाणाबाबत खात्री करून आरोपीच्या राहत्या ठिकाणी पहाटेच्या वेळी छापा घातला, परंतु पोलिसांची चाहूल लागताच संदीप भोसले पळून जाऊ लागला. पोलिसांनी त्याचा पाठलाग केला आणि त्यास ताब्यात घेतले. पकडल्यावर पोलिसांनी त्यास त्याचे नाव व पत्ता विचारला असता त्याने त्याचे बनावट नाव विजय नारायण भोसले (रा.वाहिरा, आष्टी, बीड) असे सांगितले. त्यानंतर त्यास विश्‍वासात घेऊन कसून चौकशी केली असता त्याने त्याचे खरे नाव संदीप उर्फ संदीप्या ईश्‍वर भोसले (रा.बेळगाव, कर्जत) असे सांगितले. त्यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्ह्यांची कबुली दिली. त्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी पारनेर पोलीस ठाण्यात त्याला हजर केले.

संदीप ईश्‍वर्या भोसले याला सहा बायका असून सुमारे पंचवीस मुलं-मुली असा त्याचा संसार आहे. अनेक वर्षांपासून तो फरार होता. काही दिवसांपूर्वी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, तो पळून जाण्याचा यशस्वी झाला होता. त्याला पकडण्याची कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक सोमनाथ दिवटे, पोलिस हवालदार सुनील चव्हाण, दत्ता हिंगडे, संदीवार, कॉन्स्टेबल सागर ससाणे व रणजीत जाधव यांनी केली आहे.

तीन किलोमीटर पाठलाग
नगरच्या पोलिसांनी संदीप भोसले याला पकडण्यासाठी तीन दिवस सापळा लावून त्याला शिताफीने पकडले. शेतमजूर, ड्रायव्हर व कामवाले असा वेष परिधान करून स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी आणि कर्मचारी संदीप ईश्‍वर्‍या भोसलेच्या मागावर होते. जेव्हा तो पोलिसांच्या नजरेच्या टप्प्यात आला तेव्हा पोलिसांनी हालचाली सुरू केल्या, पण यामुळे पोलिस आपल्या मागावर असल्याचे समजताच त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी तीन किलोमीटर पाठलाग करीत अखेर त्याला जेरबंद केले.

COMMENTS