Homeताज्या बातम्यासंपादकीय

राजकारणातील गुन्हेगारीकरण

राजकारणाचे गुन्हेगारीकरण होत असल्याचे शिक्कामोर्तब अलीकडच्या काही घटनांनी होतांना दिसून येत आहे. भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी गोळीबार केल्यानंतर

काँगे्रसला नवसंजीवनी मिळेल का ?
सीमाप्रश्‍नांचा वाढता गुंता
नितीशकुमार संधीसाधू राजकारणी

राजकारणाचे गुन्हेगारीकरण होत असल्याचे शिक्कामोर्तब अलीकडच्या काही घटनांनी होतांना दिसून येत आहे. भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी गोळीबार केल्यानंतर हा प्रश्‍न पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. खरंच आमदार गणपत गायकवाडला पोलिस स्टेशनमध्ये गोळीबार करतांना काहीच कसे वाटले नसेल. जमिनीचा वाद, राजकारणाचा वाद अश्याप्रकारे गोळबार करून सुटेल का, पुढे आपली राजकीय कारकीर्द संपुष्टात येईल, आपण तुरूंगात जावू, अशी कोणताही भीती या आमदाराला वाटली नसेल का, त्यामुळे राजकारण गुन्हेगारांचे केंद्र तर बनत नाही ना, असा सवाल उपस्थित होत आहे. राजकारणात सुसंस्कृत व्यक्ती येत नाही. तर अरेला कारे करणारेच व्यक्ती राजकारणात असल्याचे आणि यशस्वी होत असल्याचे दिसून येत आहे. मात्र सर्वसामान्य आणि सुसंस्कृत माणूस यशस्वी होत नाही, त्यामुळे सर्वसामान्य व्यक्ती या राजकारणात शिरत नाही. आणि शिरलेच तर ते काही दिवसांतच ते राजकारणाचा मार्ग सोडून दुसरा मार्ग पकडतात. राजकारणामध्ये गुन्हेगारी पार्श्‍वभूमी असतांना देखील अशा कार्यकर्त्यांना, नेत्यांना पक्षात घेतले जाते, त्याला ताकद दिली जाते. खरंतर अशा व्यक्तींना आपल्या पक्षात आल्यानंतर ती व्यक्ती काय करणार, याची सर्वांना माहिती असते. राजकारणात अशा व्यक्तींना अभय दिले जाते, त्यामुळे अशी व्यक्ती राजकारणाचा मार्ग चोखाळतांना दिसून येत आहे.  वास्तविक राजकारणांतील मूल्य, नैतिकता हरवत चालल्याची खंत व्यक्त होत असतांना, ही नैतिकता टिकवण्यासाठी, ही मूल्य जोपासण्यासाठी अशा व्यक्तींना पक्षातून दूर करण्याची गरज आहे. आजमितीस राज्यातील कोणत्याच पक्षाला गुन्हेगारी वर्ज्य नसल्याचे तरी दिसून येत आहे. एकेकाळी आजचे सत्ताधारी विरोधी पक्षात असतांना सत्ताधार्‍यांनी आपल्या पक्षात गुन्हगांराना प्रवेश दिला म्हणून तुटून पडायचे, आणि आज पुन्हा तेच आपल्या पक्षात उजळमाथ्याने गुन्हेगारांना प्रवेश देत असल्याचे दिसून येत आहे. गुन्हेगारीला मोडून काढण्याची भाषा करणारे आज गुंडासोबत दिसत आहे. राजकारणाचे गुन्हेगारीकरण हे काही आता नवे राहिले नाही. प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष गुंडापुंडाचा आधार घेऊन राजकारण करण्याचे दिवस संपलेले नाही ते आजही सुरू आहे. वास्तविक विरोधी पक्षाच्या खुर्चीत बसले की कोणतेही बेछूट आरोप करणे अगदी सोपे असते. मात्र विरोधक जेव्हा खुर्चीवर बसतात तेव्हा त्यांना नक्कीच मर्यादा येतात.  राजकारणाचे होणारे गुन्हेगारीकरण हे लोकशाहीसाठी अतिशय घातक आहे. लोकशाहीला आपल्या सोयीसाठी वापर करण्याचे प्रमाण वाढत आहे. राजकीय पक्षांनी तर गुन्हेगारांच्या चारित्र शुद्धीकरणाचा नवा पायंडाच सुरू केला आहे. त्यामुळे कुख्यात म्हणून गणले जाणारे अनेक  गुन्हेगार आता खादीचे पांढरे शुभ्र कपडे परिधान करून समाजात ताठ मानेने वावरत आहेत. कधीकाळी नंग्या तलवारीच्या पातींच्या आधारे पाहिजे ते मिळवणार्‍या अशा कार्यर्कत्यांमुळे राजकारणाचा आखाडा गुन्हेगारीचा आखाडा होऊ लागला आहे. राजकारणात टिकून राहायचे असेल, तर गुन्हेगार हाताशी असलेच पाहिजेत, असा समज राजकीय पक्षांनी करून घेतला आहे की काय असे वाटण्यासारखी परिस्थिती राजकीय वर्तुळात निर्माण झाली आहे. राज्यातील राजकारणाचे मोठ्या प्रमाणात गुन्हेगारीकरण सुरू झाले आहे. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून गुंडांना पक्षात घ्यायचे, जेलमधील  गुंडांना पॅरोलवर बाहेर काढायचे आणि वापर झाल्यानंतर त्यांना पुन्हा जेलमध्ये पाठवायचे असे पूर्वीचे धोरण पुन्हा एकदा राज्यात सक्रिय झाले आहे. सत्ता ही सर्वसामान्यांसाठी न वापरता सत्तेला टिकविण्यासाठी सर्वच मार्गाचा वापर विद्यमान सत्ताधार्‍याकडून करण्यात येत आहे. एकंदरित राजकीय पक्षांचा बदललेला दृष्टिकोन पहिला, तर राजकारणात कोणीही धुतल्या तांदळासारखे स्वच्छ नसतो, हे प्रत्येकाने कृतीतून दाखवून दिले आहे. गुन्हेगारांच्या या विळख्यातून राजकीय पक्षांची सुटका होईल का, हा यक्षप्रश्‍न आहे. त्यामुळे राजकीय पक्षांनी आतातरी या गुंडाना दूर ठेवण्याची गरज आहे. 

COMMENTS