Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कॉम्रेड कातोरे हल्ला प्रकरणाची माकप राज्य कमिटीकडून दखल

राज्य सचिव उदय नारकर प्रत्यक्ष भेटून घेणार आढावा

अकोले ः लोकसभा निवडणुकीच्या राजूर प्रचार सभेत कॉम्रेड तुळशीराम कातोरे यांनी ठाकर समाजाच्या बोली भाषेत  केलेल्या भाषणाचा राग येऊन त्यांच्यावर देवठ

नवे जिल्हाधिकारी कार्यालय राहिले दिमाखात उभे
राहुरी कृषि विद्यापीठातील शास्त्रज्ञ व विद्यार्थ्यांची रावळगाव येथील पवार बंधुंच्या प्रक्षेत्रास भेट
कोपरगावमध्ये दोन वर्षानंतर फुलणार ‘गोदाकाठ महोत्सव’

अकोले ः लोकसभा निवडणुकीच्या राजूर प्रचार सभेत कॉम्रेड तुळशीराम कातोरे यांनी ठाकर समाजाच्या बोली भाषेत  केलेल्या भाषणाचा राग येऊन त्यांच्यावर देवठाण येथे काही प्रवृत्तींनी जीवघेणा हल्ला केला होता. सदर हल्ल्याची मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या महाराष्ट्र राज्य समितीने गंभीर दखल घेतली असून आचार संहिता संपल्यानंतर या प्रकरणी पक्षाचे राज्य सचिव व ज्येष्ठ विचारवंत कॉम्रेड उदय नारकर अकोले येथे प्रत्यक्ष भेट देऊन संपूर्ण प्रकरणाचा आढावा घेणार आहेत.
कॉम्रेड तुळशीराम कातोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर हल्ले करणारांवर  गुन्हे दाखल करण्यासाठी पक्षाचे कार्यकर्ते पोलीस स्टेशनमध्ये पोहचले असता पोलिसांनी घेतलेली भूमिका न्यायाला धरून नव्हती. हल्ला केलेल्यांप्रमाणेच ज्यांच्यावर हल्ला झाला त्या कॉम्रेड तुळशीराम कातोरे यांच्यावरही गुन्हा दाखल होईल अशी भूमिका पोलिसांनी घेतली. शिवाय डॉ. अजित नवले घटनास्थळी पोहचेपर्यंत तुळशीराम कातोरे यांना मदत करणार्‍या कार्यकर्त्यांवरही केसेस दाखल करून घ्याव्या लागतील असे सांगण्यात आले. पोलिसांची ही भूमिका धक्कादायक होती. कॉम्रेड तुळशीराम कातोरे यांना वाचविण्यासाठी मध्यस्थी करणार्‍या मराठा समाजातील कार्यकर्त्यांवर अट्रोसिटी दाखल करण्याचा आग्रहही संबंधितांकडून धरला जात असल्याचे सांगितले जात होते. संकटात सापडलेल्या आदिवासी कार्यकर्त्याला वाचविण्यासाठी मध्यस्थी करणार्‍या मराठा समाजातील कार्यकर्त्यांवर  खोट्या अट्रोसिटी केसेस दाखल होणार असतील तर यामुळे तालुक्याची सामाजिक वीण आणखी बिघडणे स्वाभाविक आहे. तालुक्यात अट्रोसिटी कायद्याचा दुरुपयोग वाढतो आहे. विनय सावंत या सामाजिक कार्यकर्त्यावर गेल्या काही महिन्यापूर्वी अशीच खोटी अट्रोसिटी केस दाखल करण्यात आली. विनय सावंत यांनी अट्रोसिटीचे कलम लागू होईल असे वर्तन केलेले नव्हते असे सांगणारे जबाब घटनास्थळी उपस्थित असलेल्या आदिवासी साक्षीदारांनी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन नोंदविले होते. मात्र हे जबाब न्यायालयात सादर करण्यात आले नाहीत. परिणामी विनय सावंत यांना अट्रोसिटीच्या केसला सामोरे जावे लागले. कॉम्रेड तुळशीराम कातोरे यांच्यावरील हल्ल्याबाबतही अट्रोसिटी कायद्याचा दुरुपयोग करण्याचा प्रयत्न झाला.  आदिवासी ठाकर समाज व मराठा समाज तालुक्यात अनेक पिढ्या गुण्यागोविंदाने नांदत असताना काही प्रवृत्ती आपल्या अत्यंत स्वार्थी राजकारणासाठी ही सामाजिक वीण उसवू पहात आहेत. पोलीस अशा प्रवृत्तींना प्रोत्साहन देत आहेत का? हे तपासून पाहण्याची आवश्यकता आहे. तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध उत्खनन सुरू आहे. तालुक्यात चोर्‍या, मारामार्‍या, जमीन व्यवहाराचे अनेक गुन्हे वाढत आहेत. पोलीस प्रशासनाशी यासंदर्भात संपर्कात असलेल्यांना सांभाळून घेण्यासाठी ज्यांच्यावर हल्ला झाला त्यांच्यावरच केस करण्याची भूमिका पसरविण्यात आली का? हे ही तपासून पाहण्याची आवश्यकता आहे. काही राजकीय शक्ती यामागे कार्यरत होती का? याचीही चौकशी होण्याची आवश्यकता आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आदिवासी व दलितांवर होणार्‍या सामाजिक अन्यायाच्या बाबत सचेत आहे. असे अन्याय झाल्यास अट्रोसिटी कायद्याचा योग्य वापर करून आदिवासी व दलित जनतेला न्याय मिळाला पाहिजे ही पक्षाची भूमिका आहे. मात्र सोबतच अट्रोसिटी कायद्याचा राजकीय कारणासाठी दुरुपयोग होता कामा नये असेही पक्षाची ठाम मत आहे. पक्षाचे राज्य सचिव आचार संहिता संपल्यानंतर याबाबत अकोले येथे येऊन वस्तुस्थिती जाणून घेणार असून पोलीस अधिकार्‍यांची यासंदर्भात भेट घेणार आहेत. तालुक्यात सर्व जाती व धर्मांमध्ये प्रेम, सहकार्य व जिव्हाळा राहावा यासाठी पक्ष आगामी काळातही कटिबद्ध राहणार आहे असे माकप अहमदनगर जिल्हा सचिव कॉम्रेड सदाशिव साबळे यांनी सांगितले.

COMMENTS