नवी दिल्ली :राजधानीत विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजण्यापूर्वीच वादाची ठिणगी पडतांना दिसून येत आहे. इंडिया आघाडीतील घटक पक्ष असलेला आम आदमी पक्ष अर्
नवी दिल्ली :राजधानीत विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजण्यापूर्वीच वादाची ठिणगी पडतांना दिसून येत आहे. इंडिया आघाडीतील घटक पक्ष असलेला आम आदमी पक्ष अर्थात आप आणि काँगे्रसमध्ये वितुष्ट येतांना दिसून येत आहे, त्यामुळे इंडिया आघाडीत वादाची ठिणगी पडली असून ही ठिणगी दिल्ली विधानसभा निवडणुकीपुरतीच मर्यादित राहते की, त्यापूर्वी विस्फोट होते, याचे उत्तर निवडणुकीपूर्वीच मिळण्याची शक्यता आहे.
दिल्लीच्या निवडणुकीमध्ये आप आणि काँग्रेसने एकमेकांविरोधात तलवार उपसली आहे. दोन्ही पक्ष समोरासमोर आलेले असताना अरविंद केजरीवाल यांच्याकडून काँग्रेसवर हल्ला करण्याची एकही संधी सोडली जात नाही. केजरीवालांविरोधात काँग्रेस नेत्याने तक्रार दिल्यानंतर वाद आणखी उफाळून आला आहे. काँग्रेस नेते अजय माकन यांनी अरविंद केजरीवाल यांना देशद्रोही म्हटले आहे. तसेच माकन यांनी केजरीवाल यांना फ्रॉड किंग म्हणजेच सर्वात मोठा फसवणूक करणारा संबोधले. केजरीवाल यांची एका शब्दात व्याख्या करायची असेल तर तो शब्द ’फर्जीवाल’ असेल, असे माकन यांनी म्हटले आहे. लोकसभा निवडणुकीसाठी आपसोबत युती करणे ही काँग्रेसची चूक होती, जी आता सुधारली पाहिजे, असेही माकन म्हणाले. मात्र, हे त्यांचे वैयक्तिक मत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. काँग्रेसच्या वतीने आप आणि भाजपविरोधात 12 कलमी श्वेतपत्रिका जारी करताना माकन यांनी या गोष्टी सांगितल्या. एवढेच नाही तर काँग्रेसने संदीप दीक्षित यांना केजरीवालांच्या विरोधात उभे केले आहे. त्यामुळे आपचा संताप अनावर झाला आहे. त्यामुळे इंडिया आघाडीतून काँगे्रसला काढून टाकण्यासाठी आपने पावले टाकण्यास सुरूवात केली आहे.
अजन माकन यांच्यावर कारवाई करावी :मुख्यमंत्री आतिशी
दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी आणि खासदार संजय सिंह गुरुवारी म्हणाले, ’काँग्रेस नेते अजय माकन आमचे नेते अरविंद केजरीवाल यांना देशद्रोही म्हणतात. असा आरोप त्यांनी भाजपच्या कोणत्या नेत्यावर केला होता का? आतिशी पुढे म्हणाल्या की, आम्ही काँग्रेस पक्षाकडे माकन यांच्यावर 24 तासांत कारवाई करण्याची मागणी करतो. अन्यथा आम्ही काँग्रेस पक्षाला इंडियातून वेगळे काढण्यासाठी इतर विरोधी पक्षांशी बोलू. तर दुसरीकडे संजय सिंह म्हणाले की, दिल्लीत काँग्रेस पक्ष भाजपच्या बाजूने उभा राहिला आहे. निवडणुकीत भाजपला फायदा होईल असे सर्व काही काँग्रेस करत आहे. अजय माकन हे दिल्लीतील काँग्रेसचे नेते आहेत. ते भाजपची स्क्रिप्ट वाचतात. भाजपच्या इशार्यावर काम करतात, असा आरोप करण्यात आला आहे.
COMMENTS