Homeताज्या बातम्यासंपादकीय

संविधान महासभा आणि राहुल गांधी!

आगामी २०२४ च्या लोकसभा निवडणुका लक्षात घेऊन सर्व विरोधी पक्ष एकवटण्याची प्राथमिक सुरुवात, काँग्रेस प्रणित इंडिया आघाडीच्या माध्यमातून देशभरात सुर

सुखवस्तू जीवनशैलीचा कर्मचारी वर्ग !
राजकीय किंमत न चुकवण्याची खेळी !
विषमता ही अशीही….. 

आगामी २०२४ च्या लोकसभा निवडणुका लक्षात घेऊन सर्व विरोधी पक्ष एकवटण्याची प्राथमिक सुरुवात, काँग्रेस प्रणित इंडिया आघाडीच्या माध्यमातून देशभरात सुरू झाली. यात अनेक प्रादेशिक पक्ष सामील झाले. संविधान बचावची हाक देत उभारली गेलेली इंडिया आघाडीत मात्र, फुले आंबेडकरवादवादी विचारांचे असणारे दोन प्रमुख पक्ष अद्यापही सामील नाहीत; त्यात उत्तर प्रदेशचा बहुजन समाज पक्ष आणि महाराष्ट्रातला ऍड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडी! मात्र आता वंचित बहुजन आघाडीचे नेते ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषद घेऊन जाहीर केल्याप्रमाणे येत्या २५ नोव्हेंबरला शिवाजी पार्क येथे वंचित बहुजन आघाडी तर्फे संविधान महासभा घेतली जाणार आहे. या महासभेसाठी त्यांनी इंडिया आघाडीचे तथा काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना निमंत्रित केले आहे. अर्थात, काँग्रेसकडून किंवा राहुल गांधी कडून अद्यापही या गोष्टीला दुजोरा मिळाला नाही. परंतु, यात तर्क करण्यासारखी एक बाब अशी की राहुल गांधी सारख्या राष्ट्रीय पातळीवर अतिशय काटेकोर वेळापत्रक असणाऱ्या नेत्याला अवघ्या पाच-सहा दिवसात पाचारण करणे किंवा निमंत्रित करणे कसे शक्य आहे? हा प्रश्न जसा उभा राहतो, तसाच दुसरा एक प्रश्न या निमित्ताने उभा राहतो की, तरीही वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून घेतली जाणारी संविधान महासभा ही गर्दीचा उच्चांक मोडणारी असणार, हे निश्चित असल्यामुळे राहुल गांधी या महासभेला येण्याचे निमंत्रण अवघ्या काही तासात देखील स्वीकारू शकतात! ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही. २०२४ च्या लोकसभा निवडणुका या देशाच्या दृष्टीने अतिशय निर्णायक असणार आहेत.  संविधान दिनानिमित्त होणारी संविधान महासभा आणि त्या ठिकाणी त्याच तीन दिवसात म्हणजे महाराष्ट्रात आणि देशभरात संयुक्त किसान मोर्चा आणि कामगार संयुक्त आघाडी यांच्या माध्यमातूनही जिल्हा पातळीवर सत्याग्रह मोर्चे आणि रॅली होणार आहेत. या संघटनांचा एक भरीव मोर्चा मुंबईत आयोजित केला गेला होता. मात्र, या मोर्चाला एक लाख शेतकरी आणि कामगार मुंबईत मोर्चाच्या निमित्ताने येणार होते. परंतु, त्या मोर्चाला परवानगी नाकारली गेल्यामुळे हा मोर्चा आता प्रत्येक जिल्ह्यात मोर्चाच्या आणि सत्याग्रहाच्या रूपात आंदोलन करणार आहे. दुसऱ्या बाजूला ऍड. प्रकाश आंबेडकर यांची महासभा होणार असल्यामुळे एकूणच व्यवस्थेवर ताण  येऊ नये, यासाठी प्रशासनाने कदाचित काळजी घेतली असावी. एकंदरीत संविधान दिनाच्या निमित्ताने मुंबई महाराष्ट्र आणि सबंध देशात मोठ्या प्रमाणात आंदोलन होणार आहे.  भारतीय समाज आता लोकशाहीच्या दृष्टीने किती प्रगल्भ झाला आहे, याची झलक या निमित्त आपल्या सगळ्यांना दिसेल. संविधान महासभेच्या निमित्ताने राहुल गांधी जर मुंबईत आले तर, निश्चितपणे इंडिया आघाडीची ताकद महाराष्ट्रात वाढल्याशिवाय राहणार नाही. अर्थात, महाविकास आघाडीमधील घटक पक्ष असणारा शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडी यांची आधीच आघाडी झाली आहे. राहुल गांधी जर संविधान महासभेला आलेच तर, महाविकास आघाडीचा आणखी एक प्रमुख घटक म्हणून वंचित बहुजन आघाडी सामिल होईल!

COMMENTS