Homeताज्या बातम्यासंपादकीय

राष्ट्रवादीतील कलह

राष्ट्रवादी काँगे्रसमध्ये उभी फूट पडल्यानंतर अजित पवार गटाने आपल्या पक्षाचे मुंबईत चिंतन शिबीर घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँगे्रसचे नियोजित शिबीर श

क्रीडाक्षेत्रातील लैंगिक शोषण
चलनप्रतिमाचे राजकारण
कर्मचारी कपातीचे संकट

राष्ट्रवादी काँगे्रसमध्ये उभी फूट पडल्यानंतर अजित पवार गटाने आपल्या पक्षाचे मुंबईत चिंतन शिबीर घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँगे्रसचे नियोजित शिबीर शिर्डी येथे संपन्न होत आहे. मात्र या शिबिरात अजित पवार गटावर पक्षातील नेत्यांनी चांगलेच तोंडसुख घेतल्यामुळे दोन्ही गटातील संघर्ष भविष्यात उफाळून येण्याची शक्यता आहे. वास्तविक पाहता गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राचे राजकारण अस्थिर होतांना दिसून येत असून, आगामी निवडणूका पार पडेपर्यंत राजकीय वातावरण असेच गढूळ राहण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँगे्रसच्या या शिबिरात आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार आणि खासदार सुनील तटकरे यांना व्हिलन ठरवत त्यांच्यावर चांगलेच तोंडसुख घेतले. तर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी चिमटे काढत थेट आणि जहरी टीका अजित पवार गटावर करणे टाळले. त्यामुळे जयंत पाटील अजूनही अजित पवार गटांविषयी सॉफ्ट कार्नर ठेवून आहेत. उद्या जर अजित पवार गटासोबत जायची वेळ आली तर जास्त ताणायला नको, म्हणून त्यांनी घणाघाती टीका करण्याऐवजी चिमटे घेण्यातच धन्यता मानल्याचे दिसून येत आहे. याउलट जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार गटाला थेट अंगावर घेतले आहे, असेच म्हणावे लागणार आहे. यासोबतच आव्हाडांनी एक धार्मिक वादही ओढवून घेतला आहे. तो म्हणजे राम हा शाकाहारी नसून मांसाहारी होता, तो वनवासात असतांना जंगलात त्याला शाकाहारी काय मिळणार, असे म्हणत राम बहुजनांचा असल्याचा दावा आव्हाड यांनी केला आहे. विशेष म्हणजे आव्हाडांनी भारतासारख्या धार्मिक देशात, ज्यादेशात प्रत्येकाच्या भावना धर्माशी जोडलेल्या आहेत अशा विभूतीपूजक देशामध्ये असे विधान करणे म्हणजे, एका नव्या वादाला जन्म देण्यासारखे आहे. त्यामुळे आव्हाडांनी असे विधान टाळायला हवे, त्याचबरोबर अशा विधानांनी धार्मिक वातावरण ढवळून त्याचा फटका त्यांना आणि किंबहूना पक्षाला बसणारा आहे. त्यामुळे हातावर कुर्‍हाड पाडून घेण्याऐवजी असे धार्मिक वाद टाळण्याची गरज आहे. याचबरोबर त्यांनी सुनील तटकरे यांना नटसम्राटची पदवी दिली आहे. खरंतर तटकरे नेहमी शरद पवारांच्या घरी यायचे आणि म्हणायचे पवारसाहेब चला जाऊयाना भाजपसोबत. खरंतर या आतल्या बाबी काय आहेत, याची जाणीव सामान्य कार्यकर्त्यांना नाही. त्यामुळे पक्षातील आतल्या बाबी, त्याचबरोबर भाजपसोबत जायची अजित पवारांची रणनीती या त्यांचा अतर्गत मुद्दा असला तरी, पक्ष कुणाचा हा प्रश्‍न उरतोच. एकीकडे अजित पवार गट देखील राष्ट्रवादी काँगे्रस म्हणूनच मिरवतांना दिसून येत आहे. तर शरद पवारांचा पक्ष देखील राष्ट्रवादी काँगे्रस म्हणूनच मिरवतांना दिसून येत आहे. त्यामुळे जोपर्यंत निवडणुका होत नाही, जोपर्यंत निवडणूक आयोग पक्ष कुणाचा याचा निर्णय देत नाही, तोपर्यंत राजकीय वातावरण असेच गढूळ राहण्याची शक्यता आहे. जोपर्यंत लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निवडणुका होत नाहीत, तोपर्यंत राजकीय वातावरण असेच गढूळ होण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी देखील जानेवारीच्या अखेरपर्यंत राज्यात पुन्हा एकदा राजकीय भूकंप होण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यांनी काँगे्रसचे घर फुटणार असल्याचा दावा केला आहे. अर्थात त्यांचा अप्रत्यक्ष रोख हा अशोक चव्हाणांकडे असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे भविष्यात कोण कोणत्या पक्षात असेल, हे सांगता येत नाही. मात्र राज्याचे राजकीय राजकारण पुढील काही दिवसांमध्ये बदलण्याची शक्यता आहे, अनेक पक्षांमध्ये राजकीय भूकंप होईल, इकडचे आमदार तिकडे, आणि तिकडचे आमदार इकडे होईल, भाजपकडून पुन्हा ऑपरेशन लोटस राबविण्यात येईल, तपासयंत्रणांचे छापे असेच सुरू राहील, मात्र या सर्व बाबी निवडणूक होईपर्यंत निवळणार नाही, यात शंका नाही. 

COMMENTS