आ. राणेंचे नगर लक्ष ठरणार…विखे-जगतापांना अडचणीचे?

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आ. राणेंचे नगर लक्ष ठरणार…विखे-जगतापांना अडचणीचे?

व्यापार्‍यांना दिलासा करणार किमया, राजकीय परिणामांची उत्सुकता

अहमदनगर/प्रतिनिधी :राहुरी तालुक्यातील ब्राह्मणीचे धर्मांतर, नगरमधील लव्ह जिहाद व नगरच्याच कापड बाजारातील व्यापारी व हॉकर्स यांच्यातील संघर्ष अशा तीन

पाथर्डी नगरपालिकेच्या शहर पथविक्रेता समिती निवडणुकीमध्ये काँग्रेसची मुसंडी
वीजबिल वसुलीच्या कामाला गती द्या ; सहव्यवस्थापकीय संचालक प्रसाद रेशमे यांचे निर्देश
जागतिक कीर्तीचे बुद्धिबळपटू घडवण्यासाठी सहकार्य करू ः विवेक कोल्हे

अहमदनगर/प्रतिनिधी :राहुरी तालुक्यातील ब्राह्मणीचे धर्मांतर, नगरमधील लव्ह जिहाद व नगरच्याच कापड बाजारातील व्यापारी व हॉकर्स यांच्यातील संघर्ष अशा तीन विषयांत भाजपचे आ. नितेश राणे यांनी घातलेले लक्ष नगर शहर व जिल्ह्यातील राजकीय धुरिणांना अस्वस्थ करणारे आहे. विशेषतः नगर शहरात पक्षविरहित राजकीय मैत्रीचा मळा फुलवण्याचे राजकारण करणारे भाजपचे खा. डॉ. सुजय विखे व राष्ट्रवादीचे आ. संग्राम जगताप यांची आ. राणेंमुळे राजकीय अडचण होणार आहे. नगर शहरातील आक्रमक हिंदुत्व राजकारणातील पोकळी भरून काढण्याच्यादृष्टीने विचार केला तर आ. राणे यांची आक्रमक भाषाशैली फिट्ट बसणारी आहे. अर्थात ते हक्काचे मतदारसंघ असलेला कोकण पट्टा वा मुंबई सोडून नगरला येतील की नाही, हा पहिला प्रश्‍न असणार आहे. मात्र, त्यांनी जर नगरवर लक्ष केंद्रीत केले तर मग खा. विखे व आ. जगतापांसह सर्वांचीच अडचण मात्र होणार आहे.

राहुरी तालुक्यातील ब्राह्मणीच्या धर्मांतर प्रकरणासंदर्भात आ. राणे हे नुकतेच नगरला येऊन गेले. या धर्मांतराच्या घटनेबाबत जिल्ह्यातील कोणताही नेता काहीही बोलला नाही. राहुरीचे आमदार व उर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या मतदारसंघातील या विषयावर त्यांचे विरोधक भाजपचे माजी आमदार शिवाजी कर्डिलेही गप्प राहिले आहेत. अशा स्थितीत मुंबईतून प्रदेश भाजपद्वारे आ. राणे व खा. अमर साबळे या जोडगोळीला येथे या प्रकरणासाठी पाठवले जाते, ही जिल्हा भाजपच्यादृष्टीने नामुष्कीची बाब झाली आहे.  मागच्या भाजपच्या सत्तेच्या काळात आमदार असलेले कर्डिले, प्रा. राम शिंदे, बाळासाहेब मुरकुटे, वैभव पिचड व स्नेहलता कोल्हे असे तब्बल पाचजण अडीच वर्षांपूर्वीच्या विधानसभा निवडणुकीत पराभूत झाल्याचा धक्का अजूनही जिल्हा भाजपला पचवता आला नसल्याचे दिसत असल्याने व जिल्ह्यात घडणार्‍या राजकीय, सामाजिक आणि गुन्हेगारीविषयक बाबींवर जिल्ह्यातील भाजपचा कोणताही नेता परखड भाष्य करीत नसल्याने अखेर जिल्ह्याची जबाबदारी दिलेले माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिले पाऊल आक्रमक नितेश राणेंना जिल्ह्यात पाठवून उचलले असल्याचे दिसत आहे. राणेंनीही नगरला येत आक्रमकपणे धर्मांतर, लव्ह जिहाद व व्यापारी-हॉकर्स विषय प्रशासन आणि पोलिसांसमोर मांडले व हा नितेश राणे परत समजवायला येत नसतो, असा गर्भीत इशाराही दिला. परिणामी, त्यांचा पहिला दणका यशस्वी झाला आहे. ब्राम्हणीच्या धर्मांतर प्रकरणाला बेदखल केलेल्या पोलिसांनी अखेर या प्रकरणी विनयभंगाचा का होईना, पण गुन्हा दाखल केला आहे. आता प्रतीक्षा आहे ती लव्ह जिहाद प्रकरणातील बेपत्ता मुलीला शोधण्याची व व्यापारी-हॉकर्स वादात अंतिम निर्णय घेण्याची.

जिल्हा भाजप थंड

जिल्ह्यात भाजपचे आ. राधाकृष्ण विखे, बबनराव पाचपुते व मोनिकाताई राजळे असे तीनच आमदार आहेत. यातील आ. विखे हे राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर व तेही राज्यस्तरीय विषयांवरच टीका व भाष्य करतात. पाचपुते व राजळे फारसे जाहीर भाष्य करीत नाहीत. तर दुसरीकडे भाजपचे नगरचे खा. डॉ. सुजय विखे यांची नगरमध्ये राष्ट्रवादीच्या आ. जगतापांशी तसेच पारनेरला शिवसेनेच्या काहीजणांशी असलेली मैत्री त्यांनाही स्थानिक स्तरावर विरोधकांविषयी फारसे टीकात्मक बोलू देत नाही. त्यामुळे तेही राज्यस्तरीय विषयांवरच भाष्य करून वेळ मारून नेतात. त्यात त्यांनी आता आगामी जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकांसह नगरपालिका निवडणुकांतून त्यांचे आजोबा (स्व.) बाळासाहेब विखे यांनी स्थापन केलेल्या जिल्हा विकास आघाडीचा गाडा नव्याने पुढे नेण्याचे व भाजपसमवेत अन्य पक्षांतील नाराजांना समवेत नेण्याचे मनसुबे रचले आहेत. मात्र, आ. राणे यापुढेही जिल्ह्याच्या प्रश्‍नांच्या निमित्ताने नगरला नियमितपणे येत राहिले तर मग खा. विखेंची जास्त अडचण होणार आहे. नगर शहर भाजपही जवळपास नगर शहर राष्ट्रवादीची बी टीम मानली जाते व नगर शहरातील पक्षाचे पदाधिकारीही शहरातील राजकीय व गुन्हेगारी घडामोडींवर फारसे भाष्य करीत नाहीत. त्यामुळे विखेंसह शहरातील भाजपही आ. राणेंमुळे अडचणीत येऊ शकते. या पार्श्‍वभूमीवर आ. राणेंचे राजकीय विरोधक म्हणून अशीच काहीशी स्थिती आ. जगतापांनाही नगर शहरात अनुभवास येण्याची शक्यता आहे. व्यापारी-हॉकर्स वादात त्यांच्या भूमिकेच्या उलटसुलट चर्चा सुरू असतात. अशा स्थितीत शहरातील आक्रमक हिंदुत्व नेतृत्वाची पोकळी भरण्याचा प्रयत्न आ. राणेंनी केला व त्यांनी लक्ष घातलेल्या व्यापारी-हॉकर्स वादात व्यापार्‍यांना दिलासा देणारे काही घडले तर मग जगतापासमोर स्थानिक अन्य पक्षीय विरोधकांसह हेही नवे राजकीय आव्हान असणार आहे.

तक्रारींचा भडीमार व समज चर्चेत

नगरमध्ये कापडबाजारासह संपूर्ण बाजारपेठेत अनधिकृत व्यवसाय करणारे फेरीवाले, हातगाडीवाले यांच्याविरोधात अहमदनगर व्यापारी महासंघाने व्यापक लढा उभारला आहे. बाजारपेठ कायमस्वरुपी अतिक्रमणमुक्त राहावी तसेच दहशत निर्माण करून व्यापार्‍यांना त्रास देणार्‍या प्रवृत्तींचा बीमोड करण्यासाठी प्रशासनाने कडक भूमिका घेण्याची मागणी करण्यात आली आहे. या पार्श्‍वभूमीवर त्यांना भेटलेल्या आ. राणेंवर व्यापार्‍यांनी तक्रारींचा भडीमार केला. महावीर उद्योग समूहाचे ओमप्रकाश बायड यांच्या दुकानासमोर हातगाडीवाल्यांनी अतिक्रमण केल्याचे सांगितल्यावर आ.राणे यांनी बायड यांची त्यांच्या दालनात जाऊन भेट घेत कुठल्याही प्रकारचा अन्याय होऊ देणार नाही असे सांगत, संबंधित अतिक्रमणधारकांना समजही दिली. नगरची बाजारपेठ राज्यात प्रसिध्द असून येथील व्यापार्‍यांना विनाकारण त्रास होणार असेल तर याविरोधात आवाज उठविण्याची ग्वाही त्यांनी दिली. तसेच यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून सरकार दरबारी आवाज उठवू असेही त्यांनी स्पष्ट केल्याची माहिती व्यापारी महासंघाचे अध्यक्ष ईश्‍वर बोरा व उपाध्यक्ष अभिमन्यू जाधव यांनी दिली. महापालिकेने तसेच प्रशासनाने बाजारपेठेतील फेरीवाले, हातगाडीवाले हटवले आहेत. मात्र आता काही हातगाडीवाले, पथारीवाले हे दुकानदारांना दमबाजी व धाक-दपटशाही करून दुकानासमोर जागा देण्यास हरकत नसल्याचे दाखले बळजबरीने लिहून घेत आहेत. वास्तविक सार्वजनिक रस्ते महापालिकेच्या अखत्यारित येत असताना अशा प्रकारे दुकानदारांना वेठीस धरुन ना-हरकत दाखले घेण्याचा प्रकार बेकायदेशीर आहे. गेल्या काही वर्षात बाजारपेठेत दहशतीचे वातावरण तयार केले जात असल्याने अनेक मोठी दुकाने स्थलांतरित झाली आहेत. अनेक जण रोजच्या त्रासाला कंटाळून बाहेर जाण्याच्या मनःस्थितीत आहे. त्यामुळे संपूर्ण बाजारपेठ उदध्वस्त होवून नामशेष होण्याच्या मार्गावर असल्याने व्यापारी देशोधडीला लागण्याची चिन्हे आहेत, व्यापार्‍यांना जागेबाबत तक्रारी करण्याच्या धमक्या देण्यात येत आहेत, अशाही अनेक तक्रारींचा पाढा आ. राणेंसमोर वाचला गेला व यात लक्ष घालण्याचे व नगरच्या बाजारपेठेतील व्यापार्‍यांच्या समस्यांबाबत आवाज उठवण्याचे आश्‍वासनही त्यांनी दिले आहे व लगेच या सर्व प्रकरणांबाबत मनपा आयुक्त, जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षकांशी स्वतंत्र चर्चाही केली आहे. त्यामुळे आ. राणेंनी नगर शहराच्या प्रश्‍नात घातलेले लक्ष कोणाला कितपत पचनी पडणार, हे पाहणे उत्सुकतेचे झाले आहे.–फोटो ओळीनगरमधील व्यापारी-हॉकर्स वादात लक्ष घालून व्यापार्‍यांना न्याय मिळवून देण्याची मागणी व्यापार्‍यांनी आ. नितेश राणे यांच्याकडे नुकतीच केली आहे.

COMMENTS