अहमदनगर/प्रतिनिधी ः विधान परिषदेच्या नाशिक पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याआधीच वेळापत्रक निश्चित झालेली पोलिस भरती सध्या

अहमदनगर/प्रतिनिधी ः विधान परिषदेच्या नाशिक पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याआधीच वेळापत्रक निश्चित झालेली पोलिस भरती सध्या नगरमध्ये सुरू आहे. पण दुसरी जिल्हा परिषदेची प्रस्तावित भरती आचारसंहितेमुळे लांबणीवर पडणार आहे. विधान परिषद निवडणूक झाल्यानंतर फेब्रुवारी 2023मध्ये या भरतीला मुहूर्त लागण्याची शक्यता आहे.
झेडपीच्या रिक्त जागांच्या 80 टक्के जागांसाठी जानेवारी महिन्यापासून भरती प्रक्रियेची तयारी सुरू होणार होती. मात्र, नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे सर्व काही ठप्प झाले आहे. राज्यातील नव्या शिंदे-फडणवीस सरकारने कोविडमुळे बंद पडलेल्या जिल्हा परिषदेच्या रिक्त जागांसाठी भरती प्रक्रियेला मान्यता दिली होती. त्यानुसार नोव्हेंबर 2022 ग्रामविकास विभागाने आदेश काढून भरती प्रक्रिया राबवण्यासाठी वेळापत्रक निश्चित करून दिले होते. पण ते वेळापत्रक आता आचारसंहिता संपल्यावर प्रत्यक्षात येण्याची शक्यता आहे.
ग्रामविकास विभागाच्या भरतीच्या वेळापत्रकानुसार भरतीसाठी डिसेंबर 2022 अखेर झेडपीच्या सर्व विभागांना त्यांचे बिंदू नामावली रोस्टर तपासून ते विभागीय आयुक्त यांच्याकडून मंजूर करून घेण्यास सांगण्यात आले होते. त्यानंतर प्रत्यक्ष भरतीसाठीची जाहिरात प्रसिध्द करणे कालावधी 1 आठवडा ठरवून तो 1 ते 7 फेब्रुवारीपर्यंत होता. त्यानंतर उमेदवारी अर्ज मागवणे 14 दिवस- 8 ते 22 फेब्रुवारी. उमेदवारी अर्जाची छाननी करणे वेळ 1 आठवडा- 23 फेब्रुवारी ते 1 मार्च. जिल्हा परिषद व जिल्हा निवड मंडळाने प्रत्यक्ष परीक्षेच्या आयोजनसंदर्भात कार्यवाही करणे 1 महिना- 6 मार्च ते 5 एप्रिल. पात्र उमेदवारांचे प्रवेशपत्र तयार करून संबंधित उमदेवारांना उपलब्ध करून देणे 1 आठवडा- 6 ते 13 एप्रिल. परीक्षेचे आयोजन करणे (ऑनलाईन /ऑफलाईन) 14 ते 30 एप्रिल आणि अंतिम निकाल जाहीर करणे व पात्र उमेदवारांना नियुक्ती आदेश देणे 1 महिना- 1 ते 31 मे असे वेळापत्रक ग्रामविकास विभागाने राज्यातील सर्व जिल्हा परिषदांना पाठवलेले होते. हे वेळापत्रक खरे तर विधान परिषदेची आचारसंहिता संपल्यानंतर प्रत्यक्षात येणारे आहे. त्यामुळे त्यावर अंमलबजावणी होणे शक्यही आहे. मात्र, आचारसंहिता काळात काही तांत्रिक बाबींची पूर्तता करण्यास अडचण आली तर जिल्हा परिषद भरतीचे वेळापत्रकही पुढे ढकलले जाण्याची शक्यता आहे.
साडे सहाशेवर जागा रिक्त – नगर जिल्हा परिषदेच्या एकूण रिक्त जागांच्या 80 टक्के जागा म्हणजे संभाव्य 1 हजार 200 जागांसाठी भरती होण्याची शक्यता होती. यासाठी जिल्हा परिषदेच्या 9 विभागांनी त्यांचे मंजूर कर्मचारी पद संख्येनुसार रोस्टर विभागीय आयुक्त यांच्याकडून तपासून घेतले आहे. नगर जिल्हा परिषदेच्या भरतीमध्ये सर्वाधिक जागा या आरोग्य विभागातील 612 आणि 31 अशा एकूण 648 जागा असून या जागांसाठी भरती होणार. या रिक्त जागा या आरोग्य सेवक पुरुष आणि महिला (हंगामी कर्मचारी, फवारणी कर्मचारी आणि अन्य कर्मचारी), औषध निर्माण अधिकारी यांचा आदिवासी भाग (पेसा) आदिवासी भागा बाहेरील (नॉनपेसा) यांचा समावेश आहे. यासह अन्य विभागातील रिक्त जागांचा समावेश आहे.
त्याही आचारसंहितेचे सावट – पदवीधर निवडणुकीनंतर फेबु्रवारी-मार्चमध्ये झेडपी आणि पंचायत समितीच्या निवडणुकांची आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास जिल्हा परिषदेच्या भरतीचे नियोजित वेळापत्रक बदलणार असून भरती प्रक्रिया पुढे ढकलावी लागणार आहे. यामुळे जिल्हा परिषदेच्या भरती प्रक्रियेसाठी इच्छुक उमेदवारांना आणखी काही महिने वाट पाहावी लागणार आहे, असे सध्या तरी दिसू लागले आहे. मात्र, जिल्हा परिषद व पंचायत समितींची गट-गण रचना आता नवे सरकार आल्याने बदलली गेली आहे. त्यामुळे जुनी आरक्षण सोडतही रद्द झाली आहे. या पार्श्वभूमीवर फेब्रुवारीच्या सुरुवातीस गट-गण आरक्षण प्रक्रिया सुरू झाली तर जिल्हा परिषद व पंचायत समित्या निवडणुका मार्च-एप्रिलमध्ये होण्याची शक्यता आहे. त्या दरम्यानच्या काळात जिल्हा परिषद नोकर भरती मार्गी लागू शकते, असेही काहींचे म्हणणे आहे.
COMMENTS