Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कॉ. बाबा आरगडे गौरव ग्रंथ प्रकाशित करणार

शेवगाव तालुका ः सामाजिक, साहित्यिक, सांस्कृतिक आणि राजकीय प्रबोधनाच्या चळवळीमध्ये सातत्याने पुरोगामी विचारांची कास धरून कॉ. बाबा आरगडे यांनी सहभा

नागवडेची बाजार भावाची घोषणा म्हणजे मृगजळ : केशवराव मगर
राज्यपुरस्कृत आवास योजनेत जामखेड अव्वल
अखेर गुरुकुल मंडळाचे सेनापती उतरले मैदानात ; छाननीत 25 अर्ज झाले बाद

शेवगाव तालुका ः सामाजिक, साहित्यिक, सांस्कृतिक आणि राजकीय प्रबोधनाच्या चळवळीमध्ये सातत्याने पुरोगामी विचारांची कास धरून कॉ. बाबा आरगडे यांनी सहभागी होऊन शेवटच्या माणसांना न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न केलेले आहेत, त्यांचे काम पुढील पिढीला कळावे यासाठी कॉ. बाबा आरगडे गौरव ग्रंथ प्रकाशित करण्यात येत आहे, अशी माहिती हमाल पंचायत चे जिल्हाध्यक्ष अविनाश घुले व शब्दगंधच्या संयोजन समितीचे अध्यक्ष, रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य ज्ञानदेव पांडुळे यांनी दिली.
       समाजाला दिशा देणारे अहमदनगर जिल्ह्यातील काही मान्यवर आहेत, त्यामध्ये कॉ. बाबा आरगडे यांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. त्यांनी डॉ. नरेंद्र दाभोळकर, डॉ. श्रीराम लागू, निळू फुले, सदाशिव अमरापुरकर यांच्या समवेत अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माध्यमातून अनेक यशस्वी लढे लढलेले आहेत. पूर्वी कॉ. गोविंदभाई पानसरे, कॉ. वकीलराव लंघे, कॉ. पी. बी. कडू पाटील तर आता कॉ. सुभाष लांडे पाटील, कॉ. आप्पासाहेब वाबळे यांच्या समवेत आजही कष्टकर्‍यांसाठीची रस्त्यावरील लढाई ते लढत आहेत. पूर्वी डॉ. बाबा आढाव, स्व. शंकरराव घुले स्व. आप्पा कोरपे  यांच्या समवेत सुरू केलेले कष्टकरी हमाल पंचायतचे कार्य आजही आमच्या सोबत राहून चालू ठेवले आहे. बिडी कामगारांचे नेते कॉ. राम रत्नाकर, शंकरराव न्यायपल्ली, लाल निशांन पक्षाचे कॉ. भास्करराव जाधव यांच्या सोबतही काम केलेल असून विडी कामगारांना आजही मार्गदर्शन करत आहेत. समाजासाठी अविरतपणे काम करत असलेला हा सामान्य माणूस अनेकांसाठी असामान्य ठरलेला आहे. अनेक सामाजिक वादविवादा सोबतच वैयक्तिक व कौटुंबिक प्रश्‍नही त्यांनी सोडवलेले आहेत. सामाजिक स्वास्थ टिकवण्यासाठी ते प्रयत्नशील राहिलेले आहेत. कॉ. बाबा आरगडे आता लवकरच वयाची 80 गाठत आहेत. हे औचित्य साधून सर्वांच्या सहकार्याने कॉ. बाबा आरगडे गौरव ग्रंथ शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या पुढाकाराने प्रकाशित करण्यात येत आहे. शब्दगंधचे संस्थापक सचिव सुनील गोसावी हे या ग्रंथाचे संपादन करत असून या ग्रंथासाठी कॉ.बाबा आरगडे यांच्या समवेत च्या आठवणी, फोटो व लेख  9921009750 या क्रमांकावर पाठवाव्यात, असे आवाहन शब्दगंध साहित्यिक परिषदेचे अध्यक्ष राजेंद्र उदागे, शर्मिला गोसावी, भगवान राऊत, पॉल भिंगारदिवे, भाऊसाहेब सावंत, प्रा. डॉ. किशोर धनवडे, नेवासा, हरिभाऊ नजन शेवगाव, प्रा. डॉ. अशोक कानडे, शाहीर भारत गाडेकर, पाथर्डी, कामगार संघटनेचे अ‍ॅड. कॉ. सुधीर टोकेकर यांनी केले आहे. यासंदर्भात एक संयोजन समिती स्थापन करण्यात येणार असून येत्या  3 ऑगस्ट, शनिवार रोजी दुपारी 4 वाजता हमाल पंचायत, अहमदनगर येथे निमंत्रितांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती शब्दगंधचे अध्यक्ष राजेंद्र उदागे यांनी दिली.

COMMENTS