बहुजन रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९४ व्या जयंतीनिमित्त त्यांना सर्वप्रथम कोटी कोटी वंदन. छत्रपती शिवाजी महाराजांचा लढा हा कोणत्या
बहुजन रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९४ व्या जयंतीनिमित्त त्यांना सर्वप्रथम कोटी कोटी वंदन. छत्रपती शिवाजी महाराजांचा लढा हा कोणत्या दृष्टिकोनातून समजून घ्यावा हा महाराष्ट्रासमोर आजही यक्षप्रश्न आहे. गोब्राह्मणप्रतिपालक म्हणणाऱ्यांनी त्यांना केवळ वरच्या जातींचे संरक्षक म्हणून प्रचार करतांना त्यांच्या ऐतिहासिक व्यक्तिमत्तवावर जसा अन्याय केला; तसा त्यांच्या स्वराज्याच्या काळात फंदफितुरीत अडकलेल्यांच्या परंपरेने त्यांना केवळ धर्मरक्षकाच्या प्रतिमेत अडकवून त्यांच्यावर अन्याय केला आहे. धर्मरक्षकाच्या प्रतिमेतून त्यांना केवळ हिंदुत्ववादी म्हणून उभे करणाऱ्यांनी राजकीय सत्तेत महाराष्ट्राच्या निर्मितीपासून राजकीय सत्तेत जम बसविला आहे. महाराजांचा इतिहास मात्र धर्म आणि जातवर्ण श्रेष्ठत्वाचा नसून सातव्या शतकापासून कर्मठ बनलेल्या जातीव्यवस्थेच्या निर्मूलनाचे उद्दिष्ट ठेवणारा होता. त्याशिवाय का त्यांनी शूद्रातिशूद्र मावळे गोळा केले? हिंदू धर्मव्यवस्थेत असलेल्या चातुर्वर्ण्य व्यवस्थेला त्यांनी अगदी प्रारंभीच सुरूंग लावला. त्यांच्या या क्रांतिकारी भूमिकेतून चार वर्णांच्या पलिकडे असणारे अस्पृश्य आणि ब्रिटिशांनी गुन्हेगार म्हणून नोंद केलेल्या जातींनाही त्यांनी आपल्या सोबत घेतले. अठरापगड जातींचे हे कडबोळे घेऊन स्वराज्याला गवसणी घालणारा हा महान राजा त्या निद्रिस्त समुहातल्या मावळ्यांमध्ये क्रांतीचे प्रेरणा निर्माण करतो, हेच महाराजांचे परमवैशिष्टे आहे. वर्षानुवर्षे अन्याया-अत्याचार सहन करित निपचित पडलेल्या समुदायात लढण्याची प्रेरणा निर्माण करणे हे वाटते तितके सोपे नाही. मनावर चढलेला राखेचा पापुद्रा केवळ फुंकर मारल्याने जात नाही. मावळ्यांच्या व्यक्तिमत्त्वात असलेल्या क्रांतीच्या ठिणग्या पेटवून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची क्रांती साध्य केली. एक राज्यकर्ता म्हणून त्यांनी आपल्या प्रजेत कोणताही भेदभाव केला नाही. ब्राह्मण, कायस्थ, ठाकूर, वैश्य याबरोबरच शूद्र अस्पृश्य, आदिवासी, गुन्हेगार जाती, मुस्लिम या सर्वांना त्यांनी आपल्या राज्यकारभारात विविध पदे दिली. सामाजिक न्यायाचा इतका प्रखर आदर्श आजच्या लोकशाही राजकीय व्यवस्थेतही कधी साधला जाताना दिसत नाही. याचे कारण, छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्विकारलेले समतेचे तत्व आजच्या आधुनिक राज्यकर्त्यांनी मनापासून स्विकारले नाही; ना त्यांची ती स्विकारण्याची ईच्छा आहे! प्रजा ही आपले सर्वस्व आहे, हे तत्व केवळ मान्य करून नव्हे, तर, त्याची सर्वंकष अंमलबजावणी करून महाराजांनी आपल्या राज्याचा कैवार नेमका काय, हे कृतीतून दाखवून दिले होते.
छत्रपती शिवाजी महाराज आपल्या राज्यात समतेची ही पराकाष्ठा करित असताना दुसऱ्या बाजूला त्यांच्या राजदरबारात प्रत्यक्ष मोठ्या पदांवर असणारे ब्राह्मण, कायस्थ आणि मराठा यांच्या सत्ता-मलिदासाठी मात्र संघर्ष असायचा. राजदरबारी प्रशासनात सर्वोच्च पदे घेऊनही ब्राह्मण समुदाय कायस्थांकडे त्यावेळी बांधकाम विभाग सोपविल्यामुळे नाराज होता. त्यामुळे, ब्राह्मण – कायस्थ संघर्ष तिथे होताच. तर, आजही आपल्या प्रजेला वाऱ्यावर सोडून पक्षांतर करणाऱ्या मराठा प्रवृत्ती त्याकाळात महाराजांविरूध्द फंदफितुरी करून इतर परकीय राजांना जाऊन मिळण्याचे कारस्थान त्याकाळीही करित होते. मावळ्यांनी महाराजांना कायम ताकद दिली. परंतु, राजदरबारात नोकऱ्या आणि मानाची पदे सांभाळणाऱ्यांनी महाराजांशी दगाबाजी केल्याची उदाहरणे इतिहासात पानापानांत भरून आहेत. शिवाजी महाराज यांचा लढा चौपदरी होता. महाराजांना क्षत्रिय नसल्याचे म्हणून राज्याभिषेक नाकारणाऱ्या व्यवस्थेशी जसा तो होता; तसा, राज्यकर्ते म्हणून अधिक भूभाग व्यापण्याऱ्या मोगलांच्या सत्तेविरुद्धही होता! त्याचवेळी, परकीय आक्रमणकारी इंग्रजांविरुद्ध तर त्यांचा लढा तितकाच तीव्रतम होता! या सगळ्या बाह्य लढ्यांना पुरून उरणारे महाराजांना स्वकीयांनी अधिक ग्रासले. पुत्र द्वयांमध्ये दुफळी निर्माण करणाऱ्या शक्तींनी ग्रासले! महाराजांना आणि त्यांचे पुत्र महाराज द्वय संभाजी महाराज आणि राजाराम महाराज यांच्यात निर्माण केलेली वितुष्टे इतिहासाच्या पानावरून अज्ञात राहीली नाहीत! स्वराज्य आणि समता यासाठी लढणाऱ्या महाराजांचा इतिहास आजही आम्ही नीटपणे समजून घेऊ शकलो नाही. हा इतिहास समजून घेण्यास ज्यादिवशी आम्ही सुरूवात करू तो क्षण महाराजांना खरे अभिवादन करणारा क्षण ठरेल!
COMMENTS