धनादेशाऐवजी ‘ऑनलाइन’ वीजबिल भरण्याचे महावितरणचे आवाहनपुणे / प्रतिनिधी : महावितरणचे वीजबिल भरण्यासाठी ‘ऑनलाईन’द्वारे विविध पर्याय उपलब्ध असतानाही
धनादेशाऐवजी ‘ऑनलाइन’ वीजबिल भरण्याचे महावितरणचे आवाहन
पुणे / प्रतिनिधी : महावितरणचे वीजबिल भरण्यासाठी ‘ऑनलाईन’द्वारे विविध पर्याय उपलब्ध असतानाही गेल्या सहा महिन्यांत पश्चिम महाराष्ट्रातील लघुदाब ग्राहकांनी वीजबिलांपोटी दिलेले 41 कोटी 89 लाख रुपयांचे 16 हजार 141 धनादेश विविध कारणांमुळे बाऊंस झाले आहेत. त्यामुळे या ग्राहकांना बँक अॅडमिनिस्ट्रेशन चार्जेस म्हणून तब्बल 1 कोटी 21 लाख 5 हजार 750 रुपयांचा नाहक दंड तसेच 1.25 टक्के विलंब आकार शुल्क देखील भरावे लागले आहे. त्यामुळे धनादेशाऐवजी घरबसल्या ‘ऑनलाइन’ वीजबिल भरणा फायद्याचे झाले आहे. पुणे प्रादेशिक विभागांतर्गत गेल्या सहा महिन्यांत पुणे जिल्ह्यात सर्वाधिक 12 हजार 543 धनादेश बाऊंस झाल्याने बँक अॅडमिनिस्ट्रेशन चार्जेसचे 94 लाख 7 हजार 250 रुपये भरावे लागले आहे. तर सातारा 488 धनादेश अनादरीत झाल्याने 3 लाख 66 हजार रुपये, सोलापूर 894 धनादेश बाऊंस झाल्याने 6 लाख 70 हजार 500 रुपये, कोल्हापूर 1722 धनादेश बाऊंस झाल्याने 12 लाख 91 हजार 500 आणि सांगली जिल्ह्यात 494 धनादेश बाऊंस झाल्याने 3 लाख 70 हजार 500 रुपये ग्राहकांना भरावे लागले आहे.
वीजबिल भरण्यासाठी ‘ऑनलाइन’सह ‘ईसीएस’, ‘एनईएफटी’, ‘आरटीजीएस’ असे विविध पर्याय उपलब्ध आहेत. मात्र, गेल्या सहा महिन्यांत पश्चिम महाराष्ट्रात दरमहा सरासरी 2690 धनादेश अनादरित झाले आहेत. त्यामुळे लघुदाब ग्राहकांनी धनादेशाऐवजी ‘ऑनलाईन’द्वारे वीजबिलांचा भरणा करावा असे आवाहन पुणे प्रादेशिक संचालक भुजंग खंदारे यांनी केले आहे.
अनादरीत धनादेशासाठी चुकीची तारीख, खाडाखोड, चुकीची स्वाक्षरी, चुकीचे नाव, संबंधीत खात्यात रक्कम नसणे आदी कारणे दिसून येत आहेत. अनादरीत धनादेशाद्वारे अनेक वीजबिलांचा एकत्रित भरणा केला असल्यास प्रत्येक वीजबिलासाठी दंडात्मक रक्कम व विलंब आकार लावण्यात येत आहे. त्यानुसार प्रत्येक वीजबिलासाठी 750/- रुपये बँक अॅडमिनिस्ट्रेशन चार्जेस व 1.25 टक्के विलंब आकार पुढील महिन्याच्या वीजबिलात इतर आकार म्हणून समाविष्ट करण्यात येत आहे.
धनादेश दिल्यानंतर तो क्लिअर होण्यासाठी साधारणतः तीन ते पाच दिवसांचा कालावधी लागतो. धनादेशाची रक्कम जमा झाल्याच्या तारखेलाच वीजबिल भरणा ग्राह्य धरला जातो. याउलट पश्चिम महाराष्ट्रामध्ये दर महिन्याला राज्यात सर्वाधिक 42 लाख 12 हजार (79 टक्के) लघुदाब वीजग्राहक सरासरी 1195 कोटी 70 लाख रुपयांच्या (80 टक्के) वीजबिलांचा घरबसल्या व सुरक्षितपणे भरणा करत आहेत.
महावितरणकडून लघुदाबाच्या घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक व इतर ग्राहकांना घरबसल्या वीजबिल भरण्यासाठी ‘ऑनलाईन’द्वारे क्रेडीट कार्ड, डेबीट कार्ड, युपीआय, भीम, इंटरनेट बॅकींग, मोबाईल वॉलेट, मोबाईल बॅकिंगची सोय उपलब्ध आहे व प्रत्येक वीजबिलासाठी 0.25 टक्के (500 रुपयांच्या मर्यादेत) सूट देण्यात येत आहे. यासोबतच दरमहा थेट बँक खात्यातून इलेक्ट्रॉनिक क्लिअरन्स सिस्टीम (ईसीएस) आणि 5 हजार रुपयांपेक्षा अधिक वीजबिलासाठी ‘आरटीजीएस’ किंवा ‘एनईएफटी’द्वारे वीजबिल भरण्याची सुविधा आहे.
COMMENTS