Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी केंद्र शासन कटिबद्ध – केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान

मुक्त विद्यापीठाच्या कृषी विज्ञान केंद्रातर्फे ‘किसान सुसंवाद’ कार्यक्रम   नाशिक (प्रतिनिधी) : देशातील सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी पं

नांदेडमध्ये फळ विक्रत्याने तरुणाचे दोन्ही हात छाटले
Aurangabad : महिला अत्याचारा विरोधात वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन (Video)
मांजरीचे पिल्लू समजून चिमुकल्यांनी खेळवले बिबट्याचे बछडे
मुक्त विद्यापीठाच्या कृषी विज्ञान केंद्रातर्फे ‘किसान सुसंवाद’ कार्यक्रम
 
नाशिक (प्रतिनिधी) : देशातील सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र शासन विविध उपक्रम प्रभावीपणे राबवित आहे. भारत सरकारच्या कृषी मंत्रालयासोबतच सिंचन, पशुपालन यांसारखे पूरक विभाग तसेच देशातील कृषी विज्ञान केंद्रे शेतकऱ्यांच्या हितासाठी कटिबद्ध आहेत. ‘विकसित भारत – जी रामजी’ योजनेअंतर्गत शेतीला पूरक कामांना प्राधान्य देण्यात येणार आहे, असे प्रतिपादन केंद्रीय कृषी, शेतकरी कल्याण व ग्रामीण विकास मंत्री नामदार शिवराजसिंह चौहान यांनी केले.
 
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कृषी विज्ञान केंद्रातर्फे आयोजित ‘किसान सुसंवाद’ कार्यक्रमात ते बोलत होते.
 
या कार्यक्रमास व्यासपीठावर विद्यापीठाचे माननीय कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे, प्र-कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन, भारतीय कृषी अनुसंधान परिषद, नवी दिल्लीचे सहाय्यक महानिदेशक डॉ. राजश्री रॉय बर्मन, कृषी प्राद्योगिकी अनुसंधान संस्थान व भारतीय कृषी अनुसंधान परिषद, नवी दिल्लीचे संचालक डॉ. एस. के. रॉय, विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. गोविंद कतलाकुटे, महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या विस्तार व प्रशिक्षण विभागाचे संचालक श्री. रफिक नायकवाडी, भारतीय कृषी अनुसंधान परिषद, नवी दिल्लीचे शास्त्रज्ञ डॉ. शाकीर अली सय्यद तसेच कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. नितिन ठोके यांची प्रमुख उपस्थिती होती.
 
केंद्रीय मंत्री श्री. चौहान पुढे म्हणाले, “प्रत्येक शेतकऱ्यामध्ये आम्ही देव पाहतो. शेतकऱ्यांची सेवा हीच ईश्वरसेवा आहे. विज्ञानाने कितीही प्रगती केली तरी शेतकरी कष्ट करून जे उत्पादन करतो ते कोणतेही मशीन, ए.आय. किंवा रोबोट निर्माण करू शकत नाही.”
 
शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या मालासाठी प्रक्रिया केंद्रे (प्रोसेसिंग युनिट्स) उभारण्यासाठी केंद्र शासनाकडून आवश्यक सहकार्य करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक योजना व उपक्रम अस्तित्वात असले तरी काही शेतकऱ्यांपर्यंत त्यांची संपूर्ण माहिती पोहोचत नाही, तसेच काही योजनांना मर्यादा असल्याचे त्यांनी नमूद केले. शेतमालावरील प्रक्रिया केंद्रे तसेच इतर शेतीविषयक प्रश्नांबाबत राज्य शासनाशी चर्चा करून योग्य तोडगा काढण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.
 
लहरी हवामान आणि कमी क्षेत्रफळाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी एकात्मिक शेती पद्धतीचा अवलंब करावा, असे आवाहन करत त्यांनी शेतीत केवळ एकच पीक न घेता पिकांसोबत पशुपालन, कुक्कुटपालन, मत्स्यपालन, मधमाशीपालन, फळे, फुले व भाजीपाला यांसारख्या विविध पूरक व्यवसायांची सांगड घालण्याचे महत्त्व विशद केले.
 
यावेळी नामदार श्री. चौहान यांच्या हस्ते मुक्त विद्यापीठाच्या कृषी विज्ञान केंद्रातर्फे विकसित करण्यात आलेल्या ‘यश मायक्रो-न्यूट्रिएंट्स ग्रेड–२’ या सूक्ष्म अन्नद्रव्ययुक्त कृषी खाद्य उत्पादनाचे लोकार्पण करण्यात आले.
 
कार्यक्रमानिमित्त आयोजित महिला स्वयंसहायता बचत गट तसेच शेतीविषयक विविध स्टॉल्सना भेट देत त्यांनी महिला व शेतकरी बांधवांशी संवाद साधला. त्यानंतर त्यांच्या हस्ते कृषी विज्ञान केंद्राच्या परिसरात बहावा वृक्षाचे रोपण करण्यात आले.
 
केंद्रीय मंत्री श्री. चौहान यांच्या प्रत्यक्ष भाषणापूर्वी पेठ येथील श्री. यशवंत गावंडे (शेतीमाल प्रक्रिया केंद्रे), जानोरी येथील श्री. गणेश वाघ (फुलबागा शीतगृह अनुदान), नाशिक येथील श्री. रवींद्र अमृतकर (शेतीतील यांत्रिकीकरणाचे लाभ) तसेच अजमेर सौंदाणे येथील श्री. नानाभाऊ पवार (कांदापीक) यांनी आपापल्या विषयांवर मंत्री महोदयांशी संवाद साधला.
 
मुक्त विद्यापीठाच्या कृषी विज्ञान केंद्राच्या माजी विद्यार्थिनी व यशस्वी मशरूम उद्योजिका श्रीमती वैशाली उदार यांचा केंद्रीय मंत्री श्री. चौहान यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
 
कार्यक्रमाची सुरुवात ‘वंदे मातरम्’ गीताने झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यापीठाचे माननीय कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे यांनी केले. त्यांच्या हस्ते मंत्री श्री. चौहान यांचा स्वागतपर सत्कार करण्यात आला. डॉ. शाम कडूस पाटील यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. कार्यक्रमास शेतकरी, महिला बचतगट सदस्य तसेच विद्यापीठाचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS