स्वातंत्र्याची पंच्याहत्तरी साजरी करताना !

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

स्वातंत्र्याची पंच्याहत्तरी साजरी करताना !

    स्वातंत्र्याचा ७५ वा महोत्सव साजरा करताना देशात एक उत्साह आणि आनंद आहे. देशाच्या पाऊनशे वर्षाच्या इतिहासात राजकीय आणि आर्थिक चढउतार देशाने पाहिले

विरोधकांनाही प्रभावित करणाऱ्या कार्यनिष्ठा!
सावित्रीमाईं’चा महाराष्ट्र !
ओबीसींचा पेंडूलम करण्याची नौटंकी आवरा! अन्यथा…

    स्वातंत्र्याचा ७५ वा महोत्सव साजरा करताना देशात एक उत्साह आणि आनंद आहे. देशाच्या पाऊनशे वर्षाच्या इतिहासात राजकीय आणि आर्थिक चढउतार देशाने पाहिले. देश घडविण्यासाठी राष्ट्रनिर्माण करणाऱ्या राष्ट्रपुरूषांची समर्पित पिढी आजच्या स्वातंत्र्योत्तर काळातील पिढीला पाहता आली नसली तरी, इतिहासाच्या पानात या गोष्टी वाचया येतील. त्याच पिढीने देशाचा राष्ट्रध्वज ठरवला. तोच राष्ट्रध्वज आज देशातील घराघरावर डौलाने लहरतो आहे. अर्थात राष्ट्रध्वजाचा महोत्सव जेव्हा व्यापक प्रमाणात साजरा केला जातो, तेव्हा त्याच्या संहितेसंदर्भात नागरिकांच्या लोकशिक्षणाअभावी काही चुका होतीलच; पण त्यांचा बाऊ करण्यात फारसा अर्थ नाही. देशासमोर जी आव्हाने असतात ती पेलण्यासाठी आणि सोडविण्यासाठी देशातील लोक एकमय भावनेने प्रेरित होऊन पुढे यावेत, ही बाब अधिक महत्वाची. त्यादृष्टीने असा राष्ट्रीय महोत्सव आवश्यक आहे. भारताला स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्षे झाली. स्वातंत्र्य मिळवण्यासाठी ज्या पिढीने लढा दिला त्यातील हयात असणाऱ्यांची संख्या आता हाताच्या बोटावर मोजण्याइतकी असावी. अर्थात जीवनाच्या अंतिम क्षणात ही पिढी असेल. परंतु, ज्यांची स्वातंत्र्य आंदोलनातील व्यक्तिमत्त्व म्हणून नाव घ्यावे, अशी विख्यात व्यक्तिमत्व आज हयात नाहीत. अशावेळी त्या राष्ट्र योद्ध्यांना अभिवादन करण्यासाठी आम्ही देश किंवा राष्ट्र म्हणून एकमय भावनेने वाटचाल करणे, हे त्यांच्याप्रति खरे अभिवादन ठरेल. अर्थात, देश म्हणजे देशातील माणसे या उक्तिप्रमाणे माणसाची पहिली भावना कृतज्ञतेचीच असते. आज संपूर्ण राष्ट्र आपल्याला स्वतंत्र राष्ट्र मिळवून देणाऱ्या पिढीच्या प्रति जी कृतज्ञता व्यक्त करित आहे, ते पाहताना एक भारतीय म्हणून अभिमान वाटतो. कारण, या जगात आपल्या स्वतंत्र देशाइतकं काहीही महत्वाचं नाही. आमच्या स्वतंत्र देशात आमची काळजी घेणारी एक व्यवस्था असते. आरोग्य, शिक्षण, रोजगार, निवारा या बाबी देशातील नागरिकांना उपलब्ध करून देण्यासाठी सरकार नावाची एक कटीबद्ध व्यवस्था असते. जसं की, आपण जवळपास अडीच वर्षांनंतर कोरोनापासून थोडेसे बाहेर आलोय. अर्थात त्या मानसिकतेतूनही बाहेर पडत आहोत. या कोरोना काळात एक सरकार म्हणून वर्तमान केंद्र सरकारने देशाच्या नागरिकांना किमान मोफत रेशन दिले. कोणताही आधार नसलेल्या कोट्यवधी भारतीय जनतेला, ज्यांना या काळात कोणताही रोजगार नव्हता, अशा नागरिकांना याचे महत्त्व पटते. सरकारला मायबाप हे संबोधन त्यामुळेच प्राप्त झाले आहे. आपल्या नागरिकांची प्रतिकूल परिस्थितीत नुसती काळजी घेणं नव्हे तर प्रत्यक्षात त्यांना जगणे सुसह्य होईल एवढे देणे, ही बाब एका स्वतंत्र राष्ट्रातच साध्य होऊ शकते. त्यासाठी स्वातंत्र्य किती महत्वाचे असते याची जाण ठेवून हि कृतज्ञता व्यक्त करित असतानाच त्या राष्ट्रपुरुषांच्या पिढीने काही ध्येय उद्दीष्टे आपल्यासाठी निश्चित केली होती, त्याचे एक स्मरणही आपल्याला यानिमित्ताने करायला हवे. स्वातंत्र्य मिळवून देत राष्ट्र घडविणाऱ्या त्या पिढीने जी ध्येय-उद्दिष्टे साध्य करावयाची त्याचा एक आराखडाही स्वतंत्र भारताच्या संविधानात नमूद केला आहे. आरोग्य, शिक्षण, रोजगार आणि निवारा या मूलभूत गरजा भागल्यानंतरच पुढचा विकास साध्य करण्याचा प्रयत्न करावा लागतो. आज केंद्रातील मोदी सरकारने या दिशेने चांगलं प्रयत्न चालवले आहेत, हे आपणास मान्य करायला हवे. सर्वसामान्य भारतीयांना मोफत आरोग्य सेवा पुरवणारी आरोग्यासाठी राष्ट्रीय योजना असो, घरासाठी किमान अडीच लाखाचे अनुदान असो, उज्वला गॅस, हर घर जल, दुर्गम भागातील कुटूंबांना वीज कनेक्शन, शेतकऱ्यांना थेट खात्यावर मदत पोहचविणे अशा अनेक बाबींचा आपल्याला यात उल्लेख करता येईल. कोणत्याही सरकारचे कार्य,  त्या देशातील सर्वसामान्य जनतेसाठी काय केले किंवा केले जात आहे, यावरूनच समजून घेतले पाहिजे. त्यादिशेने मोदी सरकारने एक चांगले कार्य राष्ट्रीय पातळीवर केले आहे, हे या स्वातंत्र्यदिनाच्या अमृतमहोत्सवी सोहळ्यानिमित्त मान्य करायला हवे.

COMMENTS