राज्यातील राजकीय कोलाहलमध्ये सध्या काय सुरू आहे, याचा भल्याभल्यांना अंदाज बांधता येत नसला तरी, भाजप सध्यातरी आपल्या मित्रपक्षांना सांभाळतांना दिस
राज्यातील राजकीय कोलाहलमध्ये सध्या काय सुरू आहे, याचा भल्याभल्यांना अंदाज बांधता येत नसला तरी, भाजप सध्यातरी आपल्या मित्रपक्षांना सांभाळतांना दिसून येत आहे. त्यासाठी आपल्या आमदारांना काही न देता, मित्रपक्षांच्या आमदारांना सांभाळण्यात त्यांना देण्यात प्राधान्य देतांना दिसून येत आहे. याचे ताजे उदाहरण म्हणजे पालकमंत्रिपदाचा तिढा भाजपने सोडवला असून, यामध्ये राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना झुकते माप देण्यात आले आहे. खरंतर पुण्याचे पालकमंत्रीपद मिळण्यसाठी अजित पवार नेहमीच आग्रही होते. खरंतर जसं नागपूर हातात असायला यासाठी भाजप नेहमीच आग्रही राहत आला आहे, त्याचप्रकारे पुणे, मुंबई आणि नागपूर ही तीन शहरे ताब्यात ठेवण्यासाठी सर्वच पक्ष आग्रही असतात. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे, त्यामुळे राजधानीमध्ये सर्वाधिक आमदार आणि खासदार आणि मुंंबई महापालिका ताब्यात असेल तर, राज्यातील राजकारण करणे सोपे जाते, त्याचबरोबर नागपूर ताब्यात असेल तर, भाजपसाठी संघाच्या माध्यमातून आगामी राजकीय वाटचाल ठरवणे सहज सोपे जाते, तर पुणे शहर सांस्कृतिकदृष्टया अतिशय महत्वाचे आहे, त्यामुळे पुणे शहर आणि जिल्ह्यावर कमांड असेल, तर पुढील राजकीय गणिते सोपी जातात, त्यामुळे या जिल्ह्यांवर कमान मिळवण्यासाठी अनेक नेते प्रयत्नशील असतात. अजित पवार आता सत्तेमध्ये सहभागी झाल्यामुळे त्यांना पुण्याचे पालकमंत्रीपद हवे होते. तर याउलट या पदावर चंद्रकांतदादा पाटील असल्यामुळे कुणाचे आदेश पाळायचे अशी गोची प्रशासकीय अधिकार्यांची होत होती. अजित पवार उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री, तर दुसरीकडे चंद्रकांतदादा पालकमंत्री त्यामुळे जिल्हा नियोजन बैठकीमध्ये संघर्ष होतांना दिसून येत होता. अजित पवार पालकमंत्र्यांचे निर्णय फिरवत होते, तर दुसरीकडे चंद्रकांतदादा आपण पालकमंत्री असतांना, आपले निर्णय कसे मानले जात नाही, यावर त्यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडेच तक्रारी केल्या होत्या. मात्र यावर तोडगा निघण्याऐवजी चंद्रकांतदादांना थेट सोलापूर आणि अमरावतीचे पालकमंत्रीपद देण्यात आले आहे. एकतर चंद्रकांतदादा पुण्यातून निवडून आले आहे. त्यामुळे या मतदारसंघात आगामी निवडणूक लढवण्यासाठी चंद्रकांतदादांसाठी पुरेसे अनुकूल मत नसतांना, त्यांना सोलापूर आणि अमरावतीचे पालकमंत्रीपद दिल्यामुळे त्यांना आगामी निवडणुकीत विजय मिळवणे अवघड होणार आहे. शिवाय अजित पवार यांना पालकमंत्रीपद मिळाल्याने अजित पवार आपल्या आमदारांना आणि सहकार्यांना रसद पुरवणार यात शंकाच नाही. मात्र यानिमित्ताने एका दादाला बळ मिळाले असले तरी, दुसर्या दादांचे मात्र खच्चीकरण केल्याचे दिसून येत आहे. बरं चंद्रकांतदांदाना पुण्याच्या पालकमंत्रीवरून गच्छती केल्यानंतर आता कोल्हापूरचे पालकमंत्रीपद तरी द्यायला हवे होते, मात्र कोल्हापूरचे पालकमंत्रीपद हसन मुश्रीफ यांना देण्यात आले आहे. त्यामुळे अजित पवार गटाला झुकते माप देण्यात आले असून, शिंदे गटाला आणि भाजपला देखील कमी महत्व देण्यात आल्याचे दिसून येत आहे. नाशिकचे पालकमंत्रीपद देखील छगन भुजबळांना मिळाले असते, मात्र अजित पवार आणि छगन भुजबळ यांच्यात ओबीसी संघर्षावरून उडालेला खटका यामुळे भुजबळांना पालकमंत्रीपद देण्यात अजित पवारांनीच जोर लावला नसल्याचे बोलले जात आहे. अजूनही मंत्रिमंडळाचा विस्तार रखडलेला आहे, त्यामुळे राज्यात मंत्रिमंडळ विस्तार होण्याला कधी मुहूर्त लागेल ते आत्ताच सांगता येत नसले तरी, राज्यातील आमदारांच्या अपात्रतेवरची टांगती तलवार संपुष्टात आल्यानंतर पुढील हालचाली होणार असल्याचे दिसून येत आहे. एकतर गेल्या काही दिवसांपासून आमदार बच्चू कडू यांनी भाजपविरोधात जोरदार आक्रमक पवित्रा घेतला आहे. भाजप अफजलखान असून, ते ज्यांना मिठी मारतात, त्यांना संपवतात अशा शब्दांमध्ये तीव्र टीका केली आहे. त्यामुळे एकीकडे भाजपमध्ये द्वंद वाढत असतांना, दुसरीकडे भाजपने दादांना झुकते माप दिल्याने भाजपमध्येच असंतोष वाढतांना दिसून येत आहे.
COMMENTS