मुंबई/प्रतिनिधी ः ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे दोन दिवसांसाठी विदर्भाच्या दौर्यावर होते, यावेळी त्यांनी नागपूरच्या सभेत देवेंद्र फडणवीस हे नाग
मुंबई/प्रतिनिधी ः ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे दोन दिवसांसाठी विदर्भाच्या दौर्यावर होते, यावेळी त्यांनी नागपूरच्या सभेत देवेंद्र फडणवीस हे नागपूरसाठी ’कलंक’ असे म्हटल्यानंतर मोठा राजकीय गदारोळ तयार झाला होता. त्यानंतर भाजपकडून उद्धव ठाकरेंवर टीकेची झोड उठवण्यात आली होती, त्याला उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेवून प्रत्युत्तर दिले. यावेळी ठाकरे यांनी थेट भारतीय जनता पक्षाचा कारभार हा महाराष्ट्राच्या संस्कृतीसाठी कलंक असल्याची घणाघाती टीका केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कडवे टीकाकार व गुजरातचे माजी मुख्यमंत्री शंकरसिंह वाघेला यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे काहीतरी बोलतील असा अंदाज होता. मात्र, त्यांनी भाजपकडून होणार्या टीकेचा समाचार घेतला. ‘देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी मी वापरलेला ‘कलंक’ हा शब्द कोणाला लागण्याचे कारण नाही. महाराष्ट्रातील त्यांचा आणि भाजपचा कारभार पाहिला तर यापेक्षा वेगळा शब्द असू शकत नाही. दुसर्यांवर वाट्टेल ते आरोप करायचे, कुटुंबाची निंदानालस्ती करायची, ईडी आणि सीबीआयच्या धाडी टाकायच्या, लोकांच्या नजरेत इतरांना व त्यांच्या बायकामुलांना बदनाम करायचे आणि त्यानंतर राजकीय स्वार्थासाठी त्यांच्याशीच मैत्री करायची. त्यांच्याच मांडीला मांडी लावून बसायचे. हा कारभार महाराष्ट्रासाठी कलंकच आहे,’ असे उद्धव ठाकरे म्हणाले. कोणावरही टीका करताना मला आनंद होत नाही. मात्र, समोरच्यांनीही काही तरी भान राखले पाहिजे. भाजपचे अनेक लोक माझ्यावर, माझ्या कुटुंबावर खालच्या पातळीवर जाऊन टीका करता. माझ्या शस्त्रक्रियेचीही खिल्ली उडवतात. गळ्यातल्या पट्ट्याबद्दल बोलतात आणि ह्यांना त्यांच्या कलंकित कारभाराची जाणीव करून दिली तरी ते थयथयाट करतात,’ असा टोला त्यांनी भाजपला लगावला.
तुम्हाला वाटेल तो डाकू, तुम्ही कराल तो देव, मग तुम्ही कोण? – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते टिळक पुरस्कार दिला जाणार आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील उपस्थित राहणार आहेत. त्यावरूनही उद्धव ठाकरे यांनी भाजपवर टीका केली. ‘याच पंतप्रधानांनी अलीकडे पवारांवर 70 हजार कोटींच्या घोटाळ्याचे आरोप केले होते. आता त्यांच्याचकडून मोदी पुरस्कार स्वीकारणार आहेत. मग शरद पवारांवर केलेल्या आरोपांचे काय,’ असा रोकडा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला. एखाद्यावर आरोप करत असाल तर त्यांना जागा. केवळ घाबरवून त्याला आपल्या पक्षात आणण्यासाठी त्याची बदनामी करू नका, असे उद्धव ठाकरे म्हणाले. ‘संजय राऊत, अनिल परब यांना विनाकारण छळले जात आहे. कशासाठी चालले हे सगळे? तुम्ही म्हणाल तो संत, तुम्हाला वाटेल तो डाकू, तुम्ही कराल तो देव. मग तुम्ही कोण?,’ असा मार्मिक सवालही उद्धव ठाकरे यांनी केल्यामुळे ठाकरे गट विरुद्ध भाजप असा संघर्ष चिघळण्याची शक्यता आहे.
COMMENTS