अमरावती : शहर बंदला हिंसक वळण लागल्यानंतर अमरावतीमध्ये दंगल उसळली. त्यामुळे सध्या अमरावती शहरात संचारबंदी असून पोलिसांनी आरोपींची धरपकड सुरू केली आहे
अमरावती : शहर बंदला हिंसक वळण लागल्यानंतर अमरावतीमध्ये दंगल उसळली. त्यामुळे सध्या अमरावती शहरात संचारबंदी असून पोलिसांनी आरोपींची धरपकड सुरू केली आहे. बुधवारी भाजपचे माजी पालकमंत्री जगदीश गुप्ता, माजी राज्यमंत्री प्रविण पोटे यांच्या 15 जणांना अटक करण्यात आली आहे.
त्रिपुरा येथील कथित घटनेचा निषेध नोंदविण्यासाठी अमरावतीमध्ये आंदोलन करण्यात आले. याच घटनेचा निषेध नोंदविण्यासाठी काही हिंदूत्ववादी संघटना आणि भाजपने शहर बंदची हाक दिली होती. या बंदला हिंसक वळण लागले. यामध्ये दुकाने फोडण्यात आली. अनेक दुकानांची जाळपोळ करण्यात आली. तसेच काही ठिकाणी दगडफेक देखील झाली. त्यामुळे अमरावतीमध्ये चार दिवसांची संचारबंदी जाहीर करण्यात आली होती. तसेच कुठल्याही अफवा पसरू नये यासाठी इंटरनेट सुविधा देखील बंद ठेवण्यात आली आहे. आता भाजपचे माजी पालकमंत्री जगदीश गुप्ता, माजी राज्यमंत्री प्रविण पोटे यांच्यासह 15 जणांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये भाजप, विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या काही कार्यकर्त्यांचा समावेश आहे.शहरात तणावपूर्ण शांतता असून 19 नोव्हेंबरपर्यंत कर्फ्यू लावण्यात आला आहे. शहरात अजून दोन दिवस इंटरनेट सेवा बंद राहणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.
दोन दिवसांपूर्वी भाजप नेते अनिल बोंडे यांच्यासह 14 नेत्यांना अटक करण्यात आली होती. मिळालेली माहिती अशी की, भाजप नेते प्रवीण पोटे यांच्यासह 15 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. आतापर्यंत भाजपच्या 24 जणांना अटक करण्यात आली आहे. यापैकी 14 जणांची जामिनावर सुटका करण्यात आली आहे. पोलिसांना आतापर्यंत 125 पेक्षा जास्त जणांना अटक केली आहे. अमरावती हिंसाचारानंतर पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या आदेशानुसार 19 नोव्हेंबरपर्यंत शहरात कर्फ्यू लावण्यात आला आहे. तर 3 दिवसांसाठी अमरावतीत इंटरनेट सेवा बंद राहणार आहे. खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. जीवनावश्यक वस्तूंची दुकाने दुपारी 2 ते 4 वाजेपर्यंत उघडणार आहेत, अशी माहिती देण्यात आली आहे. गेल्या महिन्यात त्रिपुरामध्ये झालेल्या हिंसाचाराच्या विरोधात शुक्रवारी महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यात काही मुस्लिम संघटनांच्या निषेध प्रदर्शनादरम्यान अज्ञात व्यक्तींनी दुकानांवर दगडफेक केली. त्यानंतर परिसरातील अनेक भागात तणाव पसरला होता.
दोषींना सोडले जाणार नाही : गृहमंत्री वळसे पाटील
महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे म्हणाले, राज्यभरातील मुस्लिमांनी त्रिपुरातील हिंसाचाराचा निषेध केला होता. यादरम्यान नांदेड, मालेगाव, अमरावतीसह अनेक ठिकाणी दगडफेकीच्या घटना घडल्या. मी हिंदू आणि मुस्लिमांना शांतता राखण्याचे आवाहन केले. आता परिस्थिती नियंत्रणात आहे. मी स्वत: वरिष्ठ पोलिस अधिकार्यांच्या माध्यमातून यावर लक्ष ठेवून आहे. जर कोणी दोषी आढळले तर त्याला सोडले जाणार नाही.
पोटे यांचा काँग्रेस-राष्ट्रवादीला इशारा
आत्मसमर्ण करण्यापूर्वी प्रवीण पोटे माध्यमांशी संवाद साधतांना म्हणाले की, अमरावती शहरात इंटरनेट सेवा पूर्णपणे बंद केल्याने विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. राज्य सरकारने अमरावती शहरात काश्मीरसारखी परिस्थिती निर्माण केली आहे. पुढे ते म्हणाले की, हिंदू आपण पेटलेला पाहत आहोत. हिंदूंनी फक्त काडी दाखवली आहे, काडी मारलेली नाही. काडी मारली तर अख्खा हिंदुस्थान पेटल्याशिवाय राहणार नाही. प्रामुख्याने मी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला सांगतो की हिंदूंना चिरडू नये अन्यथा तुमचे आम्ही काहीही ठेवणार नाही. रझा अकादमीवर बंधने घातले नाही तर ते असेच सुरु राहणार, असेही यावेळी त्यांनी म्हटले.
COMMENTS