नांदेड । प्रतिनिधीनांदेड वाघाळा महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने स्पष्ट बहुमत मिळवत शहरावर आपले वर्चस्व सिद्ध केले असले,

नांदेड । प्रतिनिधी
नांदेड वाघाळा महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने स्पष्ट बहुमत मिळवत शहरावर आपले वर्चस्व सिद्ध केले असले, तरी शिवाजीनगर प्रभागातील निकालाने पक्षाच्या आनंदावर विरजण टाकले आहे. गड आला, पण सिंह गेला अशी अवस्था या प्रभागात निर्माण झाली असून, विजयाच्या जल्लोषातही आत्मपरीक्षणाची गरज अधोरेखित झाली आहे.
शिवाजीनगर प्रभागातील चारही उपप्रभागांत मतदारांनी समसमान संधी देत अत्यंत संतुलित कौल दिला. प्रभाग क्रमांक 8-अ मध्ये काँग्रेसचे सत्यपाल सावंत, 8-ब मध्ये काँग्रेसच्या परविन बेगम, तर 8-क मध्ये भाजपाच्या कविता गड्डम आणि 8-ड मध्ये भाजपाचे उमेशसिंह चव्हाण विजयी झाले. दोन जागांवर भाजप, तर दोन जागांवर काँग्रेसने बाजी मारत हा प्रभाग राजकीयदृष्ट्या निर्णायक ठरवला. विशेष म्हणजे, शिवाजीनगर हा भाजपसाठी प्रतिष्ठेचा प्रभाग मानला जातो. या भागात भाजपचे खासदार व निवडणूक प्रमुख, माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण तसेच भाजपाचे महानगराध्यक्ष व माजी आमदार अमरनाथ राजुरकर यांचे वास्तव्य आहे. त्यामुळे येथे भाजपला अपेक्षित असलेला एकतर्फी कौल न मिळणे, ही बाब पक्षासाठी चिंतनास कारणीभूत ठरली आहे. या प्रभागातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे भाजपच्या माजी महापौर मोहिनी येवनकर आणि संदीप सोनकांबळे या दोन्ही उमेदवारांचा पराभव. संघटनात्मक ताकद, नेतृत्वाची उपस्थिती आणि सत्तेचा प्रभाव असूनही झालेला हा पराभव स्थानिक पातळीवरील नाराजी, अंतर्गत मतभेद आणि प्रचारातील त्रुटी यांकडे निर्देश करणारा मानला जात आहे. एकीकडे संपूर्ण महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकत असताना, दुसरीकडे शिवाजीनगरचा निकाल पक्षाला आत्मपरीक्षण करायला लावणारा ठरला आहे. आगामी काळात स्थानिक प्रश्न, कार्यकर्त्यांचे मनोबल आणि संघटनात्मक बांधणी यावर नव्याने लक्ष देण्याची गरज या निकालातून स्पष्टपणे पुढे आली आहे.

COMMENTS