मुंबई : महायुती सरकारचा शपथविधी झाल्यानंतर नाराजीनाट्य मोठ्या प्रमाणावर रंगतांना दिसून येत आहे. राष्ट्रवादीतील ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना मंत्र
मुंबई : महायुती सरकारचा शपथविधी झाल्यानंतर नाराजीनाट्य मोठ्या प्रमाणावर रंगतांना दिसून येत आहे. राष्ट्रवादीतील ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळातून वगळल्यानंतर भुजबळांनी थेट जाहीर नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर आपण बुधवारी पुढे काय करायचे यासंदर्भातील निर्णय घेणार असल्याचे देखील त्यांनी जाहीर केले होते. त्यानुसार त्यांनी बुधवारी कार्यकर्त्यांना संबोधित करतांना उपमुख्यमंत्री अजित पवारांविरोधात रणशिंग फुंकले आहे. त्याचबरोबर राज्यव्यापी दौरा करून ओबीसींचा एल्गार पुकारण्याचा निर्णय देखील भुजबळ यांनी घेतला आहे.
यावेळी बोलतांना भुजबळ म्हणाले की, माझ्या मनात अवहेनेचे शल्य टोचत आहे. त्यामुळे मी आता राज्यव्यापी दौरा करून ओबीसींचा एल्गार पुकारण्याचा निर्णय घेतला आहे. भविष्यात आपल्यावर अनेक संकटे येतील, पण आपल्याला सावधपणे पुढे जावे लागेल, असे ते म्हणालेत. भविष्यातील राजकीय वाटचालीचा विचारपूर्वक निर्णय घेणार असल्याचेही ते यावेळी म्हणाले. मी मंत्रिपदावर नसलो तरी तुमच्यासोबत आहे. रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत मी तुमच्यासाठी संघर्ष करेल. हा संघर्ष करतानाच मी शेवटचा श्वास घेईल. त्यात मी कोणत्याही दबावाला बळी पडणार नाही. जिथे आपले प्रश्न असतील, तिथे आपण एकजुटीने राहू. मी कायम तुमच्यासोबत असेल. हिंमत ठेवा. वाटा पाहा. तोपर्यंत आपले काम सुरू ठेवा. कदाचित पुढे आणखी एखादे मोठे संकट येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आपल्याला एल्गार करावाच लागेल. विधानसभा निवडणुकीत लाडक्या बहिणींसोबत ओबीसी समाजाने भरभरून मतदान दिल्यामुळे हे सरकार आले. पण आता आपल्याबाबत वेगळा विचार केला जात आहे. परंतु अजून निवडणुका संपलेल्या नाहीत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत, असे म्हणत छगन भुजबळांनी यावेळी राष्ट्रवादीसह महायुतीलाही सूचक इशारा दिला आहे.
मेरा वक्त भी बदलेगा, तेरी राय भी बदलेगी
मला सध्या गावागावातून व जिल्ह्याजिल्ह्यातून फोन येत आहेत. भुजबळ साहेब या, ताकद वाढवा असे लोक म्हणत आहेत. हे खरे आहे. मी आता संपूर्ण राज्यात जाऊन ओबीसींचा एल्गार पुकारणार आहे. मी ओबीसींचा लढा आमदार म्हणून सभागृहात लढेल. तिथे कितीही बंधने आली तरी रस्ते आमच्यासाठी मोकळे आहेत. यावेळी त्यांनी मेरे बारे में कोई राय मत बनाना गालिब, एक ऐसा दौड आएगा मेरा वक्त भी बदलेगा, तेरी राय भी बदलेगी, अशी शायरी म्हणत आपल्या भविष्यातील वाटचालीचे संकेतही दिले.
COMMENTS