अहमदनगर/प्रतिनिधी : विविध गुन्ह्यात जप्त केलेली तसेच बेवारस अवस्थेत आढळलेली वाहने नगर तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीत धूळखात पडली असताना या वाहनांच्या
अहमदनगर/प्रतिनिधी : विविध गुन्ह्यात जप्त केलेली तसेच बेवारस अवस्थेत आढळलेली वाहने नगर तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीत धूळखात पडली असताना या वाहनांच्या मूळ मालकास शोधण्याची मोहीम नगर तालुका पोलिसांनी हाती घेऊन 105 वाहनांच्या मूळ मालकांना शोधण्याची कामगिरी केली आहे. नगर तालुका पोलिस ठाण्याच्या परिसरात वाहनांचे मालक मिळून येत नसल्यामुळे अनेक वाहने वर्षानुवर्षे मूळ मालकांच्या प्रतीक्षेत पोलिस ठाण्याच्या आवारात धूळखात पडून आहेत. त्यामुळे पोलिस ठाण्याचा परिसर बकाल दिसून येतो. त्यामुळे पोलिस ठाणे सुशोभिकरणास बाधा निर्माण होत आहे. ही बाब लक्षात घेऊन नगर तालुका पोलिस ठाण्याच्या पोलिसांनी या बेवारस वाहनांच्या मालकांचा शोध घेण्यासाठी पुढाकार घेतला. नगर तालुका पोलिस ठाणे परिसरात बेवारस तसेच विविध गुन्ह्यात जप्त केलेली वाहने यांच्या मूळ मालकांचा शोध घेऊन ती वाहने मूळ मालकास परत देण्याचा आदेश पोलिस स्टेशन प्रभारी अधिकार्यांना पोलिस अधीक्षकांनी दिले होते. त्या अनुषंगाने नगर तालुका पोलीस स्टेशन आवारातील अनेक वर्ष धूळखात पडलेल्या वाहनांच्या चेसीज व इंजिन नंबरवरून दोन दिवसांत एकूण 105 वाहन मालकांचा शोध मावळ तालुक्यातील परंदवाडी (जिल्हा पुणे) येथील गंगामाता वाहन शोध संस्थेच्या मदतीने पोलिसांनी लावला. ही कामगिरी नगर तालुका सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेंद्र सानप, मुद्देमाल कारकून पोलिस अंमलदार जे.बी. बांगर, होमगार्ड शुभम म्हस्के व गंगामाता वाहन शोध संस्थेचे अध्यक्ष राम उदावंत, उपाध्यक्ष बाबासाहेब बागडे, भारत वाघ, गोरख नवसुपे, संजय काळे यांनी केली आहे. दरम्यान, बाकी वाहन मालकांचा शोध लावण्यासाठी तपास चालू आहे.
ओळख पटवून वाहने न्यावीत
शोध लागलेल्या वाहनांच्या मालकांनी आपल्या वाहनांची ओळख पटवून व पुरावे देऊन वाहने परत घेऊन जाण्याबाबत आवाहन पोलिसांनी केले आहे. वाहन मालकांसाठी वाहन क्रमांक, चेसीज नंबर, वाहनाचा प्रकार, इंजिन नंबर, वाहन मालकाचे नाव, पत्ता याची यादी नगर तालुका पोलिस स्टेशन येथे लावण्यात आली आहे. मालकांनी ओळख पटवून आपले वाहन घेऊन जावे, असे आवाहन करण्यात आले आहे. गंगामाता वाहन शोध संस्थेच्यावतीनेही संबंधित 105 वाहन मालकांना संपर्क केला जाणार आहे. त्यामुळे वाहन मालकांनी तात्काळ नगर तालुका पोलीस स्टेशन (भिंगार, नगर) येथे वाहनाची कागदपत्रे व फोटो असलेले ओळखपत्र दाखवून आपली वाहने घेऊन जावीत. वाहन नेण्यास कोणी आले नाही तर संबंधित वाहन बेवारस समजून सरकारी प्रक्रिया पूर्ण करून त्यांचा लिलाव करण्यात येणार आहे, असे सहाय्यक पोलीस निरीक्षक सानप यांनी सांगितले.
COMMENTS