बनावट सोन्यावर दिलं अर्धा कोट कर्ज; 26 जणाविरुध्द फसवणुकीचा गुन्हा दाखलशिराळा / प्रतिनिधी : कोकरुड, ता. शिराळा येथील बँक ऑफ इंडियाच्या शाखेमध्य
बनावट सोन्यावर दिलं अर्धा कोट कर्ज; 26 जणाविरुध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल
शिराळा / प्रतिनिधी : कोकरुड, ता. शिराळा येथील बँक ऑफ इंडियाच्या शाखेमध्ये बनावट सोने तारण ठेवून बँकेची 57 लाख 61 हजार 498 रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी शिराळा, वाळवा व शाहूवाडी, तालुक्यातील 26 संशयितांविरोधात वेगवेगळ्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बँक ऑफ इंडिया कोकरुड शाखेचे शाखाधिकारी योगेश विलास देसाई (रा. वाळवा) यांनी कोकरुड पोलिसांत फिर्याद दिली आहे. संशयित विक्रम रघुनाथ जगताप व संजय अनंत पोतदार तसेच अन्य चोवीस असे एकूण 26 लोकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 26 डिसेंबर 2022 ते 4 डिसेंबर 2023 या कालावधीत वेग वेगळ्या तारखेस कोकरुड शाखेमध्ये 1731.10 ग्रॅम वजनाचे बनावट व नकली सोन्याचे दागिने खरे व शुध्द असल्याचे सांगून बँकेकडे ठेवले. त्यावर कर्जाऊ रक्कम घेऊन 56 लाख 61 हजार 498 रुपये व त्यावर होणारे व्याज अशी बँकेची आर्थिक फसवणूक केली आहे.
सोने तारण ठेवून कर्ज घेण्याकडे अनेकांचा कल वाढत आहे. खासगी वित्तीय संस्था आणि बँकांकडून सोने तारण कर्ज दिले जाते. मात्र, या गोल्ड लोनमध्ये बँकेलाच अर्ध्या कोटीचा जुना लावला आहे. बँकेच्या व्यवस्थापनाला या झोलची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी कारवाईसाठी पावले उचलली. या सगळ्या प्रकरणात बँकेच्या गोल्ड व्हॅल्यूवरची भूमिका संशयास्पद असल्याचे प्राथमिक माहिती बँकेच्या ग्राहकांकडून समोर आली.
काय आहे प्रकरण?
बँक ऑफ इंडियाच्या कोकरूड शाखेतून गोल्ड लोनमध्ये खोटं सोनं तारण ठेवून तब्बल अर्ध्या कोटीहून जास्तचे कर्ज घेतले. हे सोने तारण कर्ज वेगवेगळ्या ग्राहकांच्या नावे देण्यात आले आहे. दरवर्षी बँकेकडून सोन्याचे मूल्यांकन केले जाते. दरवर्षी हा संशयित गोल्ड व्हॅल्यूवर सोन्याची तपासणी करून बँकेला माहिती देत असे. हा गोल्ड व्हॅल्यूवर या खोट्या सोन्याला खरं सोने असल्याचे सांगत लोन अकाउंट अपडेट करायचा. या सगळ्या प्रकरणी बँकेचे व्यवस्थापन अंधारात होते का? मात्र, गोल्ड लोनच्या नावाखाली झोल सुरू असल्याची कुणकूण बँकेच्या अधिकार्यांना लागली. त्यानंतर बँकेच्या व्यवस्थापनाने त्याची चौकशी सुरू केली का? बँकेचे काही कर्मचारी यात गुंतले आहेत, अशी शंका आहे. म्हणून बँकेने ही कारवाई केली हा एक प्रश्न नागरिकांतून विचारला जात आहे.
बँकेकडून चौकशी
बँकेच्या व्यवस्थापनाला या प्रकरणाची कुणकूण लागल्यानंतर त्याची चौकशी सुरू झाली. या चौकशीत खोटे सोने तारण ठेवून अर्ध्या कोटीहून जास्तीचे कर्ज उचलले असल्याची माहिती समोर आली. बँकेच्या व्यवस्थापनाने दुसर्या गोल्ड व्हॅल्यूवरला बोलावून या सोन्याची तपासणी केली. त्यावेळी हे खोटे सोने बँकेला देऊन गोल्ड लोन घेतले असल्याची माहिती समोर आली. जवळपास चाळीसहून अधिक खात्यामध्ये खोटे सोने तारण ठेवले असल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर आता बँक व्यवस्थापनाने पुढील कारवाई करण्याच्या तयारी सुरू केल्यानंतर प्रत्येक खातेदाराशी संपर्क करून सदर घटनेची गांभीर्य आणि त्याबाबतचे दुष्परिणाम सांगून बँकेच्या अधिकार्यांनी ग्राहकांनी घेतलेल्या सोने तारण कर्जाची त्यांच्याकडून परतफेड करून घेण्यात आली.
बँकेचा गोल्ड व्हॅल्यूवर संशयाच्या भोवर्यात
या संपूर्ण प्रकरणात सोन्याची किंमत मोजणारा (गोल्ड व्हॅल्यूवर) विक्रम रघुनाथ जगताप (रा. इस्लामपूर, ता. वाळवा) तसेच संजय अनंत पोतदार (रा. कोकरूड, ता. शिराळा) या दोघांची भूमिका संशयास्पद असल्याचे बँक व्यवस्थापनास यातीलच काही ग्राहकांनी चौकशीला बोलवले असता सांगितले. विक्रम जगताप याचे कोकरूड येथे रुक्मिणी ज्वेलर्स या नावाने सोना चांदीचे दुकान आहे. या व्यवसायाच्या माध्यमातून त्याच्या संपर्कात असणारे त्याच्या दुकानचे ग्राहक आणि शिराळा व शाहूवाडी तालुक्यातील ओळखीच्या मित्रांच्या व इतरांच्या नावे बनावट सोने अस्सल असल्याचे सांगून सव्वीस जणांना बँकेकडून अर्ध्या कोटींचे कर्ज मिळवून दिले होते. नंतर ते त्यांच्याकडून स्वतः पैसे वापरण्यास घेतले असे यातील काही संशयित व फसवणूक झालेल्या व्यक्तींंनी व त्यांच्या नातेवाईकांनी सांगितल्या वरून ही बाब समोर आली आहे. अशी चर्चा सध्या या दोन्ही तालुक्यातील परिसरात सुरूआहे. मात्र, यातील खरं काय आणि खोटे काय हे तपासण्याचे काम पोलिसांच्या पुढे एक मोठे आव्हान तयार झाले आहे. सध्या बँकेतील इतर खात्यांचा तपास पूर्ण करून सोन्याची किंमत मोजणार्यां विरुध्द तसेच सोने तारण स्वरूपात बँकेकडून कर्जाऊ रक्कम घेणार्या अशा संशयित सव्वीस लोकांच्यावर कोकरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून याचा अधिक तपास कोकरूड पोलीस ठाण्याचे सपोनि संतोष गोसावी हे करत आहेत.
COMMENTS