मेकॉले हा विषय सध्या गाजतोय. अर्थात, मेकॉले च्या संदर्भात भारतात वेळोवेळी वाद उभे राहिले. मात्र, हे वाद उभे करण्यात परंपराग्रस्त असणाऱ्यांना अधिक

मेकॉले हा विषय सध्या गाजतोय. अर्थात, मेकॉले च्या संदर्भात भारतात वेळोवेळी वाद उभे राहिले. मात्र, हे वाद उभे करण्यात परंपराग्रस्त असणाऱ्यांना अधिक रस आहे. वास्तविक, महात्मा फुले यांच्यापासून बहुजन समाजाची ब्रिटिश भारतात शिक्षणाची सुरुवात झाली. आधुनिक आणि विज्ञानवादी शिक्षणातून महात्मा फुले यांनी या देशाचा इतिहास ज्ञात करून आपली विचारांची मांडणी केली. मेकॉले यांनी तयार केलेल्या शैक्षणिक अभ्यासातून महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षण घेतले. तत्वज्ञान, इतिहास, समाजशास्त्र, मानसशास्त्र, मानववंशशास्त्र, व्याकरण, उत्पत्तीशास्त्र, भाषा, साहित्य आदी सर्व प्रकार या महामानवांनी अभ्यासले. यासंदर्भामध्ये भारतातील सर्वच महापुरुषांनी इंग्रजी भाषेतून अभ्यास केला. आधुनिक ज्ञानाचा हा अभ्यास, प्रत्येक शिक्षित भारतीयाला जगाच्या अनुभवाशी जोडून गेला. इतकेच नव्हे, तर, जगाच्या ज्ञानवंत विद्वानांमध्ये त्यांचा समावेश झाला; ही बाब निश्चितच भारतासाठी गौरवास्पद आहे. मात्र, नेहमीसारखेच अलीकडे मेकाॅले यांच्यावरून उद्भवलेला वाद हा सर्वसामान्य भारतीयांना विचार करायला लावणारा आहे. खासकरून भारतामध्ये त्या जाती समूहांना शिक्षणाची अनुमती नव्हती जे जात समूह एकूण लोकसंख्येच्या ८५ टक्के आहेत. परंतु, त्यांना ब्रिटिशांचे शिक्षण येईपर्यंत वंचित ठेवण्यात आलेलं होतं. त्यामुळे, ब्रिटिशपूर्व भारतामध्ये शिक्षित आणि विद्वानांची परंपरा सम्राट अशोकानंतर खंडित झाली होती. तेव्हापासून सम्राट अशोकाच्या या देशामध्ये बहुजनांसाठी शिक्षण लुप्त झाले होते. त्या शिक्षणाची सुरुवात ब्रिटिश भारतात इंग्रजी भाषेपासून झाली. या शिक्षणाच्या मुहूर्तमेढीला मेकाॅले यांनी रुजवलं. थाॅमस बॉबीग्टंन मेकॉले यांनी ब्रिटिश भारतात भारतीयांना कसं आणि कोणतं शिक्षण द्यावं, यासाठी आराखडा तयार केला. या आराखड्यानुसारच भारतीयांना शिक्षण देण्यात आले. याच शिक्षणातून भारतात अनेक विद्वान तयार झाले. भारताची आधुनिक व्यवस्था या शिक्षणातून शिक्षित होऊन पुढे गेलेल्या भारतीयांनी विकसित केली. विज्ञान-तंत्रज्ञानाच्या आधारावरून उभा राहिलेला आजचा भारत, ही खरे तर इंग्रजीचं देण आहे. अर्थातच, ब्रिटिश भारतात मेकाॅलेच्या आराखड्यानुसार मिळालेल्या शिक्षणाची हे देण आहे! या संदर्भात विचार करताना आपल्याला एक बाब प्रामुख्याने लक्षात घ्यावी लागेल की, भारतीयांना मेकाॅले च्या इंडियातून जे शिक्षण मिळालं त्या शिक्षणाने त्यांचे जीवन वाया न जाता अधिक समृद्धीकडे गेले! मात्र, या आधुनिक शिक्षण व्यवस्थेला आणि जगाच्या ज्ञान भाषेला नाकारून आमच्या देशात बहुजन समाजाला पारंपारिक शिक्षण नाकारणाऱ्या व्यवस्थेच्या कडे पुन्हा आम्हाला घेऊन जायचं आहे का? हा प्रश्न या वादाच्या निमित्ताने पुन्हा एकदा उभा राहिला! वास्तविक, आज भारतातील जवळपास सर्वच जातीसमूहांनी इंग्रजीचं महत्त्व जाणलेलं आहे. त्याच्या ताकदीला जाणलेलं आहे. त्यामुळे, या भाषेतून शिक्षण घेऊन म्हणजेच वाघिणीचं दूध पिऊन भारतातील बहुजन समाजाची पाल्य गुरगुरत आहेत. ही भावना समस्त भारतीयांची आहे. त्याला पुन्हा गुरुकुल व्यवस्थेकडे नेणे म्हणजे इतिहासामधल्या अन्यायग्रस्त तमाम भारतीयांना शिक्षण नाकारणे हाच त्याचा अर्थ आहे. कोणतीही शिक्षण व्यवस्था वाईट असत नाही. परंतु, ज्या शिक्षण व्यवस्थेने समाजात समानता, मानवता आणि आधुनिकता निर्माण करता येऊ शकत नाही, असं शिक्षण कुचकामी असतं. परंपरेच्या आहारी जाऊन माणसाला माणूसपणापासूनच परावृत्त करणारी व्यवस्था ही आमच्या शैक्षणिक व्यवस्थेमध्ये यावी, असं कोणत्याही भारतीयाला वाटत नाही; वाटणार नाही! एकंदरीत, भारतीय शिक्षण व्यवस्था सध्या जी प्रचलित आहे, त्या व्यवस्थेत कोणताही दोष, विकसित समाजाला किंबहुना विकासाकडे डोळे लावून असणाऱ्या आधुनिक समाजाला दिसत नाही. याउलट भारतीयांची मानसिकता पारंपारिक विषमतावादी जाती व्यवस्थेत अडकल्याने ते संशोधनापासून चार हात लांब आहेत. त्यामुळे इंग्रजी भाषेला घेऊन जगात संशोधनाची प्रगती मोठ्या प्रमाणावर झाली. त्या इंग्रजी भाषेवर अधिराज्य करीत असतानाही भारताला संशोधन करण्याची मोठी संधी असतानाही, भारतीयांची पारंपारिक मानसिकता आधुनिक विज्ञान-तंत्रज्ञानामध्ये नवीन मोठमोठे संशोधन करू शकले नाही. याचा दोष इंग्रजी भाषेला देता येणार नाही आणि किंबहुना ही परकियांची भाषा आहे, असं सांगून ती भाषा नाकारता येणार नाही! याउलट, भारतीयांची गुलामीची मानसिकता प्रकट करणाऱ्या काही बाबी, ज्या भारतामध्ये ब्रिटिश सोडून गेले, त्यामध्ये अतिशय वरच्या स्वरूपाचे उदाहरण म्हणून जर घ्यायचं ठरलं तर, क्रिकेटचा खेळ! हा खेळ म्हणजे ब्रिटिशांनी भारतीयांवर लाभलेली गुलामीचं प्रतीक आहे! हा खेळ आम्ही सोडत नाही, याचं कारण याच्या मधलं अर्थकारण आम्हाला परावृत्त होऊ देत नाही. अर्थकारणाचा होणारा फायदा आणि व्यवस्थेमध्ये इतरांना नाकारले जाणारं स्वातंत्र्य, या दोन गोष्टींमध्ये पारंपारिक भारतीयांना रस आहे. त्या परंपरेवल आपले वर्तमान सत्ताधारी प्रतिनिधित्व करणार नाही, अशी अपेक्षा आपण बाळगूया!

COMMENTS