मुंबई : दुबईहून मुंबईत येणार्या विमानाच्या शौचालयात सिगारेट ओढल्याच्या आरोपावरून एका बांगलादेशी नागरिकाला मुंबई पोलिसांनी अटक केली. विमानात धूम्

मुंबई : दुबईहून मुंबईत येणार्या विमानाच्या शौचालयात सिगारेट ओढल्याच्या आरोपावरून एका बांगलादेशी नागरिकाला मुंबई पोलिसांनी अटक केली. विमानात धूम्रपान केल्याप्रकरणी प्रवाशाला अटक झाल्याची आठवड्याभरातील ही दुसरी घटना आहे. आरोपी कावसार हुसेन (27) हा कामानिमित्त दुबईला गेला होता. तो दुबईहून मुंबईला येत होता. पुढे मुंबई विमानतळावरून तो विमानाने ढाक्याला जाणार होता.
प्रवासादरम्यान मध्यरात्री मुख्य केबिन अटेंडंट रेश्मा शेख (27) यांना 8 सी आसन क्रमांकावरील प्रवासी बराच काळ जागेवर नसल्याचे लक्षात आले. तो शौचालयात गेला होता. त्यामुळे बाहेरून दरवाजा ठोकण्यात आला. त्यावेळी हुसेन शौचालयातून बाहेर आला. त्याने धूम्रपान केल्यामुळे शौचालयात धूर पसरला होता. विमानातील कर्मचार्यांनी शौचालयात जाऊन तपासले असता अर्धवट जळलेला सिगारेटचा तुकडा सापडला. याबाबत हुसेनला विचारणा केली असता त्याने धुम्रपान केल्याचे मान्य केले. हुसेनने त्याच्याकडील 12 सिगारेट व एक लायटर विमान कर्मचार्यांच्या स्वाधीन केले. याबाबतची माहिती शेख यांनी वैमानिकांना दिली. त्यानंतर विमान मुंबईत उतरल्यानंतर हुसेनला सहार पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. हुसेनने केलेल्या कृत्यामुळे इतर प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण झाला होता. हुसेनने विमान प्रवास नियम-1937 चे उल्लंघन केले. त्यानुसार सहार पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 336 (मानवी जीवन किंवा वैयक्तिक सुरक्षितता धोक्यात आणण्यासाठी निष्काळजीपणाचे कृत्य) आणि विमान नियम 1937 कलम 25 अंतर्गत गुन्हा दाखल केला. याप्रकरणानंतर सहार पोलिसांनी हुसेनला अटक केली.
COMMENTS