Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

गोळीबाराचे आदेश देणार्‍यांना मराठवाड्यात बंदी घाला

मनसेप्रमुख राज ठाकरेंची राज्य सरकारवर टीका

जालना/प्रतिनिधी : मराठा आंदोलकांवर लाठीहल्ला करणार्‍या पोलिसांचा काही दोष नसून, तो दोष आदेश देणार्‍यांचा आहे, त्यामुळे पोलिसांना टार्गेट करणे चुक

सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री झाल्यास आश्‍चर्य नको ः राज ठाकरे
जिना राष्ट्रवादी आणि टिळकांचे होते भक्त
राज ठाकरेंनी केली उद्धव ठाकरेंची भन्नाट नक्कल

जालना/प्रतिनिधी : मराठा आंदोलकांवर लाठीहल्ला करणार्‍या पोलिसांचा काही दोष नसून, तो दोष आदेश देणार्‍यांचा आहे, त्यामुळे पोलिसांना टार्गेट करणे चुकीचे आहे. त्यामुळे गोळीबाराचे आदेश देणार्‍यांना मराठवाड्यात बंदी घाला असे आवाहनच मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी मराठा आंदोलकांना केले. सोमवारी  राज ठाकरे यांनी उपोषकर्ते मनोज जरांगे यांची भेट घेतली आहे. यावेळी त्यांनी मराठा आंदोलकांना धीर देत शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली आहे. त्यामुळे आता यावरून भाजप-मनसेत आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडण्याची शक्यता आहे.
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी येथे उपोषणकर्त्यांची भेट घेतल्यानंतर ते बोलत होते. सोमवारी सकाळी सव्वाआठ वाजता ते चिकलठाणा विमानतळावर पोहोचले होते. त्यानंतर थेट आंदोलन स्थळाकडे रवाना झाले. राज ठाकरे यांनी आंदोलनस्थळी मनोज जरांगे यांची भेट घेतली. मराठा आंदोलकांसमोर बोलताना मनसे प्रमुख राज ठाकरे म्हणाले की, मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही, हे मी मराठा क्रांती मोर्चे निघत होते, त्याचवेळी सांगितले होते. हे सर्व राजकारणी तुमचा वापर करून घेतील. मराठा आरक्षण हा सर्वोच्च न्यायालयातला तिढा आहे, अशा काही कायदेशीर बाजू आपल्याला समजून घ्याव्या लागतील. परंतु आंदोलन सुरू असताना तुमच्यावर लाठीचार्ज आणि गोळीबाराचे आदेश कुणी द्यायला लावले?, ज्यांनी असे आदेश दिलेत, त्यांच्यावर मराठवाड्यात बंदी घालायला हवी, असे म्हणत राज ठाकरेंनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली आहे. आरक्षणाचे आमिष दाखवून सत्ताधारी बदलतात, सत्तेत आल्यानंतर हे लोक तुमच्यावर गोळ्या झाडणार, पोलिसांना दोष देऊ नका, पोलिसांना आदेश कुणी दिलेत, त्यांना दोष द्या. जे आदेश आले त्याचे पालन पोलिसांनी केले. आरक्षणावर राजकारण करत मते पदरात पाडून घेतली की तुम्हाला वार्‍यावर सोडून द्यायचे, असाच खेळ सध्या सुरू असल्याचे राज ठाकरे म्हणाले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षात असते तर त्यांनी आज काय केले असते?, मी काय आज इथे राजकारण करायला आलेलो नाही, तर मराठा आंदोलकांना विनंती करायला आलो, असेही राज ठाकरेंनी म्हटले आहे. पोलिसांनी माता-भगिनींवर लाठ्या बरसल्या, त्याचे फूटेज मी पाहिलेत. याबाबत मी लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहे. त्यात काय तोडगा निघेल, याबद्दल मला सध्या तरी काही सांगणे शक्य होणार नाही. मला खोटे बोलणे जमणार नाही. संबंधित लोकांशी बोलून विषय सुटण्यासारखा असेल मी नक्कीच प्रयत्न करणार असल्याचे राज ठाकरेंनी म्हटले आहे. तसेच आरक्षणाच्या मागणीसाठी टोकाचे पाऊल न उचलण्याचे आवाहनही राज ठाकरेंनी आंदोलकांना केले आहे.

फडणवीसांनी मराठा समाजाची माफी मागावी – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाची माफी मागावी, अशी मागणी मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी केली आहे. सत्तेत असताना या विषयावर बोलायचे नाही, आणि विरोधात गेल्यावर मागणी करायची, असेच आजपर्यंत राजकारणी करत असल्याचे राज ठाकरे यांनी म्हटले आहे. राजकारणी लोकांच्या नादी लागू नका, असे आवाहन देखील ठाकरे यांनी केले आहे.

COMMENTS