Homeताज्या बातम्या

महाराणी येसूबाईंच्या नावाने पुरस्कार हा शाहुनगरी फाऊंडेशनचा स्तुत्य उपक्रम : तेजस्वी सातपुते

सातारा / प्रतिनिधी : महाराणी येसूबाई यांचे कर्तृत्व मोठे होते. त्यांनी दाखवला संयम, दूरदर्शीपणा वाखाणण्याजोगा आहे. त्यांच्या कार्याचे स्मरण वारंव

महीलांनो घाबरु नका.. आपल्या सोबत जनसेवा फौंडेशन कायम सोबत आहे : सौ. शालिनीताई विखे पाटील
डोक्यात दांडा मारून एकाचा खून
गो फर्स्ट विमानसेवा दिवाळखोरीत

सातारा / प्रतिनिधी : महाराणी येसूबाई यांचे कर्तृत्व मोठे होते. त्यांनी दाखवला संयम, दूरदर्शीपणा वाखाणण्याजोगा आहे. त्यांच्या कार्याचे स्मरण वारंवार होणे गरजेचे असून नवीन पिढीपर्यंत पोहचणे आवश्यक आहे. त्यांच्या नावाने मिळालेला हा पुरस्कार मी आशीर्वाद म्हणून स्वीकारते. हा पुरस्कार सुरु करणे हा शाहुनगरी फाऊंडेशनचा स्तुत्य उपक्रम आहे. त्याचप्रमाणे स्वर्गीय श्री. छ. चंद्रलेखाराजे भोसले यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी श्री. छ. वृषालाराजे भोसले यांनी सुरु केलेले अनेक उपक्रम व्हावेत असेच पुढे सुरु रहावेत, अशी अपेक्षा सोलापूर ग्रामीणच्या पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी व्यक्त केली.
येथील शाहू कला मंदिरात शाहुनगरी फाऊंडेशनच्यावतीने देण्यात येणारा पहिला महाराणी येसूबाई पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते स्वीकारल्यानंतर त्या बोलत होत्या. यावेळी प्रमुख पाहुणे सातारचे माजी नगराध्यक्ष श्री. छ. शिवाजीराजे भोसले, ताराराणी फेम अभिनेत्री दीप्ती भागवत, कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रसिध्द वक्ते प्राचार्य डॉ. यशवंत पाटणे, शाहुनगरी फाऊंडेशनच्या संस्थापक अध्यक्ष श्री. छ. वृषालीराजे भोसले, श्री. छ. विक्रमसिंहराजे भोसले, श्री. छ. सत्वशीलाराजे भोसले, शाहुनगरी फाऊंडेशनचे उपाध्यक्ष विनोद कुलकर्णी, उपनगराध्यक्ष मनोज शेंडे, शंकर माळवदे, सुशांत मोरे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते म्हणाल्या, महाराणी येसूबाईच्या कार्यांचे महत्व समजून घेण्यात समाज म्हणून आपण कमी पडलो. त्यांचे कर्तृत्व मोठे होते. त्यांचे विस्मरण झाले तर आपण करंटे ठरु. त्यामुळेच शाहुनगरी फाऊंडेशनचा हा उपक्रम स्तुत्य पाऊल आहे. त्यांच्या नावाने मिळालेल्या पुरस्कार या गोष्टींचा आनंद मी शब्दात व्यक्त करु शकत नाही. सातारा जिल्ह्यात 20 महिने मी काम केले. हा पुरस्कार सर्वांचा असून मी केवळ प्रतिनिधी म्हणून स्वीकारत आहे. पुरस्काराबद्दल सर्वांचे आभार आणि आतापर्यंतच्या वाटचालीत ज्यांचा ज्यांचा सहभाग आहे, त्यांना नतमस्तक होऊन मी हा पुरस्कार समर्पित करते.
प्राचार्य डॉ. यशवंत पाटणे म्हणाले, मानवी जीवनाची सार्थकता ही आयुष्यभर जपलेल्या मूल्यांवर आणि निष्ठेवर अवलंबून असते. महाराणी येसूबाई ह्या पराक्रमाचे आणि पतीप्रेरणेचे प्रतीक आहेत. श्री. छ. चंद्रलेखाराजे ह्या वात्सल्याचे आणि शिवप्रेमाचे प्रतीक आहेत. त्यामुळे महाराणी येसूबाई पुरस्कारात कर्तृत्वाचा आणि मातृत्वाचा सुंगध आहे. सध्या वाढत्या धर्मव्देषामुळे समाजमन अस्वस्थ झाले आहे. अशा काळात समाजातील विविध घटकात प्रेम, विश्‍वास आणि सामजस्य निर्माण करण्यात पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांचा मोठा वाटा आहे. कोरोनाच्या भीषण काळात त्यांनी बजावलेली कर्तव्यसेवा ही त्यांच्या मानवतेचे दर्शन घडविते. त्यांना प्रदान केलेला महाराणी येसूबाई पुरस्कार हा त्यांच्या मानवसेवेचा कृतज्ञ गौरव आहे. श्री. छ. सौ. वृषालीराजे यांनी श्री. छ. चंद्रलेखाराजे यांच्या जयंतीचे औचित्य साधून सुरु केलेला पुरस्कार आणि विविध उपक्रम हे मानवतेचा आणि गुणवत्तेचा सार्थ गौरव करणारे आहेत. समाज आणि संस्कृती यांचे वैभव निरंतर जपण्यासाठी शिवपरंपरेचा विचार प्रत्येकाने अंगीकारला पाहिजे.
प्रारंभी संयोजकांच्यावतीने मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यावेळी हास्यतारा राज्यस्तरीय लघुनाटिका स्पर्धेचे परीक्षक सिध्देश्‍वर झाडबुके, घोडा चित्रपटाच्या टीमचा सत्कार मान्यवरांच्याहस्ते करण्यात आला. त्यानंतर मान्यवरांकडून सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांना पहिला महाराणी येसूबाई पुरस्कार राजश्री पगडी, शाल, श्रीफळ, रोख रक्कम, सन्मानपत्र देऊन प्रदान करण्यात आला. यावेळी मान्यवरांनी हास्यतारा या राज्यस्तरीय लघुनाटिकामधील स्कीटस बघून त्याला भरभरुन दाद दिली.
प्रास्ताविकात शाहुनगरी फाऊंडेशनचे उपाध्यक्ष विनोद कुलकर्णी यांनी फाऊंडेशनच्या कार्याची माहिती देत पुरस्कार देण्यामागची भूमिका विशद केली. त्याचप्रमाणे पहिला पुरस्कार पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांना त्यांच्या कार्यामुळे जाहीर केल्याचे सांगितले. यापुढेही फाऊंडेशनच्यावतीने प्रेरणा मिळणारे वेगवेगळे उपक्रम राबवण्याचा मानस सांगितला. सन्मानपत्राचे वाचन चित्रा भिसे यांनी केले. आभार शाहुनगरी फाऊंडेशनच्या संस्थापक अध्यक्ष श्री. छ. वृषालीराजे यांनी मानले. कार्यक्रमास राजघराण्यांवर प्रेम करणारे सातारकर आणि विविध क्षेत्रातील मान्यवर मोठया संख्येने उपस्थित होते.

COMMENTS