एकल प्लास्टिकचा वापर टाळा… प्रदूषणाला बसेल आळा

Homeताज्या बातम्याविशेष लेख

एकल प्लास्टिकचा वापर टाळा… प्रदूषणाला बसेल आळा

एकल वापर प्लास्टिक या नावावरुनच स्पष्ट होते की प्लास्टिकपासून बनवलेल्या अशा गोष्टी ज्यांचा वापर एकदाच केला जातो. एकदा वापरुन या गोष्टी फेकून दिल्या ज

मुंबईतील धरणांमध्ये 42 टक्के पाणीसाठा
पोलिसांवर संक्रांत…एकाला मारहाण, एकाच्या खुनाचा प्रयत्न
बिग बॉस मराठीच्या एका एपिसोडसाठी महेश मांजरेकर घेतात एवढे पैसे.

एकल वापर प्लास्टिक या नावावरुनच स्पष्ट होते की प्लास्टिकपासून बनवलेल्या अशा गोष्टी ज्यांचा वापर एकदाच केला जातो. एकदा वापरुन या गोष्टी फेकून दिल्या जातात. मात्र त्यांची विल्हेवाट सहजपणे लावता येत नाही. प्लास्टिकचे विघटन होत नाही आणि त्याला जाळून नष्टही करता येत नाही. प्लास्टिक जाळल्यास त्यामधून विषारी वायू बाहेर पडतात. तसेच या गोष्टींवर प्रक्रिया करुन त्यांचा पुनर्वापरही करता येत नाही. म्हणूनच प्लास्टिकमुळे होणाऱ्या प्रदुषणाचा विचार केला तर सर्वाधिक वाटा हा या एकल प्लास्टिकचाच असतो, असे समोर येत आहे. दिनांक 1 जुलै पासून सर्वत्र एकल वापर प्लास्टिकला बंदी घालण्यात आली. अशा प्लास्टिकचा वापर करताना आढळल्यास नियमानुसार दंडात्मक कारवाई सुध्दा करण्यात येणार आहे. यामध्ये नित्य वापरात आपण कोणत्या प्लास्टिकच्या वस्तू, पिशव्या वापरतो याविषयी माहिती देणारा लेख…
केंद्र शासनाच्या पर्यावरण, वने व हवामान बदल विभागाच्या दिनांक 12 ऑगस्ट 2021 रोजीच्या अधिसुचनेनुसार 1 जुलै 2022 पासून एकल वापर प्लास्टिकचे उत्पादन, आयात, साठवण, वितरण, विक्री आणि वापरावर बंदी घालण्यात आली आहे.

दैनंदिन वापरातील प्लास्टिक
आपल्या दैनंदिन जीवनामध्ये एकल वापर प्लास्टिक कुठे कुठे वापरलं जात तर कान कोरण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकच्या काड्या म्हणजेच इयर बड्स स्टीक्स, बलून स्टीक्स, प्लास्टिकचे झेंडे, लॉलीपॉपमध्ये वापरण्यात येणाऱ्या काड्या, आइस्क्रीमच्या काड्या, थर्माकॉलपासून बनवलेलं सजावटीचं सामान, प्लास्टिकचे कप, प्लास्टिकच्या प्लेट्स, प्लास्टिकपासून बनवलेले काटे चमचे, शितपेय पिण्याच्या नळ्या (स्ट्रॉ), आमंत्रण कार्ड, सिगारेटच्या पाकिटाभोवती प्लास्टिक फिल्म गुंडाळणे किंवा पॅक करणे, मिठाईच्या बॉक्सवर वापरलं जाणार आवरण, पत्रिकांवर शोभेसाठी वापरलं जाणार प्लास्टिक, आणि 100 मायक्रॉनपेक्षा कमी जाड असणारं सर्व प्रकारचं प्लास्टिक हे एकल वापर प्लास्टिक मध्ये मोडते.
याबरोबरच महाराष्ट्र प्लास्टिक व थर्माकोल अधिसूचना 2018 अंतर्गत सर्व प्रकारच्या हँडल असलेल्या व नसलेल्या प्लास्टिक पिशव्या, कचरा व नर्सरीच्या पिशव्या सोडून कंपोस्टेबल प्लास्टिक, सर्व प्रकारच्या पॉलीप्रोपिलीन पासून बनवलेले नॉन ओव्हन बॅग्ज तसेच एकल वापर प्लास्टिकचे उत्पादनास मार्च 2018 पासून प्रतिबंध करण्यात आला आहे.

“व्यायामाच्या माध्यमातून स्वच्छता”
जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून पुणे महानगरपालिकेतर्फे प्लॉगेथॉन (जॉगिंग विथ पिकिंग अप लिटर) मोहिम राबविण्यात आली. उत्तम आरोग्यासाठी अनेकांना सकाळी फिरण्याची सवय असते. याला कचरा संकलनाची जोड दिल्यास समाजासाठीही काही केल्याचे समाधान जॉगर्सना मिळाले. पुणे शहरातील एकूण 134 रस्त्यांवर सुमारे दीड लाख नागरिकांनी प्लास्टिक कचरा गोळा करण्यासाठी पुणे प्लॉगेथॉन मध्ये सहभाग नोंदवला. विविध टेकड्या रामनदी, पुणे शहरातील विविध नदी घाट येथेही स्वच्छता करण्यात आली.
प्लास्टिक वेगवेगळ्या मार्गांनी नद्या आणि समुद्रामध्ये पोहोचतं. तसेच प्लास्टिकचे छोटे छोटे कण पाण्यामध्ये मिसळतात. यामुळे नद्या आणि समुद्राचं पाणीही दूषित होतं. त्यामुळेच प्लास्टिकवर बंदी घातली तर निर्माण होणाऱ्या प्लास्टिकच्या कचऱ्याच्या प्रमाणामध्ये घट होईल आणि याचं नियोजन योग्य पद्धतीने होऊ शकेल.

दंड..
प्लास्टिक वापराबाबत नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर माल जप्त करणे, पर्यावरणीय नुकसान भरपाई आकारणे,उद्योग, व्यावसायिक आस्थापना यांचे कामकाज बंद करणे तसेच पहिल्या गुन्ह्याप्रकरणी 5 हजार रुपये, दुसऱ्या प्रकरणी 10 हजार रुपये दंड आकारला जाईल तर तिसऱ्या गुन्ह्याप्रकरणी 25 हजार रुपये दंड व 3 महिन्याचा कारावास अशी कारवाई करण्यात येईल. त्यामुळे सर्व उत्पादक, साठवणूकदार, वितरणकर्ता, दुकानदार, ई कॉमर्स कंपन्या, रस्त्यावर विक्री करणारे व्यावसायिक, मुख्य बाजार विक्री केंद्र, सिनेमागृह, पर्यटन ठिकाणे, शाळा, कार्यालयीन इमारती, रुग्णालये, खाजगी संस्था तसेच सामान्य नागरिकांनी एकल प्लास्टिक वापर टाळून प्रदूषणाला आळा घालण्याचा प्रयत्न करणे ही सर्वांची जबाबदारी आहेच पण सुदृढ भविष्यासाठी गरजेचे आहे. तेव्हा एकल प्लास्टिकचा वापर टाळा.. त्यामुळे निश्चितच प्रदूषणाला बसेल आळा.

गीतांजली अवचट, माहिती सहायक
विभागीय माहिती कार्यालय, पुणे.

COMMENTS