अहमदनगर/प्रतिनिधी : दिवसेंदिवस कांद्याचे भाव कमी होत असल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे. श्रीरामपूर तालुक्यातील गुजरवाडी येथील शेतकर्याने विक्रीसाठी
अहमदनगर/प्रतिनिधी : दिवसेंदिवस कांद्याचे भाव कमी होत असल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे. श्रीरामपूर तालुक्यातील गुजरवाडी येथील शेतकर्याने विक्रीसाठी आणलेला कांदा नाकारण्यात आला व त्याला एक रुपया प्रती किलो असा भाव सांगण्यात आल्याने या शेतकर्याने बाजार समितीमध्येच विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्याच्यावर श्रीरामपूरच्या कामगार रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती गंभीर असून, मृत्यूशी झुंज सुरू आहे. श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या टाकळीभान उपबाजारात कांदा बाजार सुरू आहे. गुजरवाडी येथील शेतकरी भरत जाधव यांनी आपला कांदा उपबाजारात विक्रीसाठी आणला होता. त्यांनी तीन आडत्यांकडे कांदा विक्रीस लावला होता. कांदा लिलावासाठी त्यांनी आणला होता. मात्र, कांदा लिलावाचा अधिकृत दिवस नसल्याने त्यांच्या नेहमीच्या आडतीवर वक्कलातील कांदा गोणी फोडली असता तो माल नो-बीट झाला. बाकीच्या आडतीवरील लिलाव मंगळवारी होणार होते. मात्र, एका आडतीवरील कांदा नो-बीट झाल्याने हतबल होऊन जाधव यांनी काही वेळाने विषारी पदार्थाची बाटली आणून उपबाजार समितीच्या आवारातच विषारी पदार्थ प्राशन केला. बाजार समितीच्या कर्मचार्यांनी तातडीने जाधव यांना श्रीरामपूर येथील साखर कामगार रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
25 टन कांदा आणला होता
श्रीरामपूर तालुक्यातील वांगी खिर्डी या छोट्या गावातील भरत जाधव या तरुण शेतकर्याने टाकळीभान येथील उपबाजार समितीमध्ये 25 टन कांदे घेऊन विकण्यासाठी गेला होता. अडत्याकडे त्याने कांदा दिल्या नंतर त्याला फक्त एक रुपया किलोचा भाव मिळाला यामुळे भरत निराश व हताश झाल्याने त्याने बाजार समितीमध्येच विष प्राशन केले. बाजार समिती मध्येच विष प्राशन केल्याने तेथे खळबळ उडाली. तेथे उपस्थित शेतकर्यांनी भरतला थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हता. विष प्राशन केल्यानंतर त्याला इतर सहकार्यांनी श्रीरामपूर येथील साखर कामगार दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले आहे. या ठिकाणी त्याची मृत्यूशी झुंज सुरू आहे. या प्रकाराने हळहळ व्यक्त होत आहे.
शेतकरी हवाददिल
शेतकर्यांच्या शेतमालाला भाव मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. कांद्याला भाव नाही तर दुसरीकडे शेतात उभ्या असलेल्या उसाला तोड मिळत नाही. डोक्यावर असलेले कर्ज व घरातील इतर समस्या कशा सोडवायच्या याचा प्रश्न शेतकर्यांसमोर आहे. एकरी चाळीस ते पन्नास हजार रुपये खर्च करून शेतकरी कांदा पिकवतो आणि त्याला कवडीमोल भाव मिळाल्याने शेतकर्याचे स्वप्न धुळीस मिळतात आणि अखेर शेतकरी आत्महत्येचा मार्ग स्वीकारत आहे. अतिरिक्त ऊस झाल्याने त्या शेतकर्यांची स्थितीही हवालदिल झाल्यासारखी आहे. मात्र अजूनही याबाबत राज्य वा केंद्र सरकार गंभीर नाही, हे दुर्दैव असून, राज्यात शेतकर्यांचे प्रश्न सोडून देऊन हनुमान चालीसा, भोंगे आणि धर्म यावरच राजकारण सुरू असल्याने शेतकर्यांतून संताप व्यक्त होत आहे.
COMMENTS