Homeताज्या बातम्यासंपादकीय

पत्रकारावर हल्ला आणि समाज माध्यमातून मतभेद! 

 हिंसाचार हा कोणत्याही स्वरूपातील असो, परंतु तो लोकशाहीचे विध्वंसन करणारा असतो. त्याला लोकशाही व्यवस्थेमध्ये कधीही मान्यता मिळू शकत नाही. गे

डेटा जरा जपून ! 
संस्थानच्या वंशजांनी शाहू महाराजांचा आदर्श घ्यावा ! 
माध्यम नायक बबनराव कांबळे !

 हिंसाचार हा कोणत्याही स्वरूपातील असो, परंतु तो लोकशाहीचे विध्वंसन करणारा असतो. त्याला लोकशाही व्यवस्थेमध्ये कधीही मान्यता मिळू शकत नाही. गेल्या काही वर्षांपासून पत्रकारांवरील हल्ले वाढले, ही चिंतेची बाब आहे. त्या अनुषंगाने कायदा करावा, यासाठी महाराष्ट्रातीलच नव्हे तर, देशभरातील पत्रकारांनी सातत्याने आग्रह धरला. तसा कायदाही काही ठिकाणी करण्यात आला. राज्यातही याला प्रतिसाद मिळाला. परंतु, प्रत्यक्षात पत्रकारांवरील हल्ले थांबण्याचं नाव घेत नाही. हा विषय लिहीत असताना महाराष्ट्राचे प्रख्यात पत्रकार हेरंब कुलकर्णी यांच्यावर काल जीवघेणा हल्ला झाला. या हल्ल्याचा आम्ही व्यक्तिगतरित्या निषेध करतो. परंतु, त्यांच्यावर झालेल्या हल्ल्यावरून महाराष्ट्रात दोन गट पडले आहेत. हा गट पडण्याचं मुख्य कारण म्हणजे, ज्या पद्धतीने त्यांच्यावर हल्ला झाल्याचं वर्णन आलं, ते पाहता, त्यांच्या डोक्याला मार लागला, टाके पडले, परंतु, जी भीषणता हल्ल्याच्या वर्णनात होती, ती काही लोकांना असं वाटलं की, त्यांची प्रकृती पाहून एवढा भीषण हल्ला झाला असेल, असं वाटत नाही; असं काहींचं म्हणणं आहे. अर्थात, या संदर्भात ज्याचं त्याचं निरीक्षण नोंदविण्याची मुभा आहे. हा प्रश्न अलहिदा.परंतु, दुसऱ्या बाजूला हेरंब कुलकर्णी यांच्यावरील हल्ल्याचा निषेध करण्यात यावा, यासाठी सर्व पुरोगामी संघटनांना आव्हान केलं जात आहे. कार्यकर्त्यांना त्यामध्ये आग्रह केला जातो आहे की, या हल्ल्याचा निषेध करावा. हे होत असतानाच अनेकांनी हेरंब कुलकर्णी यांनी नेमकं कशा पद्धतीने काम केलं आहे, यावरही काही पोस्ट टाकण्याचा प्रयत्न केला तर, काहींनी थेट कुलकर्णी यांनी सरकारी शाळांच्या खाजगीकरणाच्या भूमिकेला पाठिंबा दिला असल्याचं आपल्या समाज माध्यमांवरील लिखाणात म्हटलेलं आहे. याचा अर्थ, एखाद्या परिवर्तनाचे काम करत असताना त्या परिवर्तनाच्या कामासाठी आपण नेमकी कोणती वैचारिक भूमिका घेतली पाहिजे, याची स्पष्टता नसेल तर केवळ उपदेशात्मक लिहिण्यातून आपण स्वतःचीही फसवणूक करतो आणि वाचकांची ही फसवणूक करतो. यावर आत्मचिंतन करण्याची गरज पत्रकारितेच्या क्षेत्रातील लोकांना निश्चित आहे असं आम्ही मानतो. सध्याच्या काळामध्ये असे एक समीकरण रूढ होत आहे की, ज्यांना प्रसिद्धी माध्यमातून अधिक स्पेस मिळतो त्यांचे संबंध शासन व्यवस्थेची कसे आहेत आणि त्या अनुषंगाने मग एकूणच परिवर्तनाच्या चळवळीशी कसे आहेत, हे सगळं तपासून पाहण्याची गरज आहे. अशाप्रकारे मध्यंतरी कुलकर्णी यांनी आपलं कार्य कसं चाललं आहे, याचं समाज माध्यमांवर फोटो आणि निवेदन देऊन लोकांसमोर ते आणलं. भारताच्या अनेक राज्यांमध्ये प्रवास करून ते हे काम करत आहेत. सध्याचा काळ प्रसार माध्यमांसाठी अतिशय कठीण असा मानला जातो. या काळामध्ये ज्यांच व्यवस्थेशी सुत जमलं त्यांनाच काम करण्याची मुभा आहे किंवा त्यांनाच काम करता येतं. अशा पद्धतीची कुजबुज जनमानसामध्ये नक्कीच आहे. ते पाहता कुलकर्णी यांच्यावरील हल्ल्यातून झालेले दोन गट हे आपल्याला सहजपणे सोडून देता येणार नाही. त्यावर महाराष्ट्रामध्ये चिंतन आणि मंथन होण्याची गरज आहे

 कारण नव्या परिस्थितीत ज्या पद्धतीने आपण एखादं क्षेत्र व्यापत आहोत आणि त्या ठिकाणी उपदेशक बनत आहोत, त्या मागची आपली नैतिक उंची देखील मोजण्याची गरज आहे. हे सांगण्यासाठी आपण एक दुसऱ्याला उपदेश करण्याची गरज नाही तर, स्वतःच आपण आपल्या आत्मचिंतनाच्या खोलीमध्ये शिरलं पाहिजे. अन्यथा, आपण केवळ उपदेशक राहून लोकांना उपदेश करत राहू आणि दुसऱ्या बाजूला आपण व्यवस्थेशी जुळवून घेऊ आणि त्याच व्यवस्थेच्या बदलाची भाषा लोकांना सांगत राहू, अशा दुहेरी भूमिका आता त्यागण्याची गरज आहे.  चळवळींना आणि लोकांनाही हे आता समजून घेण्याची गरज आहे. अशावेळी या सगळ्या परिस्थितीवर भाष्य करण्यापेक्षाही एकंदरीत दोन्ही गटांनी आत्मचिंतन करून नव्या परिस्थितीत आपण कसं सामोर गेलं पाहिजे, त्यासाठी काय पूर्वतयारी असावी याच मार्गदर्शन याचं चिंतन होणे गरजेचे आहे!

COMMENTS