दहशतवादी संघटनांशी संपर्काचा संशय ; अद्याप अटक नाहीअहिल्यानगर/मुंबई ः राज्यातील सुरक्षाविषयक हालचालींना वेग आला असून महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने
दहशतवादी संघटनांशी संपर्काचा संशय ; अद्याप अटक नाही
अहिल्यानगर/मुंबई ः राज्यातील सुरक्षाविषयक हालचालींना वेग आला असून महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) विविध जिल्ह्यांत समन्वित शोधमोहीम हाती घेतली आहे. विदर्भातील यवतमाळ आणि अकोला तसेच पश्चिम महाराष्ट्रातील अहिल्यानगर येथे एकूण 21 ठिकाणी छापेमारी करण्यात आल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली. या कारवाईमुळे संबंधित भागात पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला असून नागरिकांमध्ये उत्सुकता आणि चर्चेला उधाण आले आहे.
कारवाईचा केंद्रबिंदू यवतमाळ जिल्हा ठरला असून पुसद आणि उमरखेड या शहरांतील विविध ठिकाणी तपास पथकांनी शोध घेतला. या मोहिमेसाठी एटीएसची अनेक पथके नियुक्त करण्यात आली असून वरिष्ठ अधिकार्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई सुरू आहे. स्थानिक पोलिस दलालाही या मोहिमेत सहकार्य करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. अधिकृत सूत्रांच्या मते, काही व्यक्तींच्या हालचाली संशयास्पद असल्याची माहिती तपास यंत्रणेला प्राप्त झाली होती. त्यानुसार कागदपत्रे, इलेक्ट्रॉनिक साधने आणि इतर पुरावे तपासण्यासाठी शोधमोहीम राबवण्यात आली. अहिल्यानगर शहरातील मुकुंदनगर परिसरात सात ठिकाणी तपास करण्यात आला. गेल्या काही महिन्यांत सामाजिक माध्यमांवर आक्षेपार्ह मजकूर आणि भडकावू घोषणांबाबत तक्रारी आल्याने हा भाग चर्चेत होता. त्याच पार्श्वभूमीवर काही तरुणांवर लक्ष ठेवण्यात आले होते. तपास पथकाने संबंधित ठिकाणी जाऊन चौकशी केली असून काही व्यक्तींना पुढील पडताळणीसाठी ताब्यात घेतल्याची माहिती समोर येत आहे. मात्र, अटक केल्याबाबत अधिकृत घोषणा झालेली नाही. अकोला जिल्ह्यातील उरळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतही शोधमोहीम राबवण्यात आली. रात्री उशिरापर्यंत ही कारवाई सुरू होती. स्थानिक पोलिसांनी परिसरात गस्त वाढवून कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यावर भर दिला.
सध्या तपास प्राथमिक टप्प्यात असून जप्त साहित्याचे विश्लेषण केल्यानंतरच पुढील दिशा स्पष्ट होणार आहे. यंत्रणांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. सुरक्षा यंत्रणांच्या मते, ही कारवाई प्रतिबंधात्मक स्वरूपाची असून संभाव्य धोके आधीच निष्प्रभ करण्याचा प्रयत्न आहे. तपासाच्या पुढील टप्प्यात अधिक माहिती जाहीर केली जाईल, असेही संकेत मिळत आहेत. संपूर्ण मोहिम अत्यंत गोपनीय पद्धतीने पार पडत आहे. अधिकृत निवेदन येईपर्यंत तपासाच्या तपशीलांबाबत संयम बाळगण्याची भूमिका प्रशासनाने घेतली आहे. राज्यातील नागरिकांनी शांतता आणि सहकार्य राखावे, असे आवाहनही करण्यात आले आहे. या व्यापक कारवाईतून कोणते धागेदोरे पुढे येतात आणि त्याचा कायदेशीर परिणाम काय होतो, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
अहिल्यानगरमध्ये 7 ठिकाणी छापे
अहिल्यानगर शहरातील मुकुंदनगर परिसरात सात ठिकाणी तपास करण्यात आला. गेल्या काही महिन्यांत सामाजिक माध्यमांवर आक्षेपार्ह मजकूर आणि भडकावू घोषणांबाबत तक्रारी आल्याने हा भाग चर्चेत होता. तपास यंत्रणेला काही तरुण बाह्य घटकांच्या संपर्कात असल्याची प्राथमिक माहिती मिळाल्याचे सांगितले जाते. या अनुषंगाने आर्थिक व्यवहार, संदेशवहन आणि सोशल मीडियावरील हालचालींचा तपशील तपासला जात आहे. अधिकार्यांच्या मते, कारवाई पूर्णपणे कायदेशीर प्रक्रियेनुसार आणि पुराव्यांच्या आधारेच करण्यात येत आहे.

COMMENTS