अहमदनगरचे शंभराहून अधिक युवक-युवती सायकलवरून बांगलादेशातील नौखालीकडे रवाना

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अहमदनगरचे शंभराहून अधिक युवक-युवती सायकलवरून बांगलादेशातील नौखालीकडे रवाना

अहमदनगर, २ ऑक्टोबर २०२१ "भारत जोडो" आणि "जय जगत" चा नारा देत शंभराहून अधिक युवक-युवतींचा सहभाग असलेली सदभावना सायकल यात्रा शनिवारी सकाळी बांगलादेश

रुणाल जरे याच्या अंगरक्षकाला दमबाजी l Rekha Jare Hatyakand l Bal Bothe I LOK News 24
ठाकरेंच्या समर्थनार्थ जिल्हा शिवसेनेचा उद्या नगरला मेळावा
भाजप यापुढे स्वबळावर…जिल्ह्यात 12 आमदार हवेत

अहमदनगर, २ ऑक्टोबर २०२१

“भारत जोडो” आणि “जय जगत” चा नारा देत शंभराहून अधिक युवक-युवतींचा सहभाग असलेली सदभावना सायकल यात्रा शनिवारी सकाळी बांगलादेशकडे रवाना झाली. या रॅलीला  हिरवा झेंडा दाखवण्यासाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, ९४ वर्षांचे गांधीवादी डॉ. एस. एन. सुब्बाराव, पद्मश्री पोपटराव पवार, महिंद्रा कोटक बँकेचे अध्यक्ष प्रकाश आपटे, रोटरी क्लबचे प्रांतपाल ओम मोतीपवळे, अवतार मेहेरबाबा ट्रस्टचे अॅड.मेहेरनाथ कलचुरी आदी मान्यवर उपस्थित होते.

भारताच्या स्वातंत्र्याचे ७५वे आणि बांगलादेश स्वातंत्र्याच्या ५०व्या वर्षाचे औचित्य साधून स्नेहालयाच्या वतीने पाच राज्यांतून जात बांगलादेशातील नौखाली येथील गांधी आश्रमात समाप्त होणा-या तीन हजार किलोमीटरच्या सदभावना सायकल यात्रेचा प्रारंभ २ ऑक्टोबरला महात्मा गांधी जयंतीला करण्यात आला. अहमदनगर येथील भुईकोट किल्ल्याच्या खंदकाबाहेर नव्याने उभारलेला १०५ फूट उंच खांबावरील तिरंगा झेंडा आणि १९७१ च्या स्वर्णिम विजय स्मारकाच्या सान्निध्यात मोठ्या उत्साहात हा कार्यक्रम झाला.विद्यार्थी, एनसीसी छात्र, तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवर यावेळी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी स्नेहालय आणि अनामप्रेमच्या विद्यार्थ्यांनी प्रेरणागीते सादर केली. वृषाल एकबोटे आणि दीपक काळे यांनी देशभक्तिपर गीते म्हटली. अनामप्रेममधील दिव्यांगांनी सादर केलेल्या  ‘एकला चालो रे’… या गीतानं वातावरण भारावून गेलं. स्नेहालयाचे सचिव राजीव गुजर यांनी स्वागत, तर संस्थापक डॉ.गिरीश कुलकर्णी यांनी प्रास्ताविक करत यात्रेचा उद्देश सांगितला.

अशा प्रकारचा युवा पिढीत स्फूर्ति निर्माण करणारा आणि मैत्रीचा संदेश दोन देशांमध्येच नव्हे, तर सगळ्या जगात सदभावनेद्वारे पसरवणारा उपक्रम अमृत-स्वर्णिम विजय वर्षात प्रथमच होत असून जात-पात, धर्म, पंथ, भाषा आणि देशाच्या सीमा ओलांडत ही यात्रा गावागावांत, मनामनांत पोहोचणार आहे, असे सांगत मान्यवरांनी यात्रेला शुभेच्छा दिल्या. या उपक्रमाची नोंद युनोदेखील घेईल, असे पद्मश्री पोपटराव पवार म्हणाले. देशासाठी सतत कार्यरत राहण्याचा संदेश हजारे व डॉ. सुब्बाराव यांनी दिला. सर्वांसमवेत त्यांनी गायनही केलं.

नगरचे सुपुत्र कॅप्टन राजाभाऊ कुलकर्णी यांच्या वीरपत्नी रेवाताई कुलकर्णी यांच्यासह १९७१ च्या बांगलादेश मुक्ती संग्रामात सहभागी झालेले माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांचा गौरव, मानपत्र व स्मृतिचिन्ह देऊन यावेळी करण्यात आला. आभार स्नेहालयाचे अध्यक्ष संजय गुगळे यांनी मानले. भारत आणि बांगलादेशचे राष्ट्रगीत म्हटल्यानंतर हिरवा झेंडा दाखवून यात्रेला प्रारंभ करण्यात आला. ही सायकल यात्रा देवगडमार्गे रवाना झाली. नोव्हेंबरमध्ये ती बांगलादेशात प्रवेश करेल.

या कार्यक्रमास सर्वश्री नितीन थाडे, पेमराज सारडा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र शिंदे, हरजितसिंह वधवा, रोटरी क्लब ऑफ अहमदनगर सेंट्रलचे अध्यक्ष ईश्वर बोरा, सचिव डॉ. दिलीप बागल, डॉ.शिरीष रायते, प्रमोद पारीक, लायन्स क्लबचे अध्यक्ष डॉ.अमित बडवे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन भूषण देशमुख यांनी केले.

(चौकट १)

महात्मा गांधीजींचे अनमोल चित्र

प्रसिद्ध साहित्यिक पुल देशपांडे यांनी १९८३ मधील नगरभेटीत महात्मा गांधी यांचे चित्र रेखाटले होते. पुलंनी काढलेले हे एकमेव चित्र आर्किटेक्ट अशोक काळे यांनी जपून ठेवले होते. त्यांच्या इच्छेनुसार आर्किटेक्ट मीनल काळे यांनी हे दुर्मिळ चित्र नगरच्या एतिहासिक वस्तु संग्रहालयासाठी देऊ केले. श्री.हजारे व डॉ.सुब्बाराव यांच्या हस्ते हे चित्र भूषण देशमुख व संग्रहालयाचे अभीरक्षक डॉ.संतोष यादव यांनी या कार्यक्रमात स्वीकारले.

COMMENTS