नवी दिल्ली/मुंबई : जगभरात ओमायक्रॉनचा वाढता संसर्गामूळे चिंता व्यक्त करण्यात येत असतांना, जागतिक आरोग्य संघटनेचे अध्यक्ष डॉ. टेड्रॉस अधानोम यांनी म्ह
नवी दिल्ली/मुंबई : जगभरात ओमायक्रॉनचा वाढता संसर्गामूळे चिंता व्यक्त करण्यात येत असतांना, जागतिक आरोग्य संघटनेचे अध्यक्ष डॉ. टेड्रॉस अधानोम यांनी म्हटले आहे की, जर आपल्याला 2022 मध्येच कोरोनाचा खेळ खल्लास करायचा असेल, तर जगातील किमान 70 टक्के लोकसंख्येने दोन्ही डोस घेतलेले आवश्यक आहे. मात्र लसीकरण मोठया संख्येने न झाल्यामुळे कोरोनाची लाट येत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. डॉ. टेड्रॉस माध्यमांसमोर बोलतांना म्हणाले की, आज जगातला एकही देश कोरोनाच्या प्रभावापासून सुरक्षित राहिलेला नाही. पण जमेची बाजू ही आहे की आज आपल्याकडे करोनाशी लढा देण्यासाठी अनेक साधने उपलब्ध आहेत. तसेच, कोरोनावर उपचार करण्यासाठी देखील औषधे हाती आहेत. मात्र, जगात जितकी जास्त असमानता असेल, तेवढा हा विषाणू आपण कल्पनाही करू शकणार नाही किंवा बचाव करू शकणार नाही अशा पद्धतीने घातक होऊ शकतो अशी भिती डॉ. टेड्रॉस यांनी व्यक्त केली आहे. कोरोनावर मात करायची असेल, तर आपल्याला असमानता नष्ट करावी लागेल, असे टेड्रॉस म्हणाले. जर आपण आपल्यातली असमानता नष्ट केली, तर आपण हे कोरोनाचे संकट देखील नष्ट करू शकू. आपण करोना साथीच्या तिसर्या वर्षात प्रवेश करत असताना मला विश्वास वाटतोय की आपण याच वर्षी करोनाला संपवू शकतो, पण फक्त आपण एकत्रपणे त्यासाठी प्रयत्न केले तर, असे टेड्रॉस म्हणाले. दरम्यान, यावेळी बोलताना टेड्रॉस यांनी करोनाला पराभूत करायचे असेल, तर प्रत्येक देशातली किमान 70 टक्के लोकसंख्या पूर्ण लसीकृत असायला हवी, असे म्हटले आहे. यासाठी सगळ्यांनी एकत्रपणे काम करून हे जागतिक लक्ष्य साधायला हवे. 2022 च्या मध्यापर्यंत हे लक्ष्य आपण सगळ्यांनी मिळून साध्य करायला हवे, असे ते म्हणाले. जगभरात प्रत्येक देशाने व्यापक लसीकरणासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
देशात ओमायक्रॉन बाधितांची संख्या 1525 वर
देशभरातील कोरोना रुग्णांची संख्या या आठवड्याच्या सुरुवातीपासून मोठ्या प्रमाणात वाढू लागली आहे. दैनंदिन अवघे 5 हजार रुग्ण सापडत होते, तो आकडा सध्या 25 हजारांच्या पार गेला. देशात फक्त कोरोना रुग्णच नाही तर ओमायक्रॉन व्हेरिएंटची लागण झालेल्या रुग्णांची संख्या देखील झपाट्याने वाढू लागली आहे. देशात गेल्या 24 तासांत 27 हजार 553 करोना रुग्ण आढळले असून 284 जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तर देशभरातील ओमायक्रॉन बाधितांची संख्या 1525वर पोहोचली आहे. ओमायक्रॉन बाधितांची सर्वाधिक संख्या महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्रात 460 रुग्ण असून पाठोपाठ दिल्लीमध्ये 351 रुग्ण आहेत.
पुण्यात ओमायक्रॉनचे 12 नवे रुग्ण आढळले
पुण्यात कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमायक्रॉनच्या समूह संसर्गाला सुरवात झाली आहे. ज्यांना परदेश प्रवासाचा इतिहास नाही किंवा परदेशातून आलेल्या प्रवाशांच्या संपर्कातही आलेले नाहीत, अशा 600 नमुन्यांचे जनुकीय क्रमनिर्धारण (जिनोम सिक्वेन्सिंग) पुण्यातील प्रयोगशाळांनी करण्यात आले. त्यापैकी 12 रुग्णांचे अहवाल ओमायक्रॉनसाठी पॉझिटिव्ह आले आहेत. यावरून पुण्यात ओमायक्रॉनच्या समूह संसर्गाला सुरवात झाली असल्याची पुष्टी आरोग्य विभागाने दिली आहे. केंद्र सरकारने पुणे आणि मुंबईमध्ये ओमायक्रॉनचा सामूहिक संसर्ग झाला का, हे पाहण्यासाठी प्रतिदिन मुंबईतून 300 आणि पुण्यातून 100 नमुने घेण्यास सांगितलेले आहे.
नैनिताल नवोदय विद्यालयात 85 विद्यार्थी बाधित
उत्तराखंडमधील. नैनिताल जिल्ह्यातील नवोदय विद्यालयात 85 मुले कोरोना पॉझिटिव्ह आढळली आहेत. तर काही मुलांचे अहवाल येणे बाकी आहे. नुकतेच शाळेच्या मुख्याध्यापकांसह काहीजण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले होते. त्यानंतर 488 मुलांची कोरोना चाचणी करण्यात आली. आता 85 मुले कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने खळबळ उडाली आहे.
COMMENTS