मुंबई/प्रतिनिधी : राज्यात लोकनियुक्त सरकार अस्तित्वात असतांना, आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये दोन केंद्रीय आणि राज्यातील तीन कॅबिनेट मंत्री आणि पालकमंत्र
मुंबई/प्रतिनिधी : राज्यात लोकनियुक्त सरकार अस्तित्वात असतांना, आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये दोन केंद्रीय आणि राज्यातील तीन कॅबिनेट मंत्री आणि पालकमंत्री असतांना, लोकप्रतिनिधींना डावलून छत्रपती संभाजीनगर येथील प्रादेशिक उपायुक्त जयश्री सोनकवडे यांनी अनुसूचित जातीव नवबौध्द घटकांतील स्वयंसहायता बचत गट योजनेतील लाभार्थ्यांना मिनी ट्रॅक्टरचे वाटप आयुक्त समाजकल्याण यांच्या हस्ते करण्यात आले, यावरून श्रीमती सोनकवडे यांची मनमानी आणि ते या लोकनियुक्त शासनाला जुमानत नसल्याचे दिसून येत आहे.
यासंदर्भातील सविस्तर माहिती अशी की, छत्रपती संभाजीनगर येथे 8 जून 2023 रोजी प्रादेशिक उपायुक्त जयश्री सोनकवडे यांनी अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील स्वयंसहायता बचत गट योजनेतील लाभार्थ्यांना मिनी ट्रॅक्टर, उपसाधने व प्रमाणपत्र वाटप तसेच कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेतील लाभार्थ्यांना जमीन देण्याचे आदेश वाटप आयुक्त, समाजकल्याण, पुणे यांच्या हस्ते केले. परंतु कुठल्याही शासकीय योजनेचा लाभ देण्यासाठी लोकप्रतिनिधींना बोलावणे अनिवार्य असतांना, तसा शासन निर्णय असून, शासन निर्णय क्रमांक : संकीर्ण 2023/प्र.क्र.05/का-1414 यामध्ये 6 नंबरमध्ये स्पष्टपणे म्हटले आहे की, वरील अभियानाच्या अंमलबजावणीसाठी स्थानिक लोकप्रतिनिधींना सहभागी करून घेण्यात यावे, असे असतांना, शासन निर्णय डावलून श्रीमती सोनकवडे यांनी कार्यक्रम राबवला आहे. सदर कार्यक्रमात कोणताही लोकप्रतिनिधी नसतांना, आयुक्त समाजकल्याण देखील कसे उपस्थित राहिले, याविषयी चर्चा होतांना दिसून येत आहे.
शासकीय योजनेचा लाभ देण्याचा जाहीर कार्यक्रम ठेवायचा असेल तर संबंधित खात्याचे मंत्री, पालकमंत्री, लोकप्रतिनिधी यांच्या हस्ते ठेवणे बंधनकारक असताना व छत्रपती संभाजीनगर शहरात केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, भागवतजी कराड हे दोन केंद्रीय मंत्री, राज्याचे कॅबिनेट आणि पालकमंत्री संदिपानजी भुमरे, सहकार व बहुजन कल्याणमंत्री अतुलजी सावे, कृषीमंत्री अब्दुलजी सत्तार, विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते अंबादासजी दानवे, लोकसभेचे खासदार इम्तीयाज जलील, माजीमंत्री आमदार हरिभाऊजी बागडे, आमदार संजयजी शिरसाट, आमदार प्रदीपजी जैयस्वाल, आमदार सतीश चव्हाण, आमदार विक्रम काळे उपलब्ध असताना प्रादेशिक उपायुक्त जयश्री सोनकवडे यांना समाजकल्याण आयुक्तांच्या हस्ते वाटप कार्यक्रम ठेवण्याचे प्रयोजन काय? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित करण्यात येत आहे. केंद्रीय मंत्री, राज्याचे मंत्री, लोकप्रतिनिधी यांना डावलून साहित्य वाटप कार्यक्रम ठेवला. हा लोकप्रतिनिधींचा हक्कभंग असून, याची सविस्तर चौकशी होऊन प्रादेशिक उपायुक्त जयश्री सोनकवडे व त्यांचे पाठीराखे सचिव सुमंत भांगे यांचे विरुध्द कारवाई करण्याची मागणी जोर धरु लागली आहे.
लोकप्रतिनिधींनी हक्कभंग आणण्याची मागणी
छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रादेशिक उपायुक्त जयश्री सोनकवडे यांनी लोकप्रतिनिधींना डावलून मिनी ट्रॅक्टर, उपसाधने व प्रमाणपत्र वाटप आयोजनाचा कार्य्रकम घेतला. त्यामुळे एकप्रकारे लोकप्रतिनिधींच्या हक्कावर ही गदा असून, याप्रकरणी लोकप्रतिनिधींनी येत्या पावसाळी अधिवेशनात श्रीमती सोनकवडे यांच्यावर हक्कभंग आणण्याची मागणी होत आहे. त्यामुळे या कार्यक्रमाची दखल घेवून लोकप्रतिनिधी आणि विद्यमान मंत्री महोदयांनी या मुजोर अधिकार्याला धडा शिकविण्याची गरज नागरिकांनी बोलून दाखवली आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या फोटोचेही वावडे
समाजकल्याण विभागाच्या कार्यक्रमात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटोचे देखील वावडे दिसून आले. या कार्यक्रमाच्या बॅनरवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो नसल्यामुळे या कार्यक्रमात नागरिकांनी श्रीमती सोनकवडे यांना धारेवर धरल्याचे दिसून आले. यावेळी आयुक्त समाजकल्याण यांनी काढता पाय घेण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची मोठी चर्चा यावेळी झाली, त्यामुळे श्रीमती सोनकवडे यांना आंबेडकरांच्या फोटोचेही वावडे असल्याचे दिसून येत आहे.
शासनाला जुमानत नसल्याचा प्रत्यय
शासकीय कार्यक्रम घेण्यासाठी काही नियम आणि प्रोटोकॉल शासनाने तयार केले आहे. त्यानुसार शासकीय कामकाजाचे उद्धाटन, वाटप कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो अनिवार्य असतांना, या फोटोंना देखील डावलण्यात आले आहे. त्यामुळे श्रीमती सोनकवडे या कार्यक्रमाला हायजॅक करून, लोकशाहीला गिळंकृत करून, एकप्रकारे मनमानी तर करत नाही ना ? असा सवाल उपस्थित होत आहे.
उद्याच्या अंकात वाचा
सचिव, मंत्री, न्यायालय, पोलिस भ्रष्ट
छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक उपायुक्त श्रीमती जयश्री सोनकवडे यांची एक ऑडिओ क्लीप दैनिक लोकमंथनच्या हाती आली असून, यात त्या, राज्यात काय चालले आहे, मंत्री बदल्यासाठी पैसे मागतात…***अधिकारी महिलेला निलंबित करण्यासाठी उपोषण करा, आपल्याच महिला सहकार्यावर चारित्र्यहननाचे आरोप तसेच समाजकल्याण विभागामध्ये टोकाचा भ्रष्टाचार सुरू आहे…आश्रमशाळेमध्ये दहा मुलींवर अत्याचाराचा या ऑडिओमध्ये उल्लेख आहे. विशेष म्हणजे पोलिस, न्यायालय भ्रष्ट, सचिव, मंत्री भ्रष्टाचारी असल्याचा उल्लेख यात श्रीमती सोनकवडे करतांना दिसून येत आहे, त्यामुळे त्यांचा लोकशाहीवर विश्वास नसल्याचे दिसून येत आहे.
COMMENTS