म्हसवड / प्रतिनिधी : म्हसवड नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपाला रोखण्यासाठी विरोधकांनी एकजूट दाखविली आहे. म्हसवड नगरपालिकेची निवडणूक आम्

म्हसवड / प्रतिनिधी : म्हसवड नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपाला रोखण्यासाठी विरोधकांनी एकजूट दाखविली आहे. म्हसवड नगरपालिकेची निवडणूक आम्ही सर्व विरोधी पक्ष एकत्र येऊन एकसंघपणे लढविणार आहोत, अशी घोषणा माजी मंत्री तथा राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष महादेव जानकर यांनी पत्रकार परिषदेत केली.
या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रभाकर देशमुख, महाराष्ट्र प्रदेश महिला आघाडीच्या अध्यक्ष प्रा. कविता म्हेत्रे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष किशोर सोनवणे, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई तसेच माजी उपनगराध्यक्ष महादेव मासाळ आणि जयराज राजेमाने आदी उपस्थित होते.
माजी मंत्री महादेव जानकर म्हणाले, म्हसवड नगरपालिकेची निवडणूक येत्या 2 डिसेंबर रोजी होत आहे. या वेळी भाजपा विरोधी सर्व गट, पक्ष, संघटना आणि समविचारी कार्यकर्त्यांना एकत्र आणून आम्ही ‘एक संघ’ म्हणून ही निवडणूक लढविणार आहोत. या आघाडीत राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (दोन्ही गट), शिवसेना (दोन्ही गट), राष्ट्रीय समाज पक्ष, बहुजन वंचित आघाडी यांसारख्या पक्षांचे निष्ठावंत कार्यकर्ते सहभागी होत आहेत. आमचे लक्ष्य स्पष्ट आहे. म्हसवड शहरातून गुंडशाही व भ्रष्टाचार संपवून स्वच्छ प्रशासन स्थापन करणे.
या वेळी प्रभाकर देशमुख यांनी सांगितले, म्हसवडला स्वच्छ आणि प्रामाणिक कारभाराची गरज आहे. आम्ही भ्रष्टाचारमुक्त नगरपरिषद निर्माण करण्यासाठी एकजूट केली आहे.
अनिल देसाई म्हणाले, आम्ही स्वच्छ चारित्र्याचे उमेदवार रिंगणात उतरवू. म्हसवडकरांना प्रामाणिक व पारदर्शक प्रशासन देणे हे आमचे ध्येय आहे.
महिला नेतृत्वाला पुढे आणण्यावर भर देताना प्रा. कविता म्हेत्रे म्हणाल्या, म्हसवडमधील दशहत मोडून काढण्यासाठी आम्ही कटिबध्द आहोत. म्हसवडचे नाव आज गुंडशाहीशी जोडले जात आहे. ती प्रतिमा बदलून एक सुरक्षित, प्रगत आणि महिला सशक्त म्हसवड उभारण्याचा आमचा संकल्प आहे. स्वच्छ विचारांची आणि लोकाभिमुख कार्य करणारी महिला नगराध्यक्षा निवडून आणण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक किशोर सोनवणे यांनी केले. उपस्थित मान्यवरांनी आगामी निवडणुकीत भाजपविरोधी आघाडीला एकमुखी पाठिंबा देण्याचे आवाहन केले. भाजपविरोधात एकत्र येत असलेली ही राजकीय मोट म्हसवड नगरपालिकेतील निवडणुकीच्या समीकरणात मोठा बदल घडवू शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

COMMENTS