गेल्या एका दशकभरापासून काँगे्रस उभारी घेण्यात अपयशी ठरत असतांना, काँगे्रसच्या नेत्या प्रियंका गांधी यांना राजकारणात पुढे आणण्याचा मतप्रवाह भारतीय
गेल्या एका दशकभरापासून काँगे्रस उभारी घेण्यात अपयशी ठरत असतांना, काँगे्रसच्या नेत्या प्रियंका गांधी यांना राजकारणात पुढे आणण्याचा मतप्रवाह भारतीय राजकारणात दिसून येत होता. खरंतर गेल्या काही वर्षांपासून प्रियंका गांधी यांच्यावर उत्तरप्रदेशची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. शिवाय प्रियंका गांधी यांच्यामध्ये इंदिरा गांधी यांची छबी, झलक दिसून येते, त्यामुळे त्या राजकारणात उतरल्यास त्यांना एक वेगळे वलय मिळेल अशी धारणा कार्यकर्त्यांमध्ये होती. तरीदेखील प्रियंका गांधी निवडणुकीच्या मैदानात उतरल्या नाहीत. मात्र यंदा राहुल गांधी उत्तरप्रदेशातील रायबरेली आणि केरळमधील वायनाड या दोन्ही मतदारसंघातून निवडून आले आहेत. खरंतर राहुल गांधी यांची केरळमधील वायनाड मतदारसंघातील जनतेशी एक अनोखे नाते निर्माण झाले होते. त्यामुळे वायनाड मतदारसंघावर पाणी सोडतांना त्यांना वेदना होत होत्या. मात्र राजकारणाचा विचार करता सोनिया गांधी या राज्यसभेवर निवडून गेल्यामुळे, त्यांनी आपला सुरक्षित रायबरेली मतदारसंघ राहुल गांधीसाठी सोडला होता. त्यामुळे साहजिकच राहुल गांधी याठिकाणावरून निवडून येतील, यात शंका नव्हती. मात्र वायनाड मतदारसंघाशी आता राहुल गांधींचे एक भावनिक नाते निर्माण झाले होते.
त्यामुळे या जागेवरून दुसर्या व्यक्तीला निवडून आणण्यापेक्षा गांधी कुटुंबांतील व्यक्तीलाच निवडणुकीत उभे करणे काँगे्रससाठी महत्वाचे होते, त्यानंतर या निवडणुकीत प्रियंका गांधी या उमेदवार म्हणून निवडणूक लढणार आहे. यानिमित्ताने लोकसभेमध्ये पुन्हा एक गांधी दिसू शकतात. अर्थात प्रियंका गांधी यांनी 2024 च्या लोकसभा निवडणुकीत अनेक ठिकाणी सभा घेत, प्रचाराची जोरदार सुरूवात केली होती. त्यांच्या भाषणात आक्रस्ताळेपणा नसला तरी, त्या आक्रमक आहेत, त्यांचे भाषणाची सुरूवात संवादात्मक शैलीने ठासून भरले आहे. त्यातच त्या थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करतांना दिसून आल्या. त्याचा फायदा काँगे्रसला झाला. शिवाय काँगे्रस दक्षिणेत आणखी पाय पसरवण्यासाठी प्रियंका गांधी यांच्यासारख्या नेतृत्वाची काँगे्रसला गरज होती. वास्तविक पाहता केरळ हा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षांचा बालेकिल्ला. मात्र या किल्ल्यात आता भाजपने देखील चंचुप्रवेश केला आहे. शिवाय काँगे्रस देखील आपले हातपाय पसरवण्यासाठी प्रयत्न करतांना दिसून येत आहे. अशावेळी वायनाड सारखा सुरक्षित मतदारसंघ काँगे्रसला सोडणे परवडणारे नव्हते. या मतदारसंघात तब्बल 41 टक्के मुस्लिम मते असून, जवळपास 45 टक्के हिंदू मतदारांची तर 13 टक्के खिश्चन मतदारांची संख्या आहे. त्यामुळे हा मतदारसंघ काँगे्रससाठी सुरक्षित समजला जातो. शिवाय काँगे्रसने प्रियंका गांधी यांना उशीराच निवडणुकीत उतरवले असेच म्हणावे लागेल. खरंतर प्रियंका गांधी यांच्या रूपाने संसदेत एक नवा चेहरा मिळणार आहे.
यामुळे संसदेत काँगे्रसचे बळ वाढणार आहे. काँगे्रसमध्ये गांधी कुटुंबांचा वरचष्मा असल्याचे दिसून येते. शिवाय सोनिया गांधी या आता राज्यसभेच्या खासदार असल्यामुळे राहुल गांधींसोबत गांधी घराण्यातील व्यक्तींची वाणवा होती. ती प्रियंका गांधी यांच्या रूपाने भरून निघणार आहे. शिवाय राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांची केमिस्ट्री अलग आहे. कारण रायबेरली मतदारसंघात प्रियंका गांधी यांनी एकहाती प्रचार केला होता. त्यामुळेच राहुल गांधी देशभर प्रचार करू शकले. शिवाय वायनाड मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाली नसली तरी, आणि या जागेवर भाजपकडून कोण लढणार याची माहिती देखील समोर आली नसली तरी, प्रियंका गांधी विरूद्ध स्मृती इराणी अशी लढत बघायला मिळू शकते, अशी शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे. आणि असे जर झाले तर, स्मृती इराणी यांच्या राजकारणाला बे्रक लागू शकतो आणि प्रियंका गांधी यांचा उदय होवू शकतो. कारण अमेठी मतदारसंघातून पराभूत झाल्यानंतर पुन्हा वायनाडमधून पराभूत होणे स्मृती इराणी यांच्यासाठी धोक्याचे संकेत असू शकतात. तसेच प्रियंका गांधी यांनी यापूर्वी देखील ’लडकी हूँ, लड सकती हूं’ या मोहिमेअंतर्गत महिलांना डोळ्यासमोर ठेवून आक्रमक प्रचार करत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
COMMENTS