Homeताज्या बातम्यासंपादकीय

राजधानीतील आक्रोश

राजधानी दिल्लीमध्ये पाच दिवसांपूर्वी एका कोचिंग क्लासेसच्या बेसमेंटमध्ये पाणी शिरल्याने यूपीएससी परीक्षेची तयारी करणार्‍या तीन विद्यार्थ्यांचा पा

प्रदूषणाचा विळखा
मानवी चूका आणि पूरस्थिती
चिवट झुंज आणि विश्‍वचषकाचा थरार

राजधानी दिल्लीमध्ये पाच दिवसांपूर्वी एका कोचिंग क्लासेसच्या बेसमेंटमध्ये पाणी शिरल्याने यूपीएससी परीक्षेची तयारी करणार्‍या तीन विद्यार्थ्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला होता. त्यानंतर यूपीएससीची तयारी करणारे विद्यार्थी आक्रमक झाले असून, ते सातत्याने आंदोलन करतांना दिसून येत आहे. या विद्यार्थ्यांनी थेट ते शिकत असलेल्या क्लासेसच्या शिक्षकांना टार्गेट करण्यास सुरूवात केली आहे. वास्तविक पाहता दिल्लीच्या आंदोलक विद्यार्थ्यांनी जी परिस्थिती सांगितली आहे ती, भयावह आहे. ज्या राजेंद्रनगर, नेहरूनगर भागात विद्यार्थी राहतात, त्याठिकाणी एका खोलीत पार्टेशन करून विद्यार्थ्यांना केवळ राहण्यापुरती जागा दिली जाते. त्या ठिकाणचे भाडे 15-25 हजाराच्या दरम्यान आहे. तर दुसरीकडे एवढे भाडे देवून देखील विद्यार्थ्यांना पिण्यासाठी स्वच्छ पाणी मिळत नाही, सूर्यप्रकाश येत नाही, कारण याठिकाणी इतक्या मोठ-मोठ्या इमारती उभ्या आहेत. प्रचंड आर्थिक उलाढाल होणार्‍या या भागात विद्यार्थ्यांना सुविधा मिळू नये, ही शोकांतिकाच म्हणावी लागेल. रस्ते योग्य नाही, रात्री दोन वाजता लायब्रीतून घरी जातांना वाटेत नाला येतो, असुरक्षितता, शिवाय या भागात किमान 2 हजार कोचिंग सेंटर आहेत. त्या एकाकडे देखील फायर सुरक्षेची पूर्तता नाही. त्यामुळे अशा वातावरणात विद्यार्थी या भागात अभ्यास करतात. खरंतर यूपीएससी परीक्षा देणारे विद्यार्थी म्हणजे उद्याचे आयएएस, आयपीएस अधिकारी. मात्र हेच विद्यार्थी या वातावरणाला का झेलतात, हा महत्वाचा प्रश्‍न आहे. तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्यानंतरच हे विद्यार्थी जागे का झाले. यापूर्वी या विद्यार्थ्यांनी अशी आपत्ती घडू नये, यासाठी सरकारला जाब का विचारला नाही. वास्तविक पाहता ही सर्व परिस्थिती एका दिवसात निर्माण झालेली नाही. खरंतर याठिकाणी महापालिका देखील दोषी आहे. त्याठिकाणी कोचिंग क्लासेसला परवानगी देणारे दोषी आहेत.

त्यामुळे ही परिस्थिती एका दिवसांत बदलणार नाही. काही दिवसांनी वातावरण शांत होईल, आणि पुन्हा विद्यार्थी ज्या कोचिंग क्लासेसच्या विरोधात आंदोलन करत होते, त्याच कोचिंग क्लासेसमध्ये शिकण्यासाठी जातील. आणि त्याच शिक्षकांशी जुळवून घेतील. विद्यार्थ्यांनी देखील आत्मबोध घेण्याची गरज आहे. खरंच आपण या वातावरणात जुळूवन घ्यायचे की, याविरोधात लढा द्यायचा. विद्यार्थी आक्रमक आहेत, किती दिवस हा लढा चालेल, 8 दिवस 10 दिवस, त्यानंतर इथले प्रश्‍न जैसे थे, राहतील यात शंका नाही. त्यामुळे यासाठी संघटनात्मक आणि व्यापक लढा देण्यासाठी विद्यार्थ्यांनी भरीव असे काम करावे लागणार आहे. त्यासाठी नियोजनबद्धरित्या सरकारचे लक्ष वेधावे लागणार आहे. त्यासाठी कायदा करावा लागणार आहे, अन्यथा अशा दुर्घटना अशाच घडत राहतील, यात शंका नाही. त्यातच विद्यार्थ्यांनी दिल्लीच यूपीएससीच्या अभ्यासासाठी का निवडावी हा महत्वाचा प्रश्‍न आहे. दिल्लीमध्ये स्पर्धा परीक्षेचे एक मोहोळ तयार झाले आहे. ज्याप्रकारे महाराष्ट्रातील पुण्यात एमपीएससी करणार्‍या विद्यार्थ्यांचे मोहोळ तयार झाले आहे, तेच दिल्लीत तयार झाले आहे. खरंतर आजचे युग आधुनिक आहे. यामध्ये सर्व बाबी डिजिटल झाल्यामुळे हव्या त्या बाबी विद्यार्थ्यांना वेळेवर उपलब्ध होत असतांना विद्यार्थी शहराची वाट का धरतात, हा महत्वाचा प्रश्‍न आहे. त्यातच लाखो विद्यार्थी स्पर्धा परीक्षा देत असले तरी, पास होण्याचे प्रमाण नगण्य आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी या माहोळमधून बाहेर येण्याची गरज आहे. आजकाल अनेक शिक्षक, शिक्षक राहिले नसून ते मोटीव्हेशनल गुरू झाले आहे. अभ्यासाचा मार्ग न सांगता, परीक्षा उत्तीर्ण होण्याचा फॉर्म्युला न सांगता हे शिक्षक या विद्यार्थ्यांनी आणखी काही वर्ष स्पर्धा परीक्षेकडे कसे लक्ष दिले पाहिजे, यासाठी मोटीव्हेट करतात. खरंतर स्पर्धा परीक्षा म्हणजे संपूर्ण विश्‍व नाही. या परीक्षेच्या दुनियेत माणसाला कुठेतरी थांबता आले पाहिजे. मात्र स्पर्धा प्रचंड असली तरी, या स्पर्धेत विद्यार्थी धावतांना दिसून येतात. त्यातच अनेकजण आपल्या आख्यायिका तयार करून ठेवतात आणि त्याच विद्यार्थ्यांना ऐकवल्या जातात. आणि विद्यार्थी या स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्राकडे वळतो आणि आयुष्याचे दशकभर या परीक्षेत गुंतवतो आणि हाती भोपळा येतो. त्यामुळे या आख्याकींना तिलांजली देत विद्यार्थ्यांनी वास्तव स्वीकारण्याची आज गरज बनतांन दिसून येत आहे. 

COMMENTS