मुंबई/प्रतिनिधी ः गुढीपाडव्याच्या दिवशी मनसेप्रमुख राज ठाकरेंनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंवर सडकून टीका केल्यानंतर गुरुवारी विधानसभेत मात्र

मुंबई/प्रतिनिधी ः गुढीपाडव्याच्या दिवशी मनसेप्रमुख राज ठाकरेंनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंवर सडकून टीका केल्यानंतर गुरुवारी विधानसभेत मात्र भाजप आणि ठाकरे गटातील दुरावा कमी होतांना दिसून येत आहे. विधानसभेत प्रवेश करतांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे गटांची एकत्रच प्रवेश झाला. यावेळी दोघांनी हस्तांदोलन करत, विचारपूस केली. त्यानंतर विधानसभेत बोलताना भाजपन नेते सुधीर मुनगंटीवार यांनी ’उद्धवजी पुन्हा एकदा शांततेने विचार करा, झाड वाढवायचा विचार करा’ असे म्हणत ठाकरे यांना अप्रत्यक्षपणे युतीची ऑफरच दिल्याने चर्चेला उधाण आले आहे.
सुधीर मुनगंटीवार यांनी उद्धव ठाकरे यांना खोचक टोला लगावला आहे. उद्धवजी मी भेटून तुम्हाला स्वतः सांगायचो फळ येतील पण तुम्ही झाडाशी नाते तोडले. तुम्ही झाडाशी नाते तोडले त्याला आता मी काय करणार? मी येवून व्यक्तीगत सांगायचो की या झाडाला कोणते खत पाहिजे, मात्र तुम्ही ते खत न टाकता दुसरेच खत टाकले. मी एकदा नाही तीनदा विनंती केली. आजही वेळ गेलेली नाही शांततेत विचार करा, झाड वाढवायचा विचार करा असे मुनगंटीवार यांनी उद्धव ठाकरे यांना म्हटले. त्यामुळे पुन्हा एकदा भाजप आणि ठाकरे गटाच्या युतीच्या चर्चांनी जोर धरला आहे.
विधानभवनात ठाकरे-फडणवीसांचा सोबत प्रवेश – राज्यात महाविकास आघाडीचा प्रयोग झाल्यानंतर भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यामध्ये मोठा दूरावा निर्माण झाला होता. त्यातच राज्यात सत्तांतर झाल्यानंतर आणि भाजप आणि शिंदे गटाने सत्ता स्थापन झाल्यानंतर हा दुरावा सातत्याने वाढत चालला होता. त्यामुळे देान्ही नेते एकमेकांसमोर येणे देखील टाळत होते. मात्र गुरुवारी विधानभवनात उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सोबतच प्रवेश झाला. यावेळी दोघांनी स्मितहास्य करत, एकमेकांची विचारपूस केली. जसे काही झालेच नाही, अशा अविर्भावात दोघा नेत्यांनी संवाद साधला. ठाकरे आणि फडणवीस हे दोन नेते एकत्र विधानभवनात आले. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. विधिमंडळ परिसरात दोघांनी एकमेकांशी हस्तांदोलन केले. त्यानंतर दोघेही नेते हसत हसत विधानभवनात गेले. त्यांच्यासोबत ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे व भाजपचे काही आमदारही यावेळी उपस्थित होते.
COMMENTS