देशभरात आज स्वातंत्र्याची पंचाहत्तरी अर्थात अमृत महोत्सवी वर्ष साजरे केले जात आहे. मात्र स्वातंत्र्यदिनानिमित्त राष्ट्रीयत्वेची जाज्वल ज्योत जागृत कर
देशभरात आज स्वातंत्र्याची पंचाहत्तरी अर्थात अमृत महोत्सवी वर्ष साजरे केले जात आहे. मात्र स्वातंत्र्यदिनानिमित्त राष्ट्रीयत्वेची जाज्वल ज्योत जागृत करण्यासाठी हर घर तिरंगा मोहीम आपण राबवत आहोत. मात्र यानिमित्ताने या देशातील 131 कोटी नागरिकांना अजूनही सोयी-सुविधा मिळत नसल्याची एकीकडे खंत व्यक्त करण्यात येते. त्या शोषित-पीडित व्यक्तींचा विकास साधण्यात आपण अपयशी ठरलो असलो तरी, विकास ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. एका दिवसात, एका वर्षांत किंवा एका दशकात कोणत्याही देशाचा पूर्ण विकास होणे अशक्य आहे. मात्र भारत आज अनेक बाबतीत स्वयंपूर्ण असून, इथल्या शोषित-पीडितांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कटिबद्ध आहे, आणि त्या दृष्टीने सत्तेवर येणार्या प्रत्येक सरकारने आपल्या पद्धतीने प्रयत्न केले. त्यात कुणाला यश-कमी जास्त मिळाले असेल, मात्र या देशाचा विकास घडवून आणण्यासाठी शेकडो हातांनी परिश्रम घेतले.
भारत स्वतंत्र झाल्यानंतर आपल्याकडे अपुर्या सोयी-सुविधा होत्या. आरोग्य, शिक्षण, उद्योगधंदे, दळणवळणाच्या सोयी-सुविधा या सर्वंच बाबतीत आपण अतिशय मागासलेलो होतो. त्यात ब्रिटिशांनी भारतातील खजिना रिता केला होता. तर दुसरीकडे फाळणीचे दुःख अशा परिस्थितीत देशातील तत्कालीन राज्यकर्त्यांनी भारताला आज सुस्थितीत आणून ठेवले, यामागे त्यांचा उदात्त दूरदृष्टीकोन होता. भारताचे प्रथम पंतप्रधान जवाहरलाल नेहरू, लालबहाद्दूर शास्त्री, इंदिरा गांधी, राजीव गांधी, पी.व्ही. नरसिंहराव, अटलबिहारी वाजपेयी, डॉ. मनमोहनसिंग या आदरणीय व्यक्तीमत्वांनी देशांच्या विकासात महत्वपूर्ण योगदान देऊन देशाला आज एका उंचीवर नेऊन ठेवले आहे. त्यांचाच वारसा आज पंतप्रधान नरेंद्र मोदी समर्थपणे चालवतांना दिसून येत आहे. इस्त्रोच्या माध्यमातून आपण आज शेकडो उपग्रह अवकाशात सोडले आहे. त्या तंत्रज्ञानाच्या जोरावर आपण आज प्रगतीचे शिखरे सर करत आहोत. आपण आज आपल्याच देशांतील उपग्रह अवकाशात सोडत नसून, इतर देशांची उपग्रह देखील अवकाशात सोडून चलन निर्मिती करत आहोत. कधीकाळी आपली आयात जास्त आणि निर्यात नगण्य होती. मात्र आज भारतातील निर्यात वाढतांना दिसून येत आहे. भारताचा सर्वाधिक पैसा हा इंधनांवर खर्च होतांना दिसून येत आहे. त्यातून मार्ग काढण्यासाठी आपण सीएनजी गॅस, यानंतर जास्तीत जास्त इॅलेक्ट्रिक वाहनांवर भर देतांना दिसून येत आहे. इंधनांवरील खर्च जर वाचला, तर तो पैसा देशाच्या विकासावर, इथल्या शोषित-पीडितांच्या योजनांसाठी खर्ची करता येईल. देशाची पंचाहत्तरी साजरी करीत असतांना देशाला प्रथमच एक आदिवासी महिला देशाच्या सर्वोच्च पदावर विराजमान आहे, हे भारतीय लोकशाहीची यश आहे, त्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. भारत देश विकासाचे टप्पे जसा पार करत आहे, त्याचप्रमाणे भारतीय लोकशाही देखील या अवस्थेतून जातांना दिसून येत आहे. त्यामुळे लोकशाहीला नाके मुरडण्याची काही गरज नाही. कारण येथील सत्ताधीश भारताचे आम्ही लोक आहोत. भारताचे आम्ही लोक पाहिजे, त्याला राज्यकर्ते बनवू शकतो, आणि त्याला सत्तेवरून खाली खेचू शकतो. त्यामुळे या भारतीय लोकशाहीत सर्वात शक्तीमान आम्ही लोक आहोत. मात्र त्यांना आपल्या या शक्तींची नीटशी ओळख झालेली नाही. त्यामुळे भारतीय लोकशाहीची मूल्ये आजही आपल्याला यूेथील नागरिकांवर बिंबंवावी लागणार आहे. आपण आज विकासाची उंची गाठली असली, तरी देशासमोरील प्रश्न आजही सुटलेले नाहीत. प्रादेशिकवादाचे मोठे आव्हान आजही आपल्यासमोर कायम उभे आहे. यातून भारतातची एकात्मता अबाधित राखण्यासाठी आपल्या सर्वांना प्रयत्न करावे लागणार आहे. शिवाय दहशतवाद तर आपल्या पाचवीला पुंजला आहे. युद्ध सामुग्रीवर होणारा अतिरिक्त खर्च, हा आपल्या अर्थव्यवस्थेला खिळखिळा करत आहे. मात्र भारताचे शेजारील राष्ट्र चीन, पाकिस्तान यांची रणनीती भारतासाठी नेहमीच घातक राहिलेली आहे. त्यामुळे या देशांवर विश्वास ठेवता येणार नाही. भारतात धार्मिक धुव्रीकरण वेगाने होतांना दिसून येत आहे. धार्मिक द्वेष वाढत चालला आहे. याला कुठेतरी आवर घालावा लागणार आहे.
COMMENTS