आरोप- प्रत्यारोपाचे राजकारण

Homeताज्या बातम्यासंपादकीय

आरोप- प्रत्यारोपाचे राजकारण

महाराष्ट्रात आणि देशात भारत स्वतंत्र झाल्यापासून जे राजकीय समीकरणे उभे राहिले त्याला मूलभूत आधार राहिला तो धर्म- जात- प्रांत याचा. राज्यव्यवस्थेच्या

महाविकास आघाडीचा जागावाटपांचा खेळ
युक्रेनमधून परतलेल्या विद्यार्थ्यांच्या वैद्यकिय शिक्षणाचे भवितव्य अधांतरी
राजकारणातील गुन्हेगारीकरण

महाराष्ट्रात आणि देशात भारत स्वतंत्र झाल्यापासून जे राजकीय समीकरणे उभे राहिले त्याला मूलभूत आधार राहिला तो धर्म- जात- प्रांत याचा. राज्यव्यवस्थेच्या निर्मितीसाठी सर्वच राजकीय पक्षानी या मुद्द्याचा पुरेपूर वापर केल्याचा इतिहास आहे. यातून देशाचा विकास तर सोडाच पण जे झाले ते नुकसानच. राज्यकर्ते निवडणुकीपूर्वी लोकांच्या धार्मिक भावना भडकावतात आणि आपली पोळी भाजून घेतात. महाराष्ट्रात आणि देशात आजपर्यंत ज्या- ज्या निवडणूक झाल्या त्याला जात, धर्म, भाषा, प्रांत याचे संदर्भ असतातच. यामध्ये राजकीय पुढाऱ्यांची पोळी भाजली नाही तर शेवटी ठरलेला पाकिस्तान मुद्दा असतोच. त्याच्या पुढे आपले राजकीय पुढारी वैयक्तिक आरोप- प्रत्यारोप यासाठीही त्याचा वापर करत असतात. सध्या असाच एक हिंदू- मुस्लिम मुद्दा चव्हाट्यावर आला आहे. तो म्हणजे, मालाडमधील उद्यानाला टिपू सुलतान यांचे नाव देण्याचा. राज्याच्या राजकीय राजकारणात याला जे- जे संदर्भ आहेत याचा उहापोह करणे क्रमप्राप्त.  
मालाडच्या मालवणी परिसरामध्ये बांधण्यात आलेल्या एका क्रीडा मैदानाच्या नावावरुन महाविकास आघाडी सरकार आणि भाजपामध्ये नव्या वादाला सुरुवात झाली. काँग्रेसचे स्थानिक आमदार तथा मुंबई शहराचे पालकमंत्री अस्लम शेख यांच्या आमदार निधीतून या मैदानाचे काम करण्यात आलं. या क्रीडा मैदानाचं वीर टिपू सुलतान क्रीडासंकुल असं नामकरण करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. या प्रकरणावर फडणवीस म्हणाले, “ज्या टिपू सुलतानने हिंदूंवर अनन्वित अत्याचार केले, तो टिपू सुलतान आमचा देशगौरव होऊ शकत नाही.” असं फडणवीस म्हणाले. या फडणवीसांच्या विधानावरून शिवसेनेचे हिंदुत्वाचे राजकारण बेगडी आहे का? किंबहुना: तसे होते तर त्यांच्यासोबत फडणवीसांनी पाच वर्ष सत्ता उपभोगली मग ते काय होते? बेगडी भाजप होती की, शिवसेना? फडणवीसांना हिंदुत्वाचा पुळका येणे हे तसे ठीक. पण भाजप सोबत नसल्यामुळे आणि काँग्रेस, रराष्ट्रवादी सोबत महाविकास आघाडीत असल्यामुळे शिवसेनेचे हिंदुत्व कमी होणार आहे का? आता याचं दरम्यान फडणवीसांचं एक विधान असं होतं की, “पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात देश ज्या पद्धतीने पुढे जातोय, त्यावरून देशातील शेवटच्या माणसाचा विचार करणारं हे सरकार देशाला प्रगतीच्या वेगळ्या सोपानावर घेऊन जाईल,” मग दिल्लीतील शेतकरी आंदोलनावर जे सरकारी पेचप्रसंग आलेले होते तेव्हा मोदींनी देशातील शेवटच्या माणसाचा विचार का केला नाही. ते आंदोलन तर उभ्या देशाच्या पोशिंद्याचे होते ना! असो. यांच्या पुढच्या  संवादाकडे वाळू. “ईडी, सीबीआय. इन्कम टॅक्स हे जे काय आहे ही त्यांची चिलखतं आहे. ही चिलखतं घालून ते राजकीय शत्रूंशी लढत असतात. हिंमत असेल तर ही चिलखतं काढून मैदानात या. नाय मातीत गाडलं, ना लोळवलं तर शिवसेना आपलं नाव सांगणार नाही, अशी भूमिका शिवसेना पक्षप्रमुखांनी मांडली. आम्ही त्या भूमिकेशी ठाम आहोत. आम्ही लढण्यास तयार आहोत. या अंगावर. काय करणार आहात तुम्ही? एक तर खोट्या प्रकरणात तुरुंगात टाकाल, आयटी सेलचा वापर करुन बदनामीची मोहीम चालवाल किंवा हरेन पंड्याप्रमाणे आम्हाला गोळी माराल. दुसरं तुम्ही काय करु शकता? तुम्ही शिवसेनेला संपवू शकत नाही. हा डाव तुमच्यावर उलटेल आणि तुम्ही संपाल,” असं राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हटलं. याचा सरळ- सरळ अर्थ असा आहे की, केंद्रातील भाजप सरकार राज्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांना ईडी, सीबीआय. इन्कम टॅक्स कारवायात मुद्दामहून अडकवत आहे असा हा रोख. यावर फडणवीस म्हणतात की, “चोऱ्या कराल तर ईडी, सीबीआय कारवाई करणारच. तुम्ही तर आम्ही एखादं ट्वीट केलं तरी जेलमध्ये टाकत आहात. राबडी देवी ही काय शिवी आहे? पण सौभाग्यवतींना राबडी देवी म्हटलं म्हणून पुण्याचे २५ पोलीस रात्री आमच्या कार्यकर्त्याच्या घऱात जात आहेत. आम्ही त्यांचं समर्थन नाही केलं. त्यामुळे हा रडीचा डाव आहे,” आता ट्वीट, सौभाग्यवतीं, राबडी देवी हे या राजकीय नेत्यांचे व्यक्तिगत राजकारण. आता आपलं घोड इथंच पेंड खात. कारण, खरं राजकारण समजणे हे आपल्या लोकांच्या मेंदूच्या बाहेरचे. तसा जवळपास १३० कोटी जनतेपैकी ८० कोटी जनतेचा मेंदू या व्यवस्थेने पक्का होऊच दिलेला नसतो. मग अशा कच्या मेंदूच्या लोकांचा दंगलीसाठी कुणी वापर करतो का? हा खरा मुद्दा.  
महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणात कधी आणि केव्हा वाद- विवाद, दंगल होईल हे सांगता येत नाही. पण याच्या मुळात गेले तर ते शेवटी येते ते प्रतीके, प्रतिमा, जात- धर्म, भाषा- प्रांत इथपर्यंतच. या सर्व मुद्यावर गेल्या सात दशकापासून राजकारण सुरु आहे. मूलभूत प्रश्न देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून आहेत तसेच आहेत. सत्तेसाठी आणि सत्तेतून जी प्रतिष्ठा आणि संपत्ती कमावलेली असते ती सुरक्षित ठेवण्यासाठी जे सुरु असते ते म्हणजे आरोप- प्रत्यारोपाचे राजकारण. हे सर्वानी लक्ष्यात घ्यावे इतकेच. 

COMMENTS