Homeताज्या बातम्यासंपादकीय

अजित पवारांची दुहेरी कोंडी

भाजपने शिंदे यांच्या शिवसेना आणि नंतर अजित पवारांना सोबत घेवून महायुतीची घोषणा केली. अर्थात अजित पवारांसोबत छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, दिलीप वळसे पा

शपथविधीच्या निमित्ताने ..
राहुल गांधी आणि विरोधी पक्षनेतेपद
निवडणुकीचे गाजर आणि घोषणांचा पाऊस

भाजपने शिंदे यांच्या शिवसेना आणि नंतर अजित पवारांना सोबत घेवून महायुतीची घोषणा केली. अर्थात अजित पवारांसोबत छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, दिलीप वळसे पाटील, धनजंय मुंडे यांच्यासारखे मातब्बर नेते सोबत आल्यामुळे महायुती आरामात सत्तेत येईल, जागा वाढतील असा भ्रम महायुतीच्या नेत्यांना होता. मात्र तो भ्रम लोकसभा निवडणुकीत सपशेल अपयशी ठरल्याचे दिसून येत आहे. कारण नाशिकमध्ये भुजबळ असतांना महायुतीचा उमेदवार पडला, दिलीप वळसे पाटील असतांना शिरूरमधून महायुतीचा उमेदवार पराभूत झाला, कोल्हापुरातही तीच गत. त्यामुळे अजित पवारांना सोबत घेवून आपण मोठी चूक केली, असे आता भाजप नेत्यांना वाटत आहे. त्याची सुरूवात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने भाजपचे कान टोचल्यापासून झाली. आणि आता भाजपमधूनच अजित पवारांवर टीका होतांना दिसून येत आहे. त्यामुळे अजित पवारांनी महायुतीतून बाहेर पडावे, यासाठी राजकीय वातावरण तयार केले जात आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मुद्दामहून कमी जागांची ऑफर दिली जाईल, जेणेकरून त्यांनी महायुतीतून बाहेर पडावे, त्यासाठी त्यांची कोंडी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. खरंतर महायुतीमध्ये इतक्या भक्कम ताकदीचे नेते असतांना त्यांना अपक्षेप्रमाणे यश मिळालेले नाही. परिणामी लोकसभेत अपयश मिळाले असले तरी, आता विधानसभेत अपयश नको, अशी मानसिकता भाजप नेत्यांची आहे. त्यामुळे विविध स्तरावर विचारमंथन सुरू आहे. त्यातच अजित पवारांना सोबत घेतल्यामुळे जनतेमध्ये भाजपची प्रतिमा खालावल्याची चर्चा देखील सुरू आहे.

वास्तविक पाहता यामागची क्रोनोलॉली समजून घेण्याची खरी गरज आहे. लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर अजित पवारांसोबत युती केल्यामुळे भाजपचा ब्रँड डॅमेज झाल्याचे राजकीय विश्‍लेषण संघाचे मुख्यपत्र असलेल्या ऑर्गनायझरने केलेे होते. यात अजित पवारांना लक्ष्य केले होते. त्यातच भाजपची देखील चांगलीच कानउघडणी या पत्रातून केली होती. यानंतर भाजप आणि शिंदे यांच्या शिवसेनेच्या नेत्यांनीदेखील अजित पवार गटावर टीकेची झोड उठवण्यास सुरूवात केली आहे. शिवसेनेच्या वर्धापन दिन सोहळ्यात रामदास कदम यांनी लोकसभा निवडणुकीतील महायुतीच्या पराभावचे खापर अजित पवार गटावर फोडण्याचा प्रयत्न केला होता. अजितदादा थोडे दिवस महायुतीत आले नसते तर चालले असते, असे रामदास कदम यांनी म्हटले होते. तसेच विधानसभेसाठी 100 जागांची मागणी देखील रामदास कदम यांनी केली आहे. तर दुसरीकडे काही दिवसांपूर्वी छगन भुजबळांनी 80-90 जागांची मागणी केली होती. त्यामुळे महायुतीमध्ये विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर राजकीय स्फोट न झाल्यास नवल वाटायला नको. यातच राष्ट्रवादीच्या आमदारांच्या मतदारसंघात महायुतीचे उमेदवार पिछाडीवर पडल्याची आकडेवारी मांडली जाऊ लागली आहे. यातून अजित पवारांसोबत आमदार असलेल्यांच्या मतदारसंघातून महायुतीला अपेक्षेप्रमाणे यश मिळालेले नाही, याचाच अर्थ लोकसभेत पराभव पचवावा लागला, मात्र अजित पवारांच्या गटातील विद्यमान आमदारांच्या जागा धोक्यात असल्याचा संदेशच यातून देण्यात येत आहे. त्यामुळे जर अजित पवार सोबत राहिल्यास त्यांना किमान 50 जागा सोडाव्या, अन्यथा त्यांनी महायुतीतून बाहेर पडावे असेच वातावरण तयार करण्यात येत असल्याचे एकंदरित चित्र आहे. महायुतीचे नेते वारंवार आमच्यात सर्व काही आलबेल असल्याचे सांगत असले तरी, त्यांची देहबोली बरेच काही सांगून जात आहे. त्यामुळे राज्यात विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदा राजकीय चित्र बदलल्याचे पाहायला मिळू शकते. तसेेच शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँगे्रसमध्ये देखील पुन्हा एकदा फूट पाडण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे दिसून येत आहे. त्याला निमित्त आमदार रोहित पवार यांचा प्रदेशाध्यक्ष पदावर असलेला डोळा. खरंतर रोहित पवार तरूण आहेत, त्यांची महाराष्ट्र पिंजून काढण्याची क्षमता आहे, त्यामुळे संघटन वाढवण्याच्या दृष्टीने त्यांचा या पदावर डोळा असला तरी, प्रदेशाध्यक्षपद अनुभवी नेत्यांना देण्याची परंपरा असल्यामुळे शरद पवारांच्या पक्षात देखील दोन गट पडतांना दिसून येत आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर बरीच काही राजकीय उलथापालथ घडू शकते.

COMMENTS